आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबुज: घसादुखीचा फायदा की तोटा?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकारणात घसा खणखणीत तर नेत्याची प्रतिमा मुलूखमैदानी तोफेसारखीच मानली जाते. बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, राज ठाकरे, छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे अशी कितीतरी नेत्यांची उदाहरणे देता येतील. त्यामुळे घसा खणखणीत कसा राहील याकडे सर्वांचाच कटाक्ष असतो. घसादुखी झाली की त्याचा फटका नेहमीच सामोरे जाव्या लागणा-या राजकीय पोटदुखीवर उपचार करताना बसतो हे कोणालाही सांगणे नको. आता ‘खास’ असो की ‘आम’, राजकीय पक्षाचे लेबल लावल्यावर त्या छत्राखालील पदाधिकारी वा कर्मचारी सर्वांना हे पथ्य पाळावेच लागणार. त्याकडे दुर्लक्ष झाले तर कशी चर्चा रंगते याची प्रचिती सेवानिवृत्त अभियंता विजय पांढरे यांना नुकतीच आली असावी. झाले असे की, पांढरे यांच्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारीवरून आममध्ये सध्या खास मतभेद सुरू झाले आहेत. त्याचाच टोकाचा परिणाम म्हणून जिल्हा संयोजकाच्या खुर्चीवरही गदा आल्याचे बोलले जाते. मात्र आममध्ये कोणाची खुर्ची असो की उमेदवारी, निश्चित नाही, असा संदेश उत्तर महाराष्‍ट्राचे समन्वयक संजीव साने यांनी दिल्यामुळे एकाच दगडात दोघांच्या शिकारी झाल्याचे चित्र निर्माण झाले. उमेदवारीच्या आशेत पाटील यांनी सवतासुभा निर्माण केल्याच्या तक्रारीवरून त्यांचे पद गेले, तर ज्यांना संभाव्य उमेदवार म्हणून समोर आणले गेले त्या पांढरे यांनाही दिल्लीतील जनमताचा निकष लावून त्याच पद्धतीने प्रक्रिया झाली तर उमेदवारी मिळेल, असे सांगत साने यांनी धक्का दिला. नेमके हे सांगताना बिचारे पांढरे हे साने यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसलेले होते. मात्र त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करणे टाळले. त्यावर पत्रकारांनी विचारले तर, साने यांनीच ‘त्यांना घसादुखीचा त्रास झाला असून त्यांच्या वतीने मीच बोलणार’ असे सांगत आवाज बंद केला. प्रतिक्रिया न दिल्यामुळे घसादुखीचा फायदा झाला की तोटा याचे उत्तर आगामी काळातच मिळेल, एवढे मात्र नक्की.
शिंदेंच्या हस-या चेह-याचा चाहता
पद्मशाली शिक्षण संस्थेच्या शतकमहोत्सवी सांगता समारंभासाठी तेलुगू अभिनेता आणि केंद्रीय पर्यटनमंत्री चिरंजीवी गेल्या रविवारी सोलापूरला येऊन गेले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आंध्र प्रदेशचे राज्यपाल होते, तेव्हापासून त्या दोघांचे संबंध. त्यामुळे शिंदेंच्या निमंत्रणाला क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी होकार दिला. त्यांच्या सोलापुरातील ‘जनवात्सल्य’ या निवासस्थानी जाऊन नाश्ता केला. त्यानंतर समारंभाच्या मंचावर आले. त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड उत्सुकता होती. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर टाळ्या, शिट्ट्या, किंकाळ्यांचा आवाज होता. समारंभाच्या उद्घाटनानंतर इतरांची भाषणे सुरू झाली, परंतु ती चाहत्यांना रुचली नाहीत. त्यांनी ‘चिरू... चिरू...’चा आवाज सुरू केला. शिंदेंच्या भाषणातही असाच व्यत्यय आला. त्यामुळे चिरंजीवी बोलण्यास उठले. गृहमंत्र्यांच्या गावात चिरंजीवीला महत्त्व प्राप्त झाल्याने, त्यांनी सारवासारव सुरू केली. म्हणाले, ‘‘तुमच्या या टाळ्या, किंकाळ्या ऐकण्यासाठी माझे मन आतुर झाले होते. महाराष्ट्रातील सोलापुरात माझे एवढे चाहते असतील, याची कल्पनाही केली नाही. परंतु मी मात्र शिंदे यांच्या हस-या चेह-याचा चाहता आहे.’’ या वाक्यावर शिंदेंसह सारेच हास्यकल्लोळात बुडाले.
