आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Journalist Hussen Zaidi About Yakub Maiman And Pakistan

याकूबच्या जबाबामुळेच पाकिस्तानचा सहभाग उघड पत्रकार हुसेन झैदी यांचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याकूबच्या जबाबामुळेच पाकिस्तानचा सहभाग उघड पत्रकार हुसेन झैदी यांचा दावा
मुंबई बॉम्बस्फोटातील अाराेपी याकूब मेमनला फाशी दिली जाणार आहे. त्याच्या शिक्षेबद्दल अनेक मतप्रवाह दिसतात. मात्र, या घटनेतील नेमके सत्य काय आहे, हे सुरुवातीपासून या प्रकरणाचे वार्तांकन केलेले ज्येष्ठ पत्रकार हुसेन झैदी यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न ‘दिव्य मराठी’ने केला.
प्रश्न : ही संपूर्ण केस आपण सुरुवातीपासून पाहिली आहे. या घटनेवर आपण ‘ब्लॅक फ्रायडे’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे. तुम्ही याकूबलाही पाहिले आहे. त्याच्याबद्दल काय जाणवले?
झैदी : या केसमधून अापण बाहेर पडू अशी याकूबला अाशा होती. म्हणूनच तो तपास यंत्रणांना मदत करण्याच्या भूमिकेत होता. सुरुवातीला तपास यंत्रणाही त्याला या केसमध्ये गोवण्याच्या मानसिकतेत नव्हत्या; पण पुढे पुढे तो आपल्याच काही कबुली जबाबांमुळे या केसमध्ये गुरफटत गेला.
प्रश्न : याकूब खरोखरच तपास यंत्रणांना मदत करण्याच्या उद्देशाने विदेशातून परत भारतात आला होता की त्याचा आणखी काही हेतू होता?
झैदी : याकूबचे भारतात परतण्याचे दोन हेतू होते. एक म्हणजे त्याला खरोखरच तपास यंत्रणांना मदत करायची होती आणि दुसरे म्हणजे या सर्व प्रकरणातून त्याला आपल्या कुटुंबाला बाहेर काढायचे होते. मुंबईतील बॉम्बस्फोटाची भीषणता त्याला दुबईत पळून गेल्यावर कळली. इथे आपल्याला अटक करून भारतीय तपास यंत्रणांच्या हवाली केले जाईल, अशी भीती वाटल्याने संपूर्ण कुटुंब पाकिस्तानात पळून गेले. तिथून परत ते बँकॉकला गेले; पण या सगळ्या भ्रमंतीत त्यांना मोकळेपणाने फिरण्याचे स्वातंत्र्य नव्हते. जरी ते एका आलिशान महालात राहत असले तरी सतत नजरकैदेत होते. सीबीआयला दिलेल्या कबुलीजबाबातही याकूब म्हणतो की, ‘मला आणि माझ्या वडिलांना फक्त नमाजसाठी बाहेर पडण्याची परवानगी असे.’ ही सगळी परिस्थिती पाहता टायगर मेमनने त्यांना सांगितले की, ‘तुमचा या कटात सहभाग नसल्याने तुम्हाला भीती नाही, पण इथल्या सरकारने जर सर्व कुटुंबीयांना भारताकडे सुपूर्द केले तर परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि पुढे काहीच करता येणार नाही.’ त्यामुळे याकूबने वृद्ध आईवडील आणि स्वत:च्या कुटुंबीयांसह भारतात परतण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी त्याने चार ते सहा महिने या केसचा अभ्यासही केला.
प्रश्न : या बाॅम्बस्फोटाच्या कटात याकूबचा कसा सहभाग होता?
झैदी : खरे तर या कटासाठी सहभागी व्यक्तींना पाकिस्तानात दिलेले ट्रेनिंग असो, स्फोटकांची वाहतूक असो, बॉम्ब ठेवण्याची प्रक्रिया असो किंवा कट शिजताना आखलेली योजना असो, अशा कुठल्याही प्रक्रियेत याकूबचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता; पण हवालामार्फत झालेली पैशांची देवाणघेवाण त्याच्यामार्फत झाली. तसेच पाकिस्तानात ट्रेनिंगसाठी पाठवलेल्या सहा जणांचे तिकीट बुकिंग याकूबने केले होते. मात्र, त्याच्या म्हणण्यानुसार हे सहा जण कशासाठी चालले आहेत, हा पैसा कशासाठी वापरला जाणार आहे याची त्याला कल्पना नव्हती. आपला भाऊ एक स्मगलर आहे हे त्याला ठाऊक होते आणि त्याच कामाचा हा एक भाग असावा असे त्याला वाटले. विशेष म्हणजे याकूबचा या कटात सहभाग होता, असे स्पष्टपणे सीबीआयलाही सिद्ध करता आले नाही. चार्जशीटमध्येही त्याबाबत स्पष्टता नव्हती. फक्त रफिक माडी आणि अमजद मेहेरअली बक्ष या दोघांच्या जबाबात याकूबचा उल्लेख होता. ‘मला टायगरने सांगितले होते की, जेव्हा पैसे लागतील तेव्हा तू हवालामार्फत ते मागवून याकूबला दे,’ एवढेच याकूबने जबाबात म्हटले अाहे. तसेच अमजद जबाबात म्हणाला होता की, ‘हातबॉम्बने भरलेली एक जीप आणून यातला माल काढून ठेवायला कुणाला तरी सांग असे मी याकूबला सांगितले होते.' यातून कुठेही स्पष्टपणे याकूबचा सहभाग दिसत नाही. पुढे हे जबाब या दोघांनी मागेही घेतले होते.
