आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interview Of Vilas Rajguru In Divya Marathi, Shahid Rajguru

पूर्वजांचे बलिदान व्यर्थ तर गेले नाही ना ?, राजगुरूंचे नातू विलास राजगुरूंचा सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वतंत्र आणि बलशाली भारताची निर्मिती व्हावी म्हणून 83 वर्षापूर्वी माझे चुलत आजोबा शिवराम हरी राजगुरू यांच्यासह भगतसिंग, सुखदेव हसत हसत फासावर चढले. मात्र, त्यांच्या स्वप्नातील भारत साकारताना दिसत नाही. त्यामुळे त्यांचे बलिदान व्यर्थ तर गेले नाही ना, अशी भावना निर्माण होत असल्याची खंत राजगुरू यांचे नातू विलास राजगुरू यांनी व्यक्त केली. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना 23 मार्च रोजी इंग्रज सरकारने फाशी दिली होती. त्यानिमित्ताने आयोजित शहीद दिनाच्या कार्यक्रमासाठी ते शनिवारी शहरात आले होते. त्या वेळी दै. ‘दिव्य मराठी’जवळ त्यांनी मन मोकळे केले. त्यांचे मनोगत त्यांच्याच शब्दांत.

भारताला शक्तिशाली करण्यासाठी आता सामान्य माणसांना पुढे यावे लागणार आहे. ज्या राज्यकर्त्यांवर विश्वास ठेवून नागरिकांनी त्यांच्या हातात सत्ता दिली त्यांनीही स्वप्न दाखवण्यापलीकडे काहीच केले नाही. गोरे इंग्रज गेले. मात्र त्यांनी तयार केलेली शासन पद्धती तीच आहे. ब्रिटिशांनी तयार केलेले कायदे आणि नियमच आपण पाळत असल्याने पारतंत्र्याची भावना जशीच्या तशी आहे. त्यामुळे लोकांनीच पुढाकार घेऊन यात बदल केल्याशिवाय परिवर्तन होणार नाही. देशातील कुठलाही पक्ष लोकांचे प्रश्न ताकदीने सोडवताना दिसत नाही. सर्व राजकीय पक्षांना सत्तेची लालसा लागलेली आहे. देशसेवेची भावना कुठेच दिसत नाही.


राजगुरूंचा वारसा चालवण्यासाठी आमच्या कुटुंबीयांचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. राजगुरु यांचे भाऊ देवराव तात्या टोपेंचे जवळचे मित्र होते. तर आताच्या पिढीतील शरद राजगुरू 1965च्या युद्धात शहीद झाले. सध्या तरुणांना एकत्र करून त्यांना व्यायामाची गोडी लागावी, त्यांनी मल्लखांब, कुस्ती, नेमबाजी या पारंपरिक खेळांची कास धरावी आम्ही प्रयत्न करत आहोत.


ना मोदी, ना राहुल,
ना केजरीवाल

भारताला गतवैभव मिळवून देण्याची ताकद ना मोदींमध्ये आहे ना राहुल गांधींमध्ये. केजरीवालांमध्येही ती आहे, असे मुळीच वाटत नाही. काँग्रेसला इतकी वर्षे लोकांनी संधी दिली. मात्र, त्यांनी अपेक्षित असे चित्र बदलले नाही. मोदी पंतप्रधान झाले तरी ते देशासाठी काही करतील असे वाटत नाही. जे काही करायचे आहे ते लोकांनाच करावे लागणार आहे.