आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘थोडे जास्त’ साठी पर्याय-एमआयपीमध्ये गुंतवणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे म्हणजे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे आणि त्यात जोखीम असते. तेजी आली तर लाखाचे दीड लाख होतील नाहीतर लाखाचे बारा हजार होतील; नकोच ते, असा विचार करणारे काही असतात. त्यांच्यासाठी डेट प्रकारातील इन्कम फंडाची माहिती आपण या आधी घेतली, पण मार्केटमध्ये तेजी आल्यावर याच लोकांना जवळच्या मित्र, नातेवाइकांडून इक्विटी म्युच्युअल फंडातील किंवा शेअर मार्केटमधील त्यांच्या गुंतवणुकीतून किती घसघशीत लाभ झाला, याच्या सुरस आणि चमत्कारिककथा ऐकायला मिळतात. मग असे मार्केटपासून दूर राहणारेही त्यात गुंतवणूक करतात, पण इतक्या तेजीवरून मार्केट नेमके त्यानंतर खाली आले तर त्यांना नुकसान सहन करावे लागते. या ऐवजी एक मार्ग आहे, असा तेजी-मंदीचा विचार न करता सुरुवात म्हणून छोटी रक्कम इक्विटी प्रकारात गुंतवणे व त्या द्वारे जोखीम पत्करण्याची आपली वृत्ती आहे की नाही, हे आजमावून बघणे.
त्यासाठी समजा आपल्याला दहा हजार रुपये गुंतवायचे आहेत, तर त्यापैकी आठ हजार इन्कम फंडात व दोन हजार इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणे. अशी आपण दोन वेगळ्या प्रकाराच्या फंडात गुंतवणूक करू शकतो, पण आपल्या सोयीसाठी या दोन्हीचे कॉम्बिनेशन असलेले फंड म्युच्युअल फंडांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. हे आहेत मंथली इन्कम प्लॅन म्हणजेच एमआयपी. याची आपण माहिती करून घेऊ. या फंडाकडे गुंतवणुकीसाठी जी एकूण रक्कम जमा होते त्यापैकी जास्तीत जास्त फक्त 20 टक्के इतकी इक्विटी म्हणजे शेअर मार्केटमध्ये गुंतवली जाते व इतर 80 टक्के ते 100 टक्के रक्कम कर्जरोखे (सरकारी व कॉर्पोरेट), मनी मार्केट साधने (इन्स्ट्रूमेंट) अशा डेट प्रकारात गुंतवली जाते. या इक्विटी व डेटच्या प्रमाणात काही किरकोळ फेरफार असू शकतात. उदा. काही एमआयपी जास्तीत जास्त फक्त 15 टक्के इतकी रक्कम इक्विटीमध्ये गुंतवतात व 85 टक्के ते 100 टक्के रक्कम डेट प्रकारात गुंतवतात. हे फंड 100 टक्के रक्कम डेट प्रकारात गुंतवू शकत असले तरी ती एक तरतूद आहे. सहसा कमीत कमी 15 टक्के तरी इक्विटीमध्ये गुंतवली जातेच. डेट व इक्विटीच्या या कॉम्बिनेशनमुळे दुहेरी लाभ मिळतो. डेटमुळे फंडाला स्थिरता येते, शेअर मार्केटमध्ये एकदम खाली आले तरी या फंडाची केवळ 20 टक्के इतकीच रक्कम त्यात असल्याने खूप मोठे नुकसान सहन करावे लागत नाही. उलट डेट प्रकारातील गुंतवणुकीवर मर्यादितच लाभ असतो, पण या फंडांची 20 टक्के गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये असल्याने त्यातील तेजीचा त्या प्रमाणात लाभ या फंडांना मिळतो. इतर अनेक बाबतीत एमआयपीच्या तरतुदी या इन्कम फंडासारख्या असतात. उदा. यातून कधीही रक्कम काढता येते, त्यासाठी काहीच पेनल्टी द्यावी लागत नाही, म्हणजे यात रोकडसुलभता आहे. मात्र, बहुतेक फंड एक वर्षाच्या आत पैसे काढून घेत असाल तर एक्झिट लोड लावतात.
एमआयपीमध्ये गुंतवणूक करताना आपण लाभांश पर्याय निवडू शकतो किंवा ग्रोथ पर्याय. लाभांश पर्याय निवडला तर म्युच्युअल फंड जाहीर करेल त्या वेळेस आपल्याला लाभांश मिळेल. यावर मिळणारा लाभांश आयकरमुक्त असतो. याचे नाव एमआयपी म्हणजे मंथली इन्कम प्लॅन असले तरी दर महिन्याला लाभांश मिळेलच किंवा काही नियमित कालावधीने मिळेलच, याची हमी नसते. ग्रोथ पर्यांय निवडला तर आपल्या गुंतवणुकीचे मूल्य वाढत जाईल व रिडिम्पशन करताना जो एनएव्ही असेल त्याप्रमाणे रक्कम मिळेल. या पर्यायातही गुंतवणुकीचे मूल्य वाढलेलेच असेल किंवा किती लाभ मिळू शकेल याची हमी नसते. रिडिम्पशन करताना म्हणजे फंडातून पैसे काढून घेताना जर आपण जी मूळ रक्कम गुंतवली होती त्यापेक्षा जास्त रक्कम आपल्याला मिळत असेल तर त्याला कॅपिटल अप्रिसिएशन म्हणतात. वेळोवेळी लाभांश घेऊनसुद्धा आपल्याला असे कॅपिटल अप्रिसिएशन मिळू शकते.
जर आपण बारा महिन्याच्या आतच पैसे काढून घेत असू व त्यावर फायदा झाला असेल तर त्यावर शॉर्ट-टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. गुंतवणूक कालावधी जर बारा महिन्यांपेक्षा जास्त असेल तर लाँग-टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. सध्या हा ‘विदाऊट इंडेक्सेशन’ 10 टक्के व ‘विथइंडेक्सेशन’ 20 टक्के आहे. मागील तीन वर्षांच्या एमआयपींच्या कामगिरीकडे बघितले तर या प्रकारातील टॉपच्या दहा फंडांनी 8 ते 9 टक्के इतके रिटर्न दिले आहे व मागील एक वर्षात 10 ते 14 टक्के रिटर्न दिले आहे व हे आयकरमुक्त आहे. मात्र ही कामगिरी पुढेही अशीच राहील याची हमी नाही, पण बँक मुदतठेवीपेक्षा थोडा जास्त लाभ देऊ शकणारे म्हणून या मंथली इन्कम प्लॅन प्रकाराचा विचार करावा. अर्थात, आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी सल्लामसलत करूनच.
(kuluday@rediffmail.com)