आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिजात शास्त्रीय संगीतातील प्रतिभावंत ‘तानसेन’!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आपल्या सुरेल, प्रतिभावंत गायकीने वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या पं. उल्हास कशाळकर यांना संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा समजला जाणारा ‘तानसेन’ सन्मान जाहीर होणे, ही संगीत रसिकांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा अशा तीनही घराण्यांच्या  गायकीचे मर्म कंठगत करून, त्यात स्वत:च्या प्रतिभेचे रंग मिसळून उल्हासजींनी स्वत:ची अनोखी गायकी घडवली आहे आणि त्याद्वारे स्वत:चा असा रसिकवर्ग निर्माण केला आहे. तानसेन सन्मान हा माझ्यासाठी  माझ्या  गुरूंचा, घराण्यांचा सन्मान आहे, अशी भावना उल्हासजींनी व्यक्त केली आहे.  

 

मै फलीतून अस्सल रागदारी सादर करून रसिकांना खिळवून ठेवणारे जे मोजके कलाकार आज दिसतात, त्यामध्ये  पं. उल्हास कशाळकरांचे स्थान अग्रक्रमाचे आहे. सुमारे ३५ वर्षे उल्हासजी ही किमया घडवत आहेत आणि दिवसेंदिवस त्यांच्या  गायकीत प्रगल्भतेचे नवे उन्मेष अनुभवास येत आहेत. अर्थात याची पायाभरणी अनेक ज्येष्ठ गानगुरुंनी केली आहे. उल्हासजींचा जन्म नागपूरजवळच्या भागात संगीतप्रेमी घरात झाला. त्यांचे वडील नागेश कशाळकर पेशाने वकील असले तरी उत्तम संगीततज्ज्ञ होते. त्यांच्याकडूनच उल्हासजींनी संगीताचे प्रारंभिक शिक्षण घेतले. बालपणापासून उल्हासजींची संगीतातील प्रगती पाहून त्यांना संगीत विषयातच उच्च शिक्षण घेण्याची परवानगी वडिलांनी दिली आणि  नागपूर विद्यापीठातून उल्हासजींनी सुवर्णपदकासह संगीत विषयातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले.  जोडीला पं. राजाभाऊ कोकजे आणि प्रभाकर खर्डेनवीस यांच्याकडूनही त्यांना संगीताचे बहुमोल मार्गदर्शन  मिळाले.

 

संगीताचा ध्यास घेऊन उल्हासजींनी अधिक सखोल अध्ययनासाठी मुंबई गाठली आणि ते पं. राम मराठे आणि पं. गजाननबुवा जोशी यांच्याकडे  पुढील मार्गदर्शन घेऊ लागले.  पं. राजाभाऊ कोकजे, पं. राम मराठे आणि पं. गजाननबुवा जोशी या तीन घराण्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मान्यवर गुरूंकडे दीर्घकाळ तालीम घेतल्याने ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर अशा तीनही घराण्यांची गायकी उल्हासजींनी आत्मसात केली.  अप्रतिम आवाजाची देणगी उल्हासजींना जन्मत: लाभली आहे. त्यावर अखंड रियाज, समर्पित वृत्तीने ज्ञानदान करणाऱ्या गुरूंचा दीर्घ सहवास, स्वत:ची प्रतिभा आणि  संगीतविषयक चिंतन, विचार यांच्या  मुशीतून उल्हासजींची विलक्षण मोहवणारी तयारीची गायकी घडली आहे. ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर गायकीचे सारे रंग एकत्रित स्वरुपात मांडण्याचे  दुर्मिळ कसब उल्हासजींनी आत्मसात केले आहे. मुख्य म्हणजे एखादी संकल्पनाधारित मैफल असेल, तर उल्हासजी या तीनही गायकी स्वतंत्ररीत्याही तितक्याच  उत्कृष्टपणे मांडू शकतात – याचा अनुभवही रसिकांनी अनेकदा घेतला आहे. ग्वाल्हेरची शिस्त, स्वरांचे सूक्ष्म काम, आग्रा घराण्याची आक्रमकता, जोरकसपणा, ठोसपणा आणि जयपूरची बलपेचदार लयकारी यांचा  सुयोग्य मेळ त्यांच्या  गायनात  प्रत्ययास येतो. गायकीतील अस्सलपणा, अभिजातता, गायनातील सौंदर्यतत्त्वांचा बारकाईने केलेला विचार, बंदिशींची  निवड, शब्दोच्चारणातील  नादमयता, सादरीकरणातील शालीनता आणि प्रसन्नता..यांनी परिप्लुत असणारी उल्हासजींची मैफल हा त्यामुळे रसिकांसाठी नेहमीच आनंदाचा ठेवा असतो.  