झोपेतून उठले न् ‘शोले’ केले
बुलडाणा जिल्ह्याच्या राजकारणात सध्या सहकारातील एक बँक केंद्रस्थानी आली आहे. परवा बँकेच्या भल्यासाठी काहींनी बँकेच्या पाचव्या मजल्यावर चढून शोलेस्टाइल आंदोलन केले. आंदोलनाची धास्ती घेत लगोलग सहकारातील अधिका-यांनीही आपली कामे सोडून बँक गाठली. मग अवसान आलेल्या दोन आंदोलकांनी अधिका-यांवर प्रश्नांची सरबत्ती करून त्यांच्या मागण्या रेटल्या. या आंदोलनाच्या भरभरून बातम्याही आल्या. मात्र मुळात हे आंदोलन त्यांना सुचले कसे, हा पत्रकारांना पडलेला प्रश्न. ऊठसूठ कुठल्याही मुद्द्यावर आंदोलन करणारे कमी नाहीत. मात्र यांच्या या आंदोलनाचे तसे नव्हते. अलीकडील काळात नावात स्वाभिमानी असलेल्या एका संघटनेच्या राज्यपातळीवरील नेत्याची चांगलीच चलती आहे. पुण्यातील आपल्या एका बैठकीवरून परत आलेला हा नेता घरी शांत झोपलेला होता. तेव्हा मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या आमदारकीची स्वप्ने पडणा-या दुस-या पक्षाच्या एका युवा नेत्याने या नेत्याचे घर गाठले. अक्षरश: त्यास झोपेतून उठवून आंदोलनाची कल्पना सांगितली आणि मग काय, झपाटल्यागत निवेदन व पत्रके तयार करून मंडळी बँकेवर आली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी चर्चाही केली. तेव्हा झोपेतून उठले न् शोलेस्टाइल आंदोलन केल्याची बाब समोर आली. नाही म्हणायला या ‘शोले’ आंदोलनामुळे एक-दोन मागण्या त्यांना बसंतीच्या रूपाने पदरात पाडून घेण्यात यशही आले. नववर्षातील थ्रीडीतील ‘शोले’ पाहण्याअगोदर या ‘शोले’ने बुलडाणेकरांचे मात्र काही काळ मनोरंजन केले.
‘माझ्या निधीचे काय करता?’
एका आमदारांकडे पत्रकार, पक्षाचे पदाधिकारी व पत्रकारांमध्ये चर्चा सुरू होती. विषय होता अमरावती ते धुळेपर्यंतच्या रखडलेल्या राष्‍ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा. आमदारांनी या गंभीर प्रश्नावर सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यामुळे मोठ्या पोटतिडकीने ते पत्रकारांना माहिती देत होते. राष्‍ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी कसा कोट्यवधी रुपयांचा खर्च होणार असल्याचे ते सांगत होते. त्यामध्ये पुढील वर्षात किती कोटी रुपयांची वाढ होईल, हे सविस्तरपणे ते पत्रकारांपुढे मांडत असतानाच, एका पदाधिका-याने, ‘ते जाऊ द्या भाऊ, पण माझ्या स्वच्छतागृहाच्या 50 हजारांच्या पत्राचे काय करता?’, असा प्रश्न केला. पदाधिका-यांचा हा प्रश्न ऐकताच आमदार चांगलेच संतप्त झाले. त्यांनी ‘चर्चा कोणत्या विषयावर चालू आहे अन् तू कुठल्या विषयाचं घेऊन बसलास’ असे म्हणत त्या पदाधिका-याला चूप केले. रस्त्यावरील कोट्यवधींच्या खर्चाची चर्चा होत असताना त्या पदाधिका-याने 50 हजारांचा मुद्दा काढल्याने उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.