आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिसलब्लोअर सुरक्षेचे काय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्ताधारी किंवा प्रभावशाली व्यक्तींच्या गैरकारभाराचा पर्दाफाश करणार्‍या व्हिसलब्लोअरच्या (जागल्या) जीवाला कायम धोका असतो. अशी प्रकरणे उजेडात आणणार्‍यांना आपला जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे याला लंडनमधील इक्वेडोर दूतावासात आर्शय घ्यावा लागला आहे तर अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या प्रिझम या हेरगिरी प्रकल्पाचा पर्दाफाश करणार्‍या एडवर्ड स्नोडेनला देखील इकडून तिकडे फिरावे लागत आहे.

एखाद्या सरकारी संस्थेत किंवा खासगी विभागात होत असलेला भ्रष्टाचार, गैरप्रकार, बेकायदेशीर काम बाहेर काढणार्‍या व्यक्तीला व्हिसलब्लोअर म्हटले जाते. अशा प्रकारची प्रकरणे हे लोक माध्यमे आणि जबाबदार संस्थेसमोर मांडतात. कायद्याची पायमल्ली ते भ्रष्टाचारांच्या प्रकरणापर्यंत कोणत्याही घटनेचा यात समावेश असू शकतो. सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे व्हिसलब्लोअर तो व्यक्ती असतो जो चुकीच्या कामांचा भंडाफोड करतो. अंतर्गत (इंटरनल) आणि बाहेरील (एक्सटर्नल) व्हिसलब्लोअर असे दोन प्रकारचे जागले आहेत. अंतर्गत जागल्या हा एखाद्या कंपनीत किंवा विभागात आपले सहकारी किंवा वरिष्ठ करत असलेला गैरप्रकार, भ्रष्टाचार बाहेर काढतो, तर बाहेरील जागल्या हा कंपनी किंवा सरकारी विभागात काम करत नाहीत, परंतु आपल्या सूत्रांकडून मिळालेली माहिती, ठोस पुरावे आणि गोपनीय माहिती माध्यमे, कायदेशीर संस्थांच्या समोर मांडतात. जागल्याकडून जनहिताची अपेक्षा केली जाते. लोकांना खरी बाजू कळावी, अशी त्यांची इच्छा असते.


सुरक्षेचे उपाय काय ?
अनेक देशांत व्हिसलब्लोअर सरकार,कंपन्या,शासकीय कामातील गैरप्रकारांना वाचा फोडत आहेत. अनेक धक्कादायक माहिती जनतेसमोर आणत आहेत, पण अशा प्रकाराविरोधात आवाज उठवणार्‍या व्यक्तींच्या सुरक्षेचे काय ? अशा प्रकारांविरोधात आवाज उठवणार्‍यांना आपला जीव मुठीत धरून लपून राहावे लागते किंवा त्यांचा बळी तरी जातो.

संरक्षणासाठी परदेशात कायदे
एखादा गैरप्रकार उजेडात आणल्यानंतर व्हिसलब्लोअरच्या जीवाला आणि करिअरला धोका निर्माण होतो. हा धोका टाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे ‘फाल्स क्लेम्स अँक्ट ’. अमेरिकेत 1863 मध्ये हा कायदा तयार करण्यात आला. याचा मुख्य उद्देश खुलासा करणार्‍या व्यक्तीचे संरक्षण करणे हा होता. यानंतर अमेरिकेने आपल्या देशातील व्हिसलब्लोअर्सना संरक्षण देणे आणि नाव गुप्त ठेवण्याच्या उद्देशाने ‘ व्हिसलब्लोअर प्रोटेक्शन अँक्ट 1989’ लागू केला. इंग्लंडमध्ये ‘पब्लिक इंटरेस्ट डिस्क्लोजर अँक्ट ऑफ 1998’ लागू करण्यात आला. नार्वेत देखील जानेवारी 2007 मध्ये अशा स्वरूपाचा कायदा तयार करण्यात आला, तर जमैकामध्ये 2011 मध्ये व्हिसलब्लोअरच्या सुरक्षेसाठी कायदा तयार करण्यात आला.

भारतात कायद्याची प्रतीक्षा
भारत सरकार व्हिसलब्लोअरांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने ठोस कायदा तयार करण्याच्या तयारीत आहे. यासाठी डिसेंबर 2011 मध्ये लोकसभेत ‘द व्हिसलब्लोअर प्रोटेक्शन बिल’ मंजूर करण्यात आले, पण हे विधेयक राज्यसभेत प्रलंबित आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे इंजिनिअर सत्येंद्र दुबे यांच्या हत्येनंतर व्हिसलब्लोअरच्या संरक्षणाचा मुद्दा तीव्र झाला होता. नोव्हेंबर 2003 मध्ये 30 वर्षीय सत्येंद्र दुबे यांची हत्या करण्यात आली. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना महामार्ग निर्मितीमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची माहिती पत्राद्वारे लिहून कळवली होती. सत्येंद्रने आपले नाव गोपनीय ठेवण्याचा आग्रह केला होता, पण हे पत्र विविध विभागातून गेल्याने त्यांचे नाव उजेडात आले. परिणामी त्यांची हत्या झाली. या हत्येनंतर सर्वोच्च् न्यायालयाने एप्रिल 2004 मध्ये ‘द पब्लिक इंटरेस्ट डिस्क्लोजर अँड प्रोटेक्शन ऑफ इन्फॉर्मस रिजोल्यूशन 2004’ विधेयक मंजूर करण्याचे आदेश सरकारला दिले. 19 नोव्हेंबर 2005 मध्ये आयएमएम पदवीधर मंजुनाथ षणमुघमच्या हत्येनंतर व्हिसलब्लोअरांच्या संरक्षणासाठी कायदा करण्याची मागणी तीव्रतेने होऊ लागली. मंजुनाथ यांनी पेट्रोल भेसळ आणि त्यामागील पेट्रोल माफियांचा पर्दाफाश केला होता. एवढे सर्व होऊन सुद्धा देशात आजही व्हिसलब्लोअरांचे रक्षणार्थ एकही कायदा नाही. द व्हिसलब्लोअर्स प्रोटेक्शन विधेयक कठोर करावे, अशी माहिती अधिकार कार्यकर्ते करत आहेत.

पुढील स्लाइडमध्ये काही प्रसिद्ध व्हिसलब्लोअर्स