आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अस्सल ग्रामीण बाजाचा समाजमनस्क ‘यादवकाळ’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुठलाही साहित्यप्रकार जेव्हा साहित्याच्या विशाल प्रवाहात आपली ओंजळ रिती करत असतो, तेव्हा त्या ‘प्रकारा’चे शास्त्र, व्याकरण, नियमावली यांचीही एक प्रभावळ निर्माण होत असते. यादव सरांचे वैशिष्ट्य असे, की ग्रामीण साहित्य मराठी साहित्यविश्वात ‘इंट्रोड्यूस’ करत असतानाच, या साहित्यप्रकाराचे शास्त्र, व्याकरणही त्यांनी चिकित्सकपणे वाचकांसमोर ग्रंथरूपाने आणले. ‘ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि समस्या’, ‘ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव’, ‘मराठी साहित्य : समाज आणि संस्कृती’, ‘साहित्याची निर्मितीप्रक्रिया’, ‘१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाह’, ‘तिसऱ्या पिढीची ग्रामीण कथा’, ‘मराठी ग्रामीण कथा’..अशा विवेचनात्मक लेखनातून त्यांनीच मराठी साहित्यात आणलेल्या या साहित्यप्रवाहाची त्यांनी स्वत:च निरनिराळ्या काळात चिकित्सा आणि मिमांसा केली आहे.
यादव सरांच्या लेखनातील कमालीचे वैविध्य, हेही एक वैशिष्ट्य मानावे लागेल. कथा, कादंबरी, ललित, वैचारिक, समीक्षा, कविता, बालसाहित्य, वगनाट्य, संपादने..असे अनेक साहित्यप्रकार त्यांनी समर्थपणे हाताळलेले दिसतात. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचा नायक बहुधा शेतमजूर, हमाल, भूमीहीन असतो. बहुतेक सारे जण ‘नाही रे’ गटातले असतात. त्याला स्वत:चे घर नसते, शेत नसते, कर्ज काढून सण साजरे करणाऱ्यांच्या गटातला तो असतो..त्यामुळेच तो बहुसंख्य सामाजिक वास्तवांचे प्रतिनिधित्व करतो. व्यक्तिरेखा, त्यांची बोली, वातावरण..यातून यादव ग्रामजीवनाचा अस्सल, रसरशीतपणा वाचकासमोर आणतात.

खरे तर यादवसरांचे लेखन १९५५ च्या सुमारास कवितालेखनाने सुरू झाले. त्यांनी १९५९ मध्ये लिहिलेली ‘एकलकोंडा’ ही कादंबरी १९८० मध्ये प्रकाशित झाली. पद्य आणि गद्य या दोन्हींवर त्यांचे समान प्रभुत्व होते, हे या संदर्भातून जाणवते. आपल्या जीवनानुभवांना अधिक व्यापक पट मिळावा, या जाणिवेनेच बहुधा ते कथा-कादंबऱ्यांसारख्या लेखनाकडे वळले असावेत. त्यांच्या काव्यप्रतिभेचा उत्कट आविष्कार ‘मायलेकरं’ या दीर्घकाव्यात भेटतो. कथा, कादंबऱ्या, कविता, ललितलेखनासोबतच साहित्यव्यवहाराशी निगडीत असणाऱ्या अन्य प्रश्नांचे चिंतन यादवसरांच्या मनात सुरू असणार, त्यातूनच त्यांची समीक्षा निर्माण झाली. त्यातून स्वत:च्या लेखनप्रवासाचा मागोवा घेतघेत त्यांनी नव्या पायवाटेचे राजरस्ते बनावेत, म्हणून नव्या लेखकांनाही ‘युक्तीच्या चार गोष्टी’ सांगितल्या. आपल्या समीक्षेतून, वैचारिक लेखनातून आणि संपादनांमधून यादव सरांनी ग्रामीण साहित्याच्या नव्या चळवळीला आवश्यक असणारे वैचारिक पाठबळ पुरवले, हे लक्षात घेतले पाहिजे. गो. म. कुलकर्णी तर त्यांना ‘ग्रामीण साहित्याचा भाष्यकार’ असे संबोधून गौरवतात.

