Home »Divya Marathi Special» Interview Of Agriculture Minister Pandurang Phundkar

मुलाखत: शेतकऱ्यांवर दुबार कर्जाची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्नशील; कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर

दिव्य मराठी | Mar 16, 2017, 03:00 AM IST

  • मुलाखत: शेतकऱ्यांवर दुबार कर्जाची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्नशील; कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर
शेतकरी कर्जमाफीवरून विराेधक सध्या अाक्रमक अाहेत. हा निर्णय हाेण्यासाठी सरकारही प्रयत्नशील अाहे. मात्र गेल्या वेळी कर्जमाफीचा निर्णय झाला तेव्हा शेतकऱ्यांना फारसा फायदा झाला नाही. तसे अाता हाेऊ नये यासाठीच अामचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.

कर्जमाफीवरून विरोधकांनी अधिवेशन दणाणून साेडले आहे. सरकारची यावर काय भूमिका आहे?
अामचे सरकार हे शेतकऱ्याच्या बाजूने असून तो कर्जमुक्त झाला पाहिजे असे आम्हाला मनापासून वाटते. पण दुबार कर्ज घेण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये यासाठी आम्ही अधिक आग्रही आहोत. बळीराजाला त्याच्या पायावर उभे करण्यासाठी सरकार पावले उचलत आहे, अन्यथा मागे काही वर्षे जाऊन बघितले तर फक्त कर्जमाफी झाली, पण त्यामधून शेतकरी काही सक्षम झाल्याचे दिसलेले नाही.

दुबार कर्ज घेण्याची वेळ येऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत?
पाणी अडवण्यासाठी, जिरवण्यासाठी जलयुक्त शिवार याेजना, शेतकऱ्यांना १२ तास वीज, पीक विमा योजना अशा उपाययोजनामंधून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाऊस चांगला झाल्याने जलयुक्त शिवार योजनेमधून बऱ्यापैकी पाणी अडवण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा दुबार पिके तर घेतलीच, पण तिसरे पीक घेण्याचाही ते विचार करत आहेत. एकरी २० क्विंटल तूर तसेच सोयाबीनचेही उत्पादन घेऊन शेतकरी सक्षम होताना दिसत आहेत. वीज मंडळाच्या वतीने डीपी सोलारवर विद्युत पंप जोडून शेतकऱ्यांना १२ तास वीज देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच शिल्लक शेती पंप जोडणी पूर्ण करून नवीन जोडणी ८ ते १० दिवसांत दिली जाईल. त्याचबरोबर पीक विमा योजनेमुळे भरपाईही मिळण्यासाठी अडचणी येत नाहीत.
जलयुक्त योजनेत गैरव्यवहाराची टीका हाेत अाहे?
राज्यात ८९ तालुके अवर्षणग्रस्त असून त्यापैकी एक बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आहे. पण इतक्या वर्षांनंतर प्रथमच मार्चमध्ये पाणीटंचाईचे संकट ओढवलेले नाही हे मोठे यश म्हणायला हवे. जलयुक्त शिवारमुळे १२ लाख घनमीटर पाणी अडले आहे हे लक्षात घ्यायला हवे. काही ठिकाणी त्रुटी असतील, पण त्या पुढील अडीच वर्षांत दुरुस्त करण्यात येतील. मात्र अवर्षणामुळे हजारभर फूट खाली गेलेले पाणी आता शंभर-दीडशे फुटांवर दिसायला लागले आहे.

कृषी क्षेत्राची राज्यातील सध्याची काय स्थिती आहे?
उत्तम पावसामुळे शेतीचे यंदा ११० टक्के उत्पन्न झाले असून खरीप तसेच रब्बी पिके उत्तम झाल्याने बळीराजा सुखावला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली खरी, पण १६०० काेटी पीक विमा योजनेच्या माध्यमातून देण्यात आले. तुरीचे उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणावर आले असून नाफेडच्या माध्यमातून २४ लाख क्विंटल तुरीची खरेदी झाली असून १५ एप्रिलपर्यंत ही खरेदी सुरू राहील. सोयाबीनलाही प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्यात आले असून २५ क्विंटलपर्यंत त्याची मर्यादा आहे. बीटी काॅटन बियाणाचे पाकिटही अाता शेतकऱ्यांना केवळ ३५० रुपयांत मिळेल. सरकारने स्वत:च हे बियाणे विकसित करण्याचा निर्णय घेतला असून यंदा एक लाख पाकिटे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जातील.

Next Article

Recommended