आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayant Pawar Speech In Divya Marathi, Vidrohi Sahitya

विद्रोह कोणाविरुद्ध करावा ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांस्कृतिक चळवळीच्या वतीने १३वे विद्रोही साहित्य संमेलन बुलडाणा येथे १७ व १८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष व ख्यातनाम नाटककार, पत्रकार जयंत पवार यांच्या अध्यक्षीय भाषणातील हा संपादित अंश.
विद्रोह नेमका कोणाविरुद्ध करावा? अर्थातच सांस्कृतिक राष्ट्रवादाविरुद्ध. कारण धार्मिक पुनरुज्जीवनवादातून आकाराला येणारा सांस्कृतिक राष्ट्रवाद हा अंतिमतः मूलतत्त्ववादाला जन्म देतो. इस्लामी राष्ट्रवादातून तालिबानी कसे निर्माण झाले आणि त्यांनी जागतिक शांतता कशी वेठीला धरली, हे आपण पाहिलं आहे. त्याच वेळी या तालिबानी शक्ती जन्माव्यात म्हणून अमेरिकेने कसा गर्भ निर्माण केला आणि त्याचं भरणपोषण केलं हेही लपून राहिलेलं नाही. त्यामुळे अमेरिकाप्रणीत भांडवली राष्ट्रवाद आणि धार्मिक-सांस्कृतिक पुनरुज्जीवनवाद एकमेकांच्या विरोधात नाहीत हे आपलं प्रतिपादन सिद्धच होतं; पण तोच प्रयोग वा तीच युती इथेही होऊ शकते. तेव्हा वरवरच्या निषेधापलीकडे जाऊन, सांकेतिक पद्धतीने व्यक्त होणा-या विरोधाच्याही पलीकडे जाऊन या युतीच्या विरोधात विद्रोह करण्याची आज नितांत गरज आहे.
पण थांबा! इथेच मला प्रश्न पडला आहे, विद्रोह कोणाविरुद्ध करायचा आणि कसा करायचा? कारण ज्या सांस्कृतिक राष्ट्रवादी शक्तींचा धोका आपल्याला जाणवतो आहे तिचा वाहक आज प्रामुख्याने बहुजन वर्ग आहे आणि त्याच्यातही जातधर्म वर्चस्ववादी ब्राह्मणी मूल्यांचा शिरकाव झाला आहे. या देशात सत्तांतर घडवून बहुमताने भाजपला सिंहासनावर बसवणारा बहुजन समाज आहे. देशात घडणा-या हिंसाचारात अग्रभागी बहुजन वर्ग आहे. शोषित आणि शोषक अशा दोन्ही रूपांचा प्रखर आविष्कार बहुजनांमध्ये दिसतो. अशा वेळी बहुजन हिताय, बहुजन सुखाय, या उक्तीचा अर्थ कसा लावायचा आणि बहुजनवाद कसा मांडायचा, असा प्रश्न पडतो.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी १ सप्टेंबर १९२० रोजी ‘बहुजन पक्ष’ स्थापन करून त्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ‘बहुजन’ हा शब्द तेव्हा राजकीय अर्थाने पहिल्यांदा महर्षी शिंदे यांनीच वापरला. या बहुजन शब्दाची व्याख्या करताना त्यांनी देशातल्या लोकसंख्येची दोन गटांत विभागणी केली. एक विद्याबल, द्रव्यबल आणि अधिकारबलाने पुढारलेला वर्ग आणि दुसरा, यापैकी कोणतेच बल अंगी नसल्यामुळे नाइलाजाने मागास राहिलेला वर्ग. यालाच त्यांनी ‘बहुजन समाज’ म्हटलं. एका अर्थाने अभिजन आणि बहुजन यांच्यातली सीमारेषा त्यांनी सुस्पष्ट केली. त्या काळात उच्च जातवर्णाच्या लोकांपाशी ही तिन्ही बलं प्रामुख्याने एकवटली होती, त्यामुळे महर्षी शिंदे यांना अभिप्रेत असलेला बहुजन कोणत्या समाज गटातला आहे, हे स्पष्ट होतं. तरीही त्यांनी जात आणि धर्मावर आधारित बहुजन ही संकल्पना उभी करण्यास नकार दिला. आपल्या बहुजन पक्षात त्यांनी शेतकरी, शिपाई, शिक्षक, सुतार, सोनार, माळी, शिंपी, गवळी, तेली, तांबोळी असे छोटे धंदे करणारे उद्यमी, नाटकवाले, गोंधळी, शाहीर, शकुन सांगणारे जोशी, वैदू, दाया, सावकार आणि पेढीवाले नसणारे छोटे दुकानदार, अंगमेहनत करणारे मजूर, अस्पृश्य आणि स्त्रिया यांचा समावेश केलेला आहे. त्यांनी कोणत्याही जात, धर्माचे आणि देशाचे व्यक्ती आणि व्यक्तिसमूह बहुजन पक्षात सामील होऊ शकतात. मात्र, त्यांचे आणि आमचे हितसंबंध एक असले पाहिजेत, असं म्हटलं आहे.

महर्षी शिंद्यांच्या नंतर मात्र ‘बहुजन’ ही संकल्पना ब-याचशा स्पष्टपणे ब्राह्मणेतर या अर्थानेच वापरलेली दिसते. अगदी यशवंतराव चव्हाणांपासून कांशीराम-मायावती ते आताच्या नेत्यांपर्यंत सर्वांनीच ब्राह्मणेतर गट तो बहुजन, असंच या संकल्पनेकडे पाहिलेलं आहे. महर्षी शिंद्यांनी स्थापन केलेला बहुजन पक्ष राजकीय होता. किंबहुना त्यानंतर आजतागायत सर्वांनीच बहुजनांचं राजकारण म्हणूनच बहुजन या संकल्पनेकडे पाहिलं. महर्षी शिंद्यांच्या राजकारणामागे निर्बलांची ऐहिक उन्नती हा उद्देश होता. नंतरही तो तसाच राहिला, पण यात पुढे पुढे बहुजन या व्यापक संकल्पनेत छेद निर्माण झाले आणि त्यात वेगवेगळे जातीय गट सक्रिय झाले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर अनेक जातींना सामाजिक भान आलं, त्यांना आवाज मिळाला ही चांगलीच गोष्ट झाली; पण या भानाला सत्तेच्या राजकारणाची परिमाणं मिळाल्याने त्यात जातीय द्वेषाच्या विकृती टोकदार झाल्या आणि आज आपण पाहत आहोत मधल्या जाती वेगळ्या, ओबीसी वेगळे, दलित वेगळे, आदिवासी वेगळे अशी बहुजन या शब्दाचीच वाताहत झाली. इतका सारा विखुरलेला समाज बहुजन म्हणून पुन्हा एकत्र कसा येणार हा आजचा कळीचा प्रश्न आहे.