ग्रामीण जीवनाचा पट लेखनातून उलगडत असताना यादव सरांनी तो पट ‘वास्तवदर्शी’ राहील, याची कसोशीने काळजी घेतलेली दिसते. त्यांची पात्रे त्या त्या भागातील बोलीभाषेतच संवाद साधतात. ‘बोट कापले’ असे न म्हणता ‘बॉट चिरलं’ असंच म्हणतात, म्हणूनच ती अधिक जवळची, अस्सल ठरतात. बदलते ग्रामीण वास्तव त्यांची लेखणी नेमकेपणाने टिपते. आपल्या भोवताली पसरलेल्या अज्ञानी, अडाणी बहुजन ग्रामीण समाजाचे जीवन रेखाटण्यासाठी ते जाणिवपूर्वक प्रयत्न करताना दिसतात. विशेषत: १९६० नंतरच्या काळातले ग्रामीण जीवन यादव सरांच्या लेखनातून जिवंतपणे उतरलेले दिसते. ग्रामीण भागातला युवा लिहिता झाला पाहिजे, त्याच्यावर साहित्याचे संस्कार झाले पाहिजेत, म्हणून त्यांनी आवर्जून लेखन केले आहे. यादव सरांनी जसे उत्साहाने ग्रामीण साहित्याचे लेखन केले, तितक्याच उत्साहाने ग्रामीण साहित्य चळवळीवर झालेले हल्लेही परतवले. नेमका युक्तिवाद, तर्कसंगत मांडणी हीच त्यांची आयुधे राहिली. तत्कालीन ग्रामीण कथा लिहिणारे लेखक ( शंकर पाटील. द. मा. मिरासदार) प्रमाण मराठीचा वापरही मुबलक करत, पण यादव सरांनी प्रमाण आणि बोली, यातले अंतर संपवले. त्यांची पात्रे बोलीभाषेतच संवाद साधत. त्यामुळे ती वाचकाच्या अंतरंगी थेट प्रवेश करते. स्वातंत्र्योत्तर काळात बहुजन ग्रामीण समाजात निर्माण झालेल्या जाणीवजागृतीची स्पंदने अचून हेरून तिला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न यादव सरांनी केला. त्यातूनच १९७५ च्या सुमारास ग्रामीण साहित्याची चळवळ सुरू झाली. दलित साहित्य चळवळीपाठोपाठ उदयास आलेला हा महत्त्वाचा सांस्कृतिक उद्रेक मानला जातो. यादव सरांनी याचे भान ठेवत ग्रामीण साहित्याच्या समीक्षेचे दालनही आपल्या लेखनाने समृद्ध केले. मुख्य म्हणजे कोणत्याही साहित्यप्रकारात ‘केवळ आली लहर’ म्हणून यादवांनी लेखन केले नाही, तर तो तो साहित्यप्रकार स्वीकारण्यामागे आविष्काराची अपरिहार्यता होती, म्हणूनच लिहिले. त्यामुळेच ते विविध साहित्यप्रकारांतून सारख्याच ताकदीने लेखन करत राहिले. अर्थात त्यांच्या समग्र साहित्यनिर्मितीचा गाभा राहिलेला विषय ‘ग्रामीण जीवन’ हाच होता. आपणच निर्माण केलेल्या किंवा मळलेल्या वाटेने न जाता अनुभवांच्या आणि आविष्काराच्या नव्या वाटा चोखाळण्याचा प्रयत्न यादव सरांनी सातत्याने केला. त्यांच्या साहित्यातून त्यांची प्रतिमा उभी राहते ती समाजमनस्क लेखक म्हणूनच.
आपल्या जाणिवांशी त्यांनी तडजोडी केलेल्या फारश्या दिसत नाहीत. ते समकालीन कलावादी जाणिवांतून लवकर मोकळे झाले आणि त्यांचा साहित्यविचार जीवनसापेक्ष, जीवनसन्मुख झाला, असे निरीक्षण मान्यवर लेखकांनी नोंदवले आहे. संस्कृत साहित्यविचार आणि पश्चिमेकडील आयात साहित्यविषयक संकल्पना एतद्देशीय साहित्याच्या मूल्यमापनासाठी अपुऱ्या ठरतात, हे मत यादव सरांनीच नोंदवले आहे, त्याची आठवण इथे होते. थोडक्यात एकाच वेळी सृजनशील साहित्यिक आणि चिकित्सक वाङ्मयविमर्शक या दोन्ही बाजू त्यांच्या व्यक्तित्वात एकवटल्या होत्या, असे म्हणता येईल. त्यांच्या जाण्याने अस्सल ग्रामीण बाजाचा पण समाजमनस्क ‘यादवकाळ’च हरवल्याची भावना संवेदनशील वाचकांच्या मनात राहील, यात शंका नाही.
साहित्य गतिशील बनवले...
सामान्य ग्रामीण माणसाचे सुखदु:ख हाच त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातून त्यांच्या कथा अधिकाधिक संवादमय होताना दिसतात. ‘साहित्याचे आविष्कारमाध्यम म्हणून ग्रामीण भाषेचा फारसा विचार झालेला नाही,’ याची खंत यादव सरांना नेहमीच वाटत आली. ग्रामीण माणसाचे मन आविष्कृत करायचे असेल तर त्याच्या भाषेचाच अवलंब केला पाहिजे, हे त्यांचे मत होते. मराठी साहित्याचा व्यवहार बहुतांशी समाजातील विशिष्ट वर्गात घोटाळताना दिसत असला तरी त्यातून निर्माण झालेल्या ‘स्थितीशीलते’ला यादव सरांनी ‘गतीशीलता’ दिली, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही.
जयश्री बोकील
सिनियर रिपोर्टर
बातम्या आणखी आहेत...