आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरोहित, उद्योगपती, बॉलीवूड आणि सट्टेबाजांपासून संसद दूर ठेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्तमान स्थितीत संसदीय लोकशाही समोर निर्माण झालेला धोका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ६५ वर्षांपूर्वीच ओळखला होता. संसदेत चार घटकांचे प्रतिनिधित्व नसावे असा सल्ला तत्कालीन राज्यकर्त्यांना त्यांनी दिला होता. स्टॉक एक्स्चेंज, चोरस गर्ल, बिग बिझनेस आणि, प्रिस्ट म्हणजेच पुरोहितांना संसदेपासून दूर ठेवा असे त्यांनी बजावले होते. पण सध्या संसदेत चारही घटकांचा शिरकाव झाल्यामुळे गंभीर राजकीय परिस्थिती निर्माण झाली असल्याचे मत बाबासाहेबांचे सहकारी एल. आर. बाली यांनी व्यक्त केले. १२५ व्या जयंतीनिमित्त ‘दिव्य मराठी’च्या ‘राष्ट्रनायक’ या पुरवणीसाठी त्यांच्याशी विशेष बातचीत करण्यात आली, त्या वेळी त्यांनी बाबासाहेबांच्या अज्ञात पैलूंवर प्रकाश टाकला.
एल. आर. बाली यांना बाबासाहेबांचा १९४८ ते १९५४ पर्यंत म्हणजेच सहा वर्षांचा सहवास लाभला आहे. त्यांची बाबासाहेबांसोबत शेवटची भेट ३० सप्टेंबर १९५६ मध्ये झाली होती. मुलाखतीत बाली म्हणाले, स्टॉक एक्स्चेंज म्हणजे सट्टेबाज व दलालांचा बाजार आहे.
सट्टेबाज आणि दलालांपासून संसदेला दूर ठेवावे. चोरस् गर्ल म्हणजे नाचणाऱ्या युवतींचे संसदेत काम नाही. बिग बिझनेस म्हणजेच उद्योगपतींचे पावले संसदेत पडता कामा नये. त्याशिवाय प्रियस्ट म्हणजेच पुरोहित, साधु-संतांना तर संसदच नव्हे तर राजकारणापासूनच दूर ठेवावे, असे त्यांनी सांगितले होते. स्टॉक एक्स्चेंज, चोरस गर्ल, बिग बिझनेस आणि पुरोहितांच्या संदर्भात बाबासाहेबांनी वेगवेगळ्या भाषणातून मार्गदर्शन केले आहे. स्टॉक एक्स्चेंज आणि चोरस गर्लला दूर ठेवण्याचा उल्लेख ९ मे १९५१ च्या संसदीय भाषणात केला आहे. पार्लमेंट डिबेट व्हॅल्युम-२ आणि पार्ट-२ च्या ८३४८ ते ८३७० पानावर त्याचा उल्लेख आहे. पुरोहित, साधु, संतांना राजकारणापासून दूर ठेवण्यासंदर्भात २७ जानेवारी १९१९ मध्ये म्हटले आहे. त्याचा उल्लेख रायटिंग अँड स्पीचेसच्या व्हॅल्युम-१ मध्ये पान क्रमांक २५५ मध्ये आढळतो, पण सध्या चार घटकांचा संसदेत चंचुप्रवेश झाला असून त्यामुळेच दलाल, बॉलीवुड, उद्योगपती आणि धर्मांध साधु-पुरोहितांनी देशाचे राजकीय स्वास्थ्य बिघडवले आहे. संसद सदस्य विजय मल्ल्या नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून विदेशात पळून जातो. संसद सदस्य हेमामालिनी राजसत्तेचा वापर करून शेकडो कोटींचा भूखंड मुंबईत मिळवते. तर उमा भारती, साक्षी महाराजांसह भगव्या वस्त्रातील संसद सदस्यांनी धर्मांधता पसरवत धार्मिक -जातीय द्वेष निर्माण केला आहे. बाबासाहेबांच्या या दूरदृष्टीतून प्रखर राष्ट्रवाद तर दिसतोच आहे. त्याशिवाय संसदेला पवित्र ठेवण्यासाठी सांगितलेल्या उपाययोजनाही अमलात आणणे गरजेचे आहे. राजकारण्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे बाबासाहेबांचे मत होते. त्यासाठी त्यांनी मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात असे प्रशिक्षण केंद्र उभारलेही होते. संसदेत बाबासाहेब नेहमी कोट-टाय परिधान करून येत असत. त्या वेळी अनेक प्रस्थापित त्यांच्या राहणीमानावर टीका-टिप्पणी करत असे, त्यावर बोलताना बाबासाहेब म्हणाले, “ उद्यापासून मी भारताच्या पारंपरिक वेशभूषेत म्हणजेच लंगोट घालून येतो, ” असे व्यंग करून टीकाकारांचे तोंडे बंद केल्याचे बाली यांनी सांगितले.

