आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबुज: निवडणुकीचे ढोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारण्यांना अचानक सामान्य माणूस आणि जनतेची आठवण वगैरे यायला लागली की, निवडणुका जवळ आल्या असे समजावे. अशा वेळी भूमिपूजन आणि उद्घाटनांचा नुसता धडाका सुरू होतो. नेत्यांच्या गाड्यांचा धुरळा गावागावात उडतो. त्यात सामान्यांचे चेहरे गुलालाऐवजी धुळीने माखतात...
फेबु्रवारीत लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेता राजकारण्यांना अचानक विकासकामांची आठवण झाली. सरकारलाही जाग आली. मग ऐन हिवाळ्यात घोषणांची गरमी सुरू झाली. नागपुरात पृथ्वीराज बाबा, अजितदादा, कृषिमंत्री विखे पाटील, आणि सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आदींनी दे दणादण घोषणा केल्या. विकासकामांचे उद्घाटन केले. जनतेने जे जे मागितले ते ते देऊन टाकण्याची तयारी दर्शवली. जनतेला ‘आप’लेसे करण्यासाठी सर्व ते करा तरच जनता ‘आप’ली होईल, नाहीतर ‘आप’ची होईल, हे वाटल्यामुळे म्हणा, घोषणा होत आहे. अचानक सरकार आणि मंत्र्यांना जाग आलेली पाहून जनता अवाक् आहे. ‘भाऊ इलेक्शन नजदिक आये ना. अब ढोल तो बजानाही पडेगा,’ ही एका कार्यकर्त्याची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे.
ताराबाई पार्कातील हॉटेल
आयआरबी कंपनीच्या प्रकल्पाच्या ठरावाला महापालिकेत मंजुरी देण्यासाठी ताराबाई पार्कातील हॉटेलामध्ये कुणी कुणी खिसे भरून घेतले अशी जाहीर विचारणा आता कॉ. गोविंद पानसरे यांच्यासह काही नेत्यांनी सुरू केल्याने अनेकांची घाबरगुंडी उडाली आहे. अगदी खोली नंबरसहित इत्थंभूत माहिती सांगत पानसरे यांनी या सर्व प्रक्रियेचे आयआरबी कंपनीने चित्रीकरण केल्याचे उघड केल्याने ताराबाई पार्कातील हे हॉटेल चर्चेचा विषय ठरले आहे. या वेळी रांग लावून लाभ घेणारेच काही जण सध्या टोलविरोधी आंदोलनात आघाडीवर असल्याचा आव आणत असल्याने हे दुतोंडी राजकारण नागरिकांना पाहावयास मिळत आहे.
फलकावर घड्याळ काही दिसेना
गेल्या लोकसभा निवडणुकीआधी धनंजय महाडिक यांनी राष्‍ट्रवादीत प्रवेश केला आणि सर्वत्र राष्‍ट्रवादीचे नेते, घड्याळ चिन्ह असलेले डिजिटल फलक झळकू लागले. ऐनवेळी महाडिक यांचे तिकीट कापले गेले आणि यंदा पुन्हा लोकसभेच्या तोंडावर महाडिक यांना शरद पवारांनी कामाला लागण्याचे आदेश दिले. महाडिक यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर गेले पंधरा दिवस कोल्हापुरात कार्यक्रम आणि उपक्रमांची धूम सुरू आहे. शेकडो फलक उभारण्यात आले आहेत. मात्र, कुठेही घड्याळाचे चिन्ह मात्र दिसत नाही. कारण ऐनवेळी काय होईल आणि पवार काय निर्णय घेतील याची खात्री कुणालाच नसल्याने तूर्त महाडिक यांनी आपल्या फलकांवर घड्याळाचे चिन्ह दिसू नये याची काळजी घेतली आहे.
‘आप’च्या चर्चेने झेडपी हैराण
आम आदमी पक्षाने (आप) लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीतही उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी या पक्षाने दर्शवली आहे. लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीसाठी नगरच्या जिल्हा परिषदेतील काही पदाधिकारी इच्छुक आहेत. ‘आप’ने स्वच्छ चारित्र्याचा तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारा उमेदवार रिंगणात उतरवला, तर इतर पक्षांसाठी ते मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे जि. प. पदाधिका-यांनी ‘आप’मधील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवले आहे. लोकसभेसाठी कोणता उमेदवार दिला जाईल याचा कानोसाही घेतला जात आहे. विधानसभेसाठी ‘आप’कडून कोणाला संधी मिळू शकते याकडे जिल्हा परिषदेतील काही पदाधिकारी व सदस्य लक्ष ठेवून आहेत. ‘आप’ने जिल्ह्यातील युवकांना आपल्याकडे ओढण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. ‘आप’च्या चर्चेमुळे विधानसभेसाठी इच्छुक पदाधिकारी कमालीचे हैराण झाले आहेत.
पुत्रांसाठीचे भांडण युतीला घातक
नगर महापालिकेच्या निवडणुकीत खासदार दिलीप गांधी व आमदार अनिल राठोड यांचे पुत्र अनुक्रमे सुवेंद्र गांधी व विक्रम राठोड स्वतंत्र प्रभागांतून लढले. सुवेंद्र यांच्याविरोधातील उमेदवारासाठी आमदार राठोड यांनी जाहीर प्रचार केला, तर खासदार गांधींनीही आमदारपुत्राच्या विरोधातील उमेदवाराला ताकद दिली. या स्थानिक राजकारणाचा परिणाम लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जाणवणार आहे. युतीचे उमेदवार म्हणून गांधी यांना पुन्हा उमेदवारी मिळाली, तर आमदार राठोडांविरोधात भूमिका घेतील अशी चर्चा आहे. दुरंगी लढत झाल्यास गांधींना त्यांच्या भूमिकेचा मोठा फटका बसू शकतो. विधानसभेच्या निवडणुकीत आमदार राठोड यांना खिंडीत गाठण्याची खूणगाठ गांधी यांनी बांधली आहे. मनपा निवडणुकीत खासदार गांधी वरचढ ठरले. त्यांचा मुलगा निवडून आला तर आमदारपुत्रावर सलग दुस-यांदा पराभव स्वीकारण्याची नामुष्की आली. या पराभवाचा वचपा लोकसभा निवडणुकीत चुकता करण्याचे आडाखे बांधले जात आहेत. पुत्रप्रेमाच्या भांडणात युतीचा धर्म पायदळी तुडवला जाणार, अशी चर्चा आहे.