प्रश्न : खरे तर याकूबइतकेच गुन्हेगार अॅडिशनल कस्टम कमिशनर एस. एन. थापा आणि इतर कस्टमचे अधिकारीही होते. कारण स्फोटके उतरवण्यात त्यांचा सहभाग होता. मग त्यांना कशी कमी शिक्षा झाली?
झैदी : थापाने जो बचाव केला होता त्यात तो म्हणाला होता की, ‘आपण आपल्या टीमसह एका ठिकाणी तैनात होतो. तिथून स्मगलिंग केलेल्या मालाचा एक साठा जाणार असल्याची बातमी आम्हाला गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती; पण आम्हाला चुकवून हा साठा दुसऱ्याच मार्गाने गेला.' त्यामुळे थापा आणि इतर अधिकाऱ्यांचा कटातला सहभाग स्पष्ट नव्हता. त्याचा फायदा त्यांना झाला.
प्रश्न : एकीकडे याकूबला असे वाटत होते की तो माफीचा साक्षीदार बनेल, पण तपास यंत्रणांनाही तसेच करायचे होते की याकूबला या केसमध्ये गोवायचा त्यांचा प्रयत्न होता?
झैदी : याकूबला या केसमध्ये गोवण्यापेक्षा यंत्रणांना त्याच्या आधारे टायगर आणि दुसरा भाऊ अयुबला जाळ्यात अोढायचे होते, पण जेव्हा त्यांच्या लक्षात आले की, याकूबकडून आपल्याला जेवढी माहिती मिळाली त्यापेक्षा अधिक त्याचा फायदा होणार नाही. तसेच टायगर आणि अयुबही हाती येत नाहीत. त्या वेळी मग याकूबलाच मुख्य आरोपी केले गेले.
प्रश्न : याकूबचे डेथ वाॅरंट ३० एप्रिलला निघाले. मात्र, त्याची कल्पना त्याच्या कुटुंबीयांना अडीच महिन्यांनंतर दिली गेली. याचा अर्थ काय होतो?
झैदी : कदाचित ३० एप्रिलला कल्पना देण्यात आली असती तर याकूबच्या बचावासाठी त्याच्या कुटुंबीयांना अधिक वेळ िमळाला असता. कदाचित तो मिळू नये म्हणून डेथ वॉरंटची कल्पना उशिरा देण्यात आली असावी, असा निष्कर्ष काढण्यास वाव आहे.
प्रश्न : याकूबच्या मदतीशिवाय ही केस मजबूत झाली असती का ?
झैदी - तपास यंत्रणांची सारी भिस्त साक्षीदार क्रमांक दोन असलेल्या उस्मान जानखान याच्या जबानीवर होती. या केसमध्ये दोषी सिद्ध झालेल्या जवळपास शंभर आरोपींपैकी जवळपास पन्नास ते साठ आरोपींवरचे गुन्हे उस्मान जानखान याच्या जबानीवरूनच सिद्ध होऊ शकले. हा कट शिजत असताना योजना तयार करण्यापासून स्फोटके उतरवणे, बाॅम्ब बनवणे आणि ठेवणे अशा प्रत्येक टप्प्यावर उस्मान सहभागी होता. तो म्हसळा, श्रीवर्धनलाही जाऊन आला होता. त्यामुळे इतर आरोपींबाबत याकूबचा फारसा फायदा यंत्रणांना झाला नाही; पण या केसमधला टायगर मेमन आणि पाकिस्तान सरकारचा सक्रिय सहभाग याकूबमुळे सिद्ध झाला. कारण मेमन कुटंुंबीयांसाठी वेगवेगळ्या नावाने तयार केलेले पासपोर्ट असो किंवा सगळ्यांसाठी सुरक्षित ठिकाणांची व्यवस्था करणे या सगळ्या प्रक्रियेत पाकिस्तानी सरकारचा थेट सहभाग त्याच्या जबानीमुळे उघड झाला. तोपर्यंत आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेचे काही अधिकारी किंवा पाकिस्तानी स्मगलर्सचा यामागे हात असावा असाच तपास यंत्रणांचा कयास होता.