आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी समृद्ध करणाऱ्या बाेली भाषांतील नाटकांत स्पर्धा हवी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला ठाण्यात शुक्रवारपासून प्रारंभ हाेत अाहे. या तीन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान वस्त्रहरणसह १६ नाटके लिहिणारे सिद्धहस्त लेखक गंगाराम गवाणकर यांना मिळाला अाहे. संजय परब यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न : नाट्यसंमेलन अध्यक्ष या नात्याने रंगभूमीला दिशा देण्याच्या योजना अाहेत का?
उत्तर : अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्याचा आनंद असून गटातटाच्या राजकारणापलीकडे जाऊन रंगभूमी समृद्ध करण्यासाठी वर्षभरात माझ्या हातून जेवढे काही होईल ते मी करणार आहे. नाट्य स्पर्धंाच्या निमित्ताने मी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला असून गावाकुसातील, खेड्यापाड्यांतील बोलीभाषा सतत मला खुणावत असतात. वस्त्रहरण हे नाटक मालवणी बोलीभाषेच्या लहेजातील असले तरी प्रेक्षक कुठल्याही वर्गातील आणि भाषेचा असला तरी त्याला मनमुराद आनंद मिळवून देते. बोलीभाषेत जो गोडवा आहे, त्याची सर प्रमाणभाषेला नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशा असंख्य बोलीभाषा असून त्यांची नाटकेही होत असतात. ही नाटके मराठी रंगभूमीला अधिक समृद्ध करू शकतील, असा मला विश्वास वाटतो. म्हणूनच अशा बाेलीभाषांतील नाटकांची स्पर्धा भरवावी. यामधून जे नाटक पहिले येईल ते नाट्य परिषदेने किंवा सरकारने दत्तक घेऊन त्याचे प्रयोग राज्यभर करावेत, अशी माझी कल्पना आहे. गेली ५५ वर्षे सातत्याने आयोजित केल्या जाणाऱ्या हौशी नाट्यस्पर्धेमुळेच माझ्यासारखे अनेक नाटककार पुढे आले. हौशी नाट्यस्पर्धेमुळेच व्यावसायिक रंगभूमीला ताकद मिळाली. असेच बोलीभाषेतील स्पर्धेमुळे होईल, असा मला विश्वास वाटतो.
प्रश्न : नाट्यसंमेलनात ठराव मांडले जातात, घोषणा होत असल्या तरी त्यामधून काही निष्पन्न होत नाही. यामुळेच वर्षभराचे नाट्यसंमेलनाध्यक्ष हे शोभेचे बाहुले असतात, अशी टीका होते. याविषयी काय सांगाल?
उत्तर : मी आशावादी असून एका वर्षात जे काही नाटकांच्या प्रचार प्रसारासाठी शक्य ते सर्व मी करेन. हे मान्य की वर्षभराचा कालावधी पुरणारा नाही, पण केलेल्या घोषणांचा आणि मांडलेल्या ठरावांचा मी सतत पाठपुरावा करेन. नाट्य परिषदेने ज्येष्ठ नाट्यकर्मींसाठी निवृत्तिवेतन, अायुर्विमा यासारखे उपक्रम सुरू केले आहेत. नाट्यसंकुलाचा प्रश्न असून पनवेलजवळ जागा मिळवून म्हाडा व सरकारच्या मदतीने तो सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी हा मुद्दा अध्यक्षीय भाषणात मांडण्याविषयी सुचवले असून त्यातून या कामाला मूर्त स्वरूप देता येईल. नाटक म्हणजे मराठी माणसांची सांस्कृतिक भूक आहे आणि ती भागवण्यासाठी तावडे यांनी सर्व जिल्ह्यांत नाट्यगृहे बांधण्याचे आश्वासन दिले आहे. कोकणाने मराठी रंगभूमीला कायम मोठे योगदान दिले असून आमची कोकण त्रिमूर्ती जिल्हा तेथे नाट्यगृह ही योजना सफल करू. याशिवाय वर्षभरात राज्यातील नाट्य परिषदेच्या २२ शाखांना मी भेट देईन. त्याप्रमाणे अनेक ठिकाणी शाखा नाहीत, तेथे नवीन शाखा सुरू करून नाट्यकर्मींना प्रवृत्त करेन.
प्रश्न : सोशल मीडियाच्या युगात मराठी नाटकांना किती भविष्य आहे? अशा वातावरणात नाट्य व्यवसाय करत राहणे परवडणार आहे का?
उत्तर : सोशल मीडियाचा नाटकाच्या भवितव्यावर काही परिणाम होणार नाही. जिवंत पात्रांच्या माध्यमातून नाटक तुम्हाला सर्वांगाने समृद्ध करत असते. त्यामुळे चांगली नाटके ही काल चालली त्याचप्रमाणे आज, उद्याही चालणारच. मात्र, वाढती महागाई व टीव्हीवर घरबसल्या करमणूक यामुळे नाट्य व्यवसायावर परिणाम होत आहे, हे खरे! मध्यंतरी सुनील बर्वेने विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर, जयवंत दळवी यांची जुनी नाटके नव्याने रंगभूमीवर आणताना त्याचे मोजकेच २५ प्रयाेग केले. त्याला प्रतिसाद मिळाला. आजूबाजूच्या ताज्या घटना, सामाजिक बदल असे विषय रंगभूमीवर यायला हवेत. तरुण रंगकर्मी रंगभूमी जिवंत ठेवण्यास मदत करतील. कारण या माध्यमातून त्यांना पुढे चित्रपट, टीव्ही या जगतात आपला ठसा उमटवण्यास मदत मिळणार आहे. नाट्य व्यवसाय चालणार की नाही, हा आजचा विषय नाही. पण अभिमानाने सांगावेसे वाटते की मराठी ही देशातील एक क्रमांकाची रंगभूमी असून जगातही तिचे नाव आहे. यामुळे येथे होणारे बदल याची सर्वत्र दखल घेतली जाते.
प्रश्न : साहित्य असो की नाट्यसंमेलन, तिथे राजकारण्यांचा वावर वाढू लागला आहे, याविषयी तुमचे काय मत आहे?
उत्तर : पैशांचे सोंग कोण घेणार? तीन दिवसांचे संमेलन घेणे ही काही सोपी गोष्ट नाही. राजकारण्यांची मदत घेतल्याशिवाय ते शक्य झाले नसते. राजकीय नेत्यांना कायम दोष देऊ नये. सर्वच राजकारण्यांना नावे ठेवायलाच पाहिजे असे काही नाही. उडदामाजी काळे गोरे असा प्रकार सर्वच क्षेत्रात असतो. चांगली कामे व्हायची असतील तर तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन जावे लागेल.