आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपली पट्टी नेमकी ओळखून तिच्यातच सुबक गाणे हेच मर्म;जगविख्यात कलावंत हरिहरन यांच्या स्वरप्रवासाला उजाळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जगविख्यात शास्त्रीय गायक  हरिहरन लाइव्ह कॉन्सर्टनिमित्त रविवारी अाैरंगाबादेत आले असताना त्यांनी खास ‘दिव्य मराठी’शी विविध विषयांवर मनमाेकळा संवाद साधला. अस्सल शास्त्रीय गायकीची बैठक असलेल्या हरिहरन यांनी ४ दशकांपासून रसिकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले. त्यांच्या या स्वरप्रवासातील बारकावे अन् संगीताच्या अनेक कंगोऱ्यांना स्पर्श करणारी ही मुलाखत...
 
शास्त्रीय, सुगम संगीताचा अचूक मेळ कसा साधता? 
उत्तर- शास्त्रीय संगीतावरच जगातील प्रत्येक संगीत उभे आहे. गायकाने आपल्या शैलीने गाण्याचे तंत्र कायम ठेवायला हवे. पट्टी बदलण्याचा अट्टहास नकाे.  कलावंत म्हणून असा मोह होणे  साहजिकच आहे. मात्र, ते करताना आपली पट्टी अन‌् शैली कायम ठेवायला हवी. आजही अनेक उत्तम कलावंत आहेत, युवा गायक खूप सुंदर काम करत आहेत, त्यांनी आवाजाला फार त्रास न देता गावे.  

 दाक्षिणात्य असूनही उर्दू गझलांवर प्रभुत्व कसे ? 
उत्तर- मी शास्त्रीय संगीत शिकलो, तेही कर्नाटकी संगीत; पण गझलांची आवड होती.  मूळ दाक्षिणात्य असलो तरीही मी वाढलो मुंबईत आहे. त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टीची नशा चढते ते आपण करूनच जातो. तसेच माझे झाले. मी गझलांसाठीच बनलो म्हणून आपोआप सर्वकाही होत गेले.  
 
गायनाच्या शिक्षणाची सुरुवात कशी झाली? 
उत्तर- मी गायनाचे प्राथमिक शिक्षण अम्माकडे घेतले. घरात संगीताचे वातावरण असल्याने आईसोबत मी शिवाजी मंदिरात विविध कार्यक्रमांसाठी जात असे. वसंतराव देशपांडेंसह अनेक मातब्बर मराठी गायकांना मी ऐकले आहे. पंडित जितेंद्र अभिषेकींनाही ऐकले होते. गुलाम मुस्तफांकडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकलो.  
 
 कलोनियल कझिन्स कसे झाले? 
उत्तर- याचे मूळ लहानपणीच्या इंग्रजी कवितांमध्ये आहे. लहानपणीच्या कविता मी यमन, अहिरभैरव, तोडी रागांमध्ये गायचो. असे शेकडाे प्रयोग मी तेव्हा केले. त्यामुळे कलोनियल कझिन्स माझ्यासाठी फार वेगळे ठरले नाही. हो, पण ते प्रयोग माझे गाणे ऐकणाऱ्यांसाठी मात्र नक्कीच निराळे ठरले. त्यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.  
 
 मराठीतील नाट्यपदांबद्दल काय सांगाल? 
उत्तर- मी बालवयापासून खूप मराठी गायकांना ऐकले आहे. त्यामुळे त्यांची छाप माझ्या मनावर खोलवर होती. ४० मिनिटांपर्यंत रंगलेले ‘घेई छंद मकरंद’ किंवा इतर नाट्यसंगीत माझ्या स्वरांमध्ये खोलवर रुजलेले आहे. त्यामुळे मी मराठीतील गाणी गायली आहेत. अर्थात ती नाट्यपदे नाहीत. कट्यारचा प्रयोगही खूप उत्तम झाला आहे.  
 
व्हायोलिनप्रमाणे आवाज हवा 
व्हायोलिनचा स्वर वरच्या अन् खालच्या दोन्ही पट्ट्यांत उत्तमच लागतो, तसा आपला स्वर लागला पाहिजे. नव्या पिढीच्या युवा गायकांनी आवाजाला फार ताण न देता, नैसर्गिक शैलीतील  प्रयोग करायला हवेत, असा सल्लाही हरिहरन यांनी दिला.  
बातम्या आणखी आहेत...