आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीमेवरील कदियाल पाक गोळीबारापासून मुक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कदीयाल (भारत-पाक सीमा) - संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेले शियाचिन ग्लेशिअरमधील सर्वोच्च शिखर पाकिस्तानच्या ताब्यातून हिसकावण्यात मोठा पराक्रम गाजविणारे कॅप्टन बाणासिंह शेतीमध्ये रममाण झाले आहेत. परमवीरचक्र या सर्वोच्च पुरस्काराने २८ वर्षांपूर्वी गौरविल्यानंतरही बाणासिंह यांचे पाय जमिनीवर आहेत. आर. एस. पुरा सेक्टरमधील सीमेपासून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या त्यांच्या कदीयाल गावात मात्र अद्याप पाकिस्तानचा गोळा पडलेला नाही. परमवीरचक्र पुरस्कार मिळाल्यानंतर नोकरीच्या मोठ्या ऑफर धुडकावत गाव, कुटुंब आणि समाज यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे बाणासिंह यांनी सांगितले.

जम्मू आणि काश्मिर मधील भारत -पाक सीमा पेटलेली आहे. सिमेलगतच्या चार ते पाच कि. मी. अंतरावरील अनेक गावे रिकामी करण्यात आलेली आहेत. कधी शत्रुसैन्याचा गोळा घरावर पडेल या भितीने नागरिकांनी गावे सोडून सैन्याच्या शिबीरात आश्रय घेतला आहे. पाककडून होणारा सततचा गोळीबार आणि तोफांच्या माऱ्यामुळे नागरिक जीव मुठीत धरून गाव, घर समाज सोडून जात आहेत. अशा स्थितीत परमवीरचक्र पुरस्कार प्राप्त बाणासिंह मात्र आपल्या गावात आणि अगदी सिमेच्या जवळ तळ ठोकून आहेत. परिसरातील सुचेतगड, रामगड आदी गावांवर पाकचे गोळे पडत असताना कदीयालवर मात्र एकही गोळा आलेला नाही. गावातही सर्वात शेवटी पाक सिमेच्या दिशेला त्यांचे घर आहे.

बाणासिंह यांना १९८८ मध्ये सर्वोच्च पुरस्कार परमवीरचक्र देऊन गौरविण्यात आले. पाकिस्तानच्या ताब्यातील कायदेआझम जिना पोस्ट त्यांनी मिळविली होती. दोन मोहिमा अयशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या मोहिमेचे नेतृत्व बाणासिंह यांनी केले होते. उणे ४५ डिग्री तापमानात दहा पाक सैनिकांना यमसदनी पाठवून त्यांनी पोस्टवर ताबा मिळविला होता. जगातील कधी न लढलेली आणि भविष्यात न होणाऱ्या सर्वाधिक उंचावरील (२१ हजार १८३ फुट) लढाईत गाजविलेल्या पराक्रमानंतर भारत सरकारने जिना पोस्टचे बाणाटॉप असे नामकरण केले. पाकिस्तान आणि भारताकडून ८० कि.मी. परिसरात बाणापोस्टवरून नियंत्रण ठेवता येते.

आठ जम्मू आणि काश्मिर लाईट इन्फंट्री या आपल्या रेजिमेंटमधून बाणासिंह २००० मध्ये निवृत्त झाले. निवृत्तीनंतर मोठ्या नाेकरीच्या ऑफर आल्या परंतु त्या धुडकावत बाणासिंह यांनी कुटुंब, गाव आणि समाजात राहणेच पसंत केले. चार भावांच्या विस्तारात तीन एकर जमीन त्यांच्या वाट्याला आली. एक मुलगा त्यांच्याच बटालियनमध्ये चार वर्षांपूर्वी भरती झाला. एका मुलाचे निधन झाले तर त्यांच्या दोन मुलींचे लग्न झालेले आहे.

कदीयाल या गावी बाणासिंह आर. एस. पुरा नामक तांदूळ पिकवितात. उपरोक्त तांदूळास शंभर ते १४० रूपये प्रतिकिलो इतका भाव मिळतो. तांदूळानंतर गव्हाचे पीक घेण्यात येते. गावात दोनशे शिख्ख, तितकीच आदिवासी व पन्नास अनुसूचित जातीची घरे आहेत. भारतीय सैन्य तथा निमलष्करी दलांचे अधिकारी व जवान मार्गदर्शन घेण्यासाठी बाणासिंह यांच्याकडे येत असतात. परिसरातील शाळांच्या सहलीही त्यांनी लढलेल्या चित्तथरारक युद्धाची कहानी ऐकण्यासाठी येतात. सैन्यादलांच्या गाड्या ह्या बाणासिंहकडे येणे म्हणजे नित्याचीच बाब आहे. देशभरातून विविध कार्यक्रमांसाठीही त्यांना निमंत्रणे येत असतात परंतु ६९ वर्षीय बाणासिंह आता जास्त फिरणे टाळतात. सैन्याप्रमाणे निमलष्करीदलांनाही सुविधा देण्यात याव्यात असे त्यांना वाटते. पूर्वी चक्र पुरस्कार प्राप्त जवानांना पन्नास ते दीडशे रूपये अतिरिक्त भत्ता दिला जायचा. परमवीरचक्र प्राप्त योद्ध्याला जम्मू आणि काश्मिर सरकारने १०,७०० रूपये प्रतिमाह भत्ता दिल्यानंतर केंद्राने अलिकडे तिन वर्षांपासून प्रतिमाह दहा हजार देण्यास प्रारंभ केला. निवृत्तीनंतर आपण खूप वर्षे भत्ता वाढून मिळावा यासाठी केंद्रासोबत लढल्याचे त्यांनी सांगितले. दूसऱ्या महायुद्धात लढलेल्या व्हिक्टोरिया क्रॉस पुरस्कार प्राप्त जवानांचा आजही ब्रिटीश सरकार सन्मान करीत आहेत. भारतामधील पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश आदी राज्यांमध्ये सैनिकांचा गौरव अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...