आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागास उद्योजकांचा टक्का वाढण्यासाठी ‘केंद्र’ अनुकूल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्योग-व्यवसाय असे क्षेत्र आहे, जिथे उद्यमशील व्यक्ती जर मागास प्रवर्गातील, आदिवासी, बहुजन असेल तर त्यांना यशस्वी होण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. त्यामुळे आवर्जून नमूद करावेसे वाटते की, पुढारलेल्या समाजातील उद्योजकांबरोबर मागासवर्गीयांनाही खूप मोठी संधी उपलब्ध आहे. नवउद्योजकांसाठी सध्या छोटेखानी उद्योगांसाठी एक कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज कमीत कमी कागदपत्रांच्या आधारावर उपलब्ध करून दिले जात आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडियासारख्या योजना उपेक्षित उद्योजकांना पुढे येण्याचे आवाहन करीत आहेत. मागास उद्योजकांसाठी विशेष सोयी-सवलती असून योजनांची मोबाइलवर सहजासहजी माहिती मिळते. देशातील पहिल्या शंभर उद्योजकांमध्ये वंचित उद्योजकांची नावे नसायची. आता मात्र काळ बदलला असून मागास उद्योजक देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी मोलाचा हातभार लावत आहेत. अर्थात, मागासवर्गीय उद्योजक म्हणून स्वत:ला सिद्ध करताना कोणती आव्हाने समोर आली, असा प्रश्न मला नेहमीच विचारला जातो. उद्योजक म्हणून प्रत्येकालाच आव्हानांना सामोरे जावे लागते. परंतु मागास प्रवर्गातील उद्योजकांना सामाजिक आणि आर्थिक अशा दुहेरी आव्हानांना सामोरे जावे लागते. कर्ज मिळवण्यापासून संघर्ष सुरू होतो. कोणत्याही बँकेत अगदी पतपेढीतही कर्ज मिळवण्यासाठी सर्वप्रथम तारण असावे लागते. आजही बहुसंख्य मागास प्रवर्गातील उद्योजकांकडे तारण म्हणून मालमत्तेचा अभाव आहे. काही अपवाद सोडल्यास घर, स्थावर मालमत्ता किंवा तारण राहू शकेल, अशी व्यक्ती बहुजनांच्या कुटुंबात आढळत नाहीत. दुर्दैवाने गरीब, पीडित, मागास व्यक्तींच्या सचोटी आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवून अर्थसाहाय्य करण्यास कोणीही पुढे येत नाहीत. अशा वेळी उद्योग-व्यवसायातच नव्हे तर सर्व क्षेत्रांमध्ये यशस्वी होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. शतकोत्तर रौप्यमहोस्तवी वर्षानिमित्त मागे वळून पाहिल्यास आताचा काळ अधिक सुसह्य वाटू शकणारा आहे. देशात शिक्षणाची सोय नसताना, त्या महामानवाने शिक्षण घेऊन स्वत:बरोबरच इतरांना शिक्षणाची कवाडे उघडी केली. आदिवासी, मागासवर्गीय सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. वंचितांना घटनेद्वारे आरक्षणाची तरतूद केली. त्याचा सर्वांना फायदा होताना दिसत आहे. हल्ली आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर
आला आहे. माझ्या मते, दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला आरक्षण मिळायला हवे. सरकारी, खासगी उद्योगांमधून गरिबांना नोकरीसंदर्भात आरक्षण असायला हवे. गरिबांना विशेषत: मागासवर्गीयांना शिक्षण, जीवनात उभे राहण्यासाठी आरक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. त्या काळात बाबासाहेब एकटे होते, तरीही शिक्षणाच्या मार्गाने आम्हा सर्वांना संघटित करून संघर्षाला प्रेरित करत होते. आता आमच्यासोबत बाबासाहेबांचे विचार आणि त्यांनी घडवलेला समाज आहे. हक्क मागून मिळत नसतात, तर ते पात्रतेच्या बळावर हिसकावून घ्यावे लागतात. त्यासाठीच शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र त्यांनी दिला असून तो आम्ही आत्मसात केला आहे. *शब्दांकन : विकास नाईक
बातम्या आणखी आहेत...