आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Justice Mukul Mudgal Article In Marathi, Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जस्टिस मुकुल मुद्‍गल: संगीताच्या वातावरणात वाढले अन् वकील बनले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

*आयपीएल स्पॉट फिक्सिंग चौकशी समितीचे प्रमुख

चर्चेचे कारण : त्यांनी नुकताच आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर केला. त्यात बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई मयप्पन यांना दोषी ठरवले आहे.

० जस्टिस मुकुल मुद्‍गल/ जन्म : 4 जाने. 1949, नवी दिल्ली
० वडील : पं. विनय चंद्र मौदगल्य गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक
० शिक्षण : मॉडर्न स्कूल, बाराखंबा रोज, नवी दिल्लीमधून शालेय शिक्षण, हिंदू कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून बीएस्सी (ऑनर्स), लॉ फॅकल्टी, दिल्ली विद्यापीठातून एलएलबी.


जस्टिस मुकुल मुद्गल यांच्या लहानपणापासूनच घरी संगीताचे वातावरण होते. वडील प्रोफेसर विनयचंद्र मौदगल्य यांनी भारतीय संगीत आणि शास्त्रीय नृत्याच्या प्रसिद्ध डान्स स्कूलपैकी एक गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. मुकुल यांचे भाऊ मधुप व बहीण माधवी यांनी वडिलांचा वारसा पुढे नेला, पण मुकुल यांनी वेगळा मार्ग निवडला. पद्मश्री मधुप प्रसिद्ध शास्त्रीय गायक आहेत. बहीण माधवी ओडिसी नृत्यांगना आहेत.
जस्टिस मुकुल यांना संगीताऐवजी खेळांमध्ये विशेषत: स्विमिंगमध्ये रुची होती. मॉडर्न स्कूलमध्ये ते स्विमिंग टीमचे सदस्य होते. 1968-69 मध्ये हिंदू महाविद्यालय आणि दिल्ली विद्यापीठाकडून त्यांनी अ‍ॅक्वाटिक्स आणि वॉटर पोलो टीमचे प्रतिनिधित्व केले. लॉ फॅकल्टी अ‍ॅक्वाटिक्स टीमचे कॅप्टन होते. एलएलबी केल्यानंतर 1973 मध्ये ते वकील बनले. दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांन प्रॅक्टिस सुरू केली. सुप्रीम कोर्टात त्यांनी 1978 पासून फेब्रुवारी 1998 पर्यंत वकिली केली. 1989 मध्ये माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली जे. सोराबजी यांच्यासह बंदी घालण्यात आलेल्या 8 क्रिकेटपटूंंचा खटला त्यांनी यशस्वीपणे लढला. 25 वर्षांचा वकिलीचा अनुभव प्राप्त केल्यानंतर 2 मार्च 1998 ला ते दिल्ली उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश बनले. न्यायाधीश असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय सुनावले. यात दिल्लीच्या उपहार सिनेमा कांडातील पीडितांना नुकसानभरपाई देण्याच्या निर्णयाचाही समावेश होता. 5 डिसेंबर 2009 ला ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आणि 3 जानेवारी 2011 रोजी निवृत्त झाले.
जस्टिस मुद्गल यांनी प्रसिद्ध शास्त्रीय गायिका शुभा मुद्गल यांच्याशी विवाह केला होता, पण त्यांचा घटस्फोट झाला. दोघांचा एक मुलगा आहे. तोही एका ब्रँडशी संलग्न आहे.

जस्टिस मुद्गल यांचा नॅशनल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट बिल बनवण्यात सहभाग होता. बीसीसीआयसह सर्व क्रीडा संघटना आरटीआयच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव त्यात आहे. 2011 मध्ये आठ अ‍ॅथलिट डोपिंग चाचणी पॉझिटिव्ह सापडले होते. या प्रकरणाची चौकशीही त्यांच्याकडेच होती. त्यांना क्रिकेटबद्दल विशेष प्रेम आहे. जेव्हा गॅरी सोबर्स यांच्या नेतृत्वातील वेस्ट इंडिजच्या संघाने फिरोज शाह कोटला मैदानात भारताविरुद्ध कसोटी खेळली होती तेव्हा त्यांना बसण्यासाठी जागाही मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांना उभ्यानेच सामना पाहावा लागला होता. शाळांमध्ये अभ्यासक्रमात खेळाचा विषय सक्तीचा करणे गरजेचे असल्याचे त्यांचे मत आहे.