आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Chief Balasaheb Thackeray Second Death Anniversary News In Marathi

बाळासाहेबांच्‍या झंझावाताने जालना भगवामय!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1995 च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनाप्रमुखांनी आपल्या झंझावाती दौ-याने महाराष्‍ट्र पिंजून काढला होता. याचाच एक भाग म्हणून त्यांनी जालना जिल्ह्यातही तीन सभा घेतल्या होत्या. 20 मार्च 1994 ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जालना जिल्ह्यात आले होते. पैठणची सभा आटोपून त्यांनी अंबड येथे शिवाजी चोथे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. त्यांच्या या सभेला जिल्हाभरातून शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यामुळेच अंबड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिवाजीराव चोथे यांनी काँग्रेसचे विलासराव खरात यांचा पराभव केला. अंबड विधानसभा मतदारसंघावर विलासराव खरात यांची घट्ट पकड होती. मात्र, शिवसेनाप्रमुखांच्या सभेने सर्वच वातावरण बदलले.

त्यानंतर त्यांनी जालना आणि बदनापूर येथे सभा घेतल्या. जालन्यातही शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि बदनापूर मतदारसंघातून नारायण चव्हाण विजयी झाले. त्याशिवाय भोकरदन मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी झाला. त्यांनीही शिवसेना सत्तेवर येताच अर्जुन खोतकर यांना राज्यमंत्रिपद दिले. 1995 च्या निवडणुकांपूर्वी 1987 आणि 1989 मध्ये शिवसेनाप्रमुखांच्या जालन्यात सभा झाल्या. या सभांना आझाद मैदानावर अलोट गर्दी झाली होती. 1995 च्या सभेच्या वेळीही असेच चित्र होते. सुरुवातीच्या काळात 1985 मध्ये जालना शहरातील पंचमुखी महादेव मंदिर भागात बद्रीप्रसाद सोनी यांनी शिवसेनेची पहिली शाखा स्थापन केली. त्यांना सखाराम मिसाळ, देवचंद चौधरी, किसनलाल कोठोठीवाले, गणेश येलगुंद, रावसाहेब राऊत, बिहारीलाल परदेशी यांनी साथ दिली. त्यानंतर अनेक प्रश्नांवर मोर्चे, आंदोलने, धरणे आंदोलने करण्यात आली.

दरम्यानच्या काळात जिल्ह्यात शिवसेना वाढत गेली. त्यानंतर पंचायत समित्या, नगरपालिका, जिल्हा परिषद अशी सत्तास्थाने शिवसैनिक मिळवत गेले. मात्र, या सर्वांचा पाया होता तो शिवसेनाप्रमुखांचा विचार. त्यांच्या विचाराने जालन्यात शिवसेनेची लाटच आली. सर्वसामान्य कार्यकर्ताही राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आला. यानिमित्ताने कार्यकर्त्यांना राजकारभार चालवण्याची संधी मिळाली.