अनेक कलाकार मैफली करणे, हीच एकमेव इतिकर्तव्यता मानतात, पण उल्हासजींनी इथेही वेगळेपण जपले आहे. संगीताचे अॅकॅडमिक स्थानही त्यांना महत्त्वाचे वाटते. त्यामुळे  त्यांनी  आपल्या  कला कारकीर्दीची सुरवात आकाशवाणीवरील कार्यकारी निर्माता म्हणून केली. १९९२ मध्ये  ते कोलकत्ता येथील जगप्रसिद्ध ‘आयटीसी संगीत रिसर्च अॅकॅडमी’ येथे  गुरू म्हणून जोडले गेले.  तेथील कलापूरक वातावरणात त्यांनी अनेक शिष्य घडवले, आजही हे कार्य सुरूच आहे. गेली २५ वर्षे त्यांचा हा ज्ञानयज्ञ सुरू आहे. देशविदेशात  त्यांची लोकप्रियता  विलक्षण असून, बांगलादेशमधील  ढाका येथील बंगाल परंपरा संगीतालय येथेही ते शिष्यांना  ज्ञानदान करत आहेत. उल्हासजींच्या  ध्वनिमुद्रित गायनाच्या  शेकडो रेकॉर्डस लोकप्रिय आहेत.

 

देशविदेशात  सातत्याने त्यांच्या  मैफलींचे दौरे सुरू असतात.  उल्हासजींच्या  गायनात ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या तिन्ही घराण्यांच्या गायकीचा त्रिवेणी संगम आढळतोच, पण पं. गजाननबुवा जोशी हे गायनाप्रमाणेच व्हायोलीन वादनातही निपुण असल्याने तंतकारीचा अनोखा प्रत्ययही उल्हासजींच्या  सादरीकरणात दिसतो. गजाननबुवांचे गुरू पं. अनंत जोशी (ग्वाल्हेर), वझेबुवा (ग्वाल्हेर), विलायत हुसेनखाँ (आग्रा) आणि भुर्जीखाँ (जयपूर) यांच्याकडून लाभलेले  गानधन उल्हासजींच्या  गायनात प्रतिबिंबित झालेले दिसते. पं. विनायकबुवा  घांग्रेकर यांच्यासारख्या  ज्येष्ठ तबलावादकाच्या  मार्गदर्शनामुळे  लयकारीचे  कित्येक आविष्कार उल्हासजींच्या  गायनाला वेगळ्या उंचीवर नेतात. अनवट आणि जोड रागांचे सादरीकरण, हीदेखील उल्हासजींच्या  गायनाची खासियत आहे. त्यांची धीरगंभीर आलापी, सुरेलता, गांभीर्य, स्वरसंगतींची तार्किकता, रागस्वरुपाचे बारकावे मांडण्याची  पद्धत, द्रुत लयीतील गुंतागुंतीची तानक्रिया, लयीचे विविध पॅटर्न..हे सारे प्रत्यक्ष अनुभवण्याचे विषय आहेत.  आजवरच्या संगीतमय प्रवासात पद्मश्री, संगीत नाटक अकादमी सन्मान, पं. जसराज पुरस्कार, पं. कुमार गंधर्व पुरस्कार, पं. मल्लिकार्जुन मन्सूर पुरस्कार, पं. राम मराठे सन्मान.. अशा कित्येक सन्मानांचे शिरपेच उल्हासजींना लाभले, अजूनही लाभत राहतील..नुकत्याच  मिळालेल्या  तानसेन सन्मानाचाही त्यात  समावेश आहेच.. रसिकांच्या  मनात मात्र दोन जुळलेल्या तानपुऱ्यांमध्ये  आसनस्थ झालेली, सुहास्य मुद्रेची पं. उल्हासजींची गानसमाधी लागलेली मूर्तीच कायम तरळत राहील, यात शंका नाही. ‘दिव्य मराठी’तर्फे पं. उल्हास कशाळकर यांचे हार्दिक अभिनंदन आणि  शुभेच्छा... 

 

सुरेल लयींचा पॅटर्न
 पं. विनायकबुवा  घांग्रेकर यांच्यासारख्या  ज्येष्ठ तबलावादकाच्या  मार्गदर्शनामुळे  लयकारीचे  कित्येक आविष्कार उल्हासजींच्या  गायनाला वेगळ्या उंचीवर नेतात. अनवट आणि जोड रागांचे सादरीकरण, हीदेखील उल्हासजींच्या  गायनाची खासियत आहे. त्यांची धीरगंभीर आलापी, सुरेलता, गांभीर्य, स्वरसंगतींची तार्किकता, रागस्वरुपाचे बारकावे मांडण्याची  पद्धत, द्रुत लयीतील गुंतागुंतीची तानक्रिया, लयीचे विविध पॅटर्न..हे सारे प्रत्यक्ष अनुभवण्याचे विषय आहेत.  

 

- जयश्री बाेकिल, वरिष्ठ प्रतिनिधी, पुणे

बातम्या आणखी आहेत...