आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरजेनुसार करा फायदेशीर गुंतवणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्जुनने सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन घेण्याचा निर्णय घेतला. दीर्घकालीन बचतीसाठीचा हा चांगला पर्याय असल्याचे त्याला वाटले होते. सध्या 30 वर्षे वय असले तरी नेमकी गुंतवणूक कोठे करायची, हेच त्याला कळत नाही. ज्याला भेटतो, तो वेगळाच सल्ला देतो. मोठे शेअर्स बाजाराची दिशा ठरवणारे असतात तसेच दीर्घकाळ विश्वास ठेवण्यास पात्र असतात, त्यामुळे काही मित्रांनी मोठ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला, तर काही मित्रांनी भारतीय बाजारपेठेतील मिडकॅप कंपन्या सर्वाधिक फायदा मिळवून देतात, असे सांगितले.


अर्जुनचे सल्लागार म्हणाले की, बँकिंग आणि एफएमसीजी शेअर्सचा विचार करायला हवा. कारण ते बाजारातील चढ-उतारातही टिकून राहतात. यात जास्त जोखीम आणि भविष्य अनिश्चित असते. कामकाजाच्या दृष्टीने बळकट असेल अशा क्षेत्रात अर्जुनने गुंतवणूक करायला हवी. भारतीय अर्थव्यवस्था ही वापरकर्त्यांवर आधारित आहे. त्यामुळे अर्जुनने वापरावर भर देणा-या थिमॅटिक फंडमध्ये एसआयपी करायला हवी, असे दुस-या सल्लागाराचे मत होते.
दरम्यान, वर्तमानपत्र आणि इतर माध्यमांतील जाहिरातींवरून अर्जुनला असे वाटले की, रोख्यांवर आधारित फंड चांगले आहेत. इक्विटी फंडपेक्षा त्यात जास्त परतावे मिळत आहेत.


अर्जुनने पाहिलेल्या जाहिरातींमध्ये रोख्यांवर आधारित फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. आता अर्जुन पूर्णपणे गोंधळला आहे. त्याला दर महिन्याला पाच हजार रुपयांची गुंतवणूक करायची आहे. पण नेमकी कुठे करायची, ही समस्या आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी अर्जुनला तीन प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील.


पहिला प्रश्न : गुंतवणुकीचा उद्देश काय? त्याला वाढ हवी असेल तर इक्विटी फंड्समध्ये गुंतवणूक करावी. उत्पन्न मिळण्याचा हेतू असेल तर त्याने रोख्यांवर आधारित फंडमध्ये गुंतवणूक करावी. अर्जुनला ग्रोथ हवी आहे, त्यामुळे त्याने सर्वप्रथम इक्विटी फंड्समध्ये गुंतवणूक करावी. दुसरी गोष्ट म्हणजे अर्जुनला दीर्घकालीन बचत करायची असल्यास त्याने इक्विटीत गुंतवणूक करून नंतर थोड्या कालावधीसाठी रोख्यांवर आधारित फंडमध्ये गुंतवणूक करावी.


तिसरी बाब म्हणजे अर्जुनला गुंतवणुकीत जोखीम पत्करायची आहे का? कमी जोखीम पत्करायची असेल तर इक्विटी फंड्स खरेदी करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी तो रोख्यांवर आधारित फंड घेऊ शकतो.
एवढ्या सगळ्या विचारानंतर इक्विटी आणि रोख्यांवर आधारित फंडांत अ‍ॅसेट अलोकेशन (श्रेणीनिहाय वर्गीकरण) करावे लागेल. 80 टक्के इक्विटी आणि 20 टक्के रोख्यांवर आधारित फंडमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर अर्जुनने बाजाराप्रमाणे गुंतवणूक न करता स्वत:च्या गरजेनुसार गुंतवणूक करावी.