सर शोभा सिंह यांना बाहेर हाकलले
बाबासाहेबांकडे मंत्रिपद असताना अनेक विभागांचा कार्यभार होता. त्यामध्ये सार्वजनिक बांधकामदेखील त्यांच्याकडेच होते. वल्लभभाई पटेल यांच्याशी मधुर संबंध असलेले तत्कालीन मोठे शासकीय कंत्राटदार बाबासाहेबांना भेटण्यासाठी दिल्लीच्या तिलक रोड येथील बंगल्यात आले होते. बाबासाहेबांचे चिरंजीव यशवंत उपाख्य भैयासाहेब आंबेडकर आणि वाय. सी. शंकरानंद शास्त्री तेथे उपस्थित होते. भैयासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक स्थितीची पूर्ण माहिती असलेले सर शोभा सिंह यांनी बाबासाहेबांसमोर प्रस्ताव ठेवला, “ जर कंत्राट मिळाले तर भैयासाहेबांना व्यवसायात २५ टक्के भागीदारी देतो.” हे उद‌्गार ऐकून बाबासाहेबांनी घरातील नोकर बोलावून शोभा सिंह यांना अक्षरश: उचलबांगडी करून हाकलले. तसेच रात्रीच्याच गाडीचे तिकीट काढून भैयासाहेबांना मुंबईला पाठवून दिले होते. या उदाहरणावरून बाबासाहेबांचा प्रामाणिकपणा दिसून येतो, असेही बाली यांनी म्हटले.
मला कोण विकत

घेऊ शकतो..?
बाबासाहेब खासगीत बोलताना एकदा म्हणाले होते, “ चार पैशांची दाळ आणि चार पैशांचे कणिक असे एकूण आठ पैसे माझा खर्च आहे. त्यामुळे मला कोण विकत घेऊ शकतो..? बालींनी सांगितले की, पूर्वी बाबासाहेब डबक चाळीत किरायानेे राहत होते. त्यावेळी त्यांना
३ रुपये ८ आणे घरभाडे होते.

चर्चेस बोलवलेल्या धर्मपंडितांना प्रवासखर्च दिला
राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद खूप पुराणमतवादी होते. त्यांचा हिंदू कोड बील लागू करण्यास प्रखर विरोध होता. हिंदू धर्मातील दुरुस्त्या म्हणजे, त्यावेळच्या सर्व शंकराचार्यांना न पटणारा विषय होता. पण बाबासाहेबांनी कायदा मंत्री म्हणून सर्वांना चर्चेला बोलावून येण्या-जाण्याचा प्रवासखर्च दिला. त्यामध्ये नझीरूद्दीन अहमद, वाराणशीचे कृपात्री यांच्यासह अनेकांनी चर्चा केली. त्या वेळी बाबासाहेबांनी हिंदू धर्मग्रंथातील एक-एक सेक्शन वाचून दाखवले व ते प्रागतिक विचारांना कसे घातक आहे, यासंदर्भात विवेचन केले.
बातम्या आणखी आहेत...