आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबुज: पाणी योजनांसाठी नेत्यांची उलघाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन वर्षे दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या पावसाने नगर जिल्ह्यातील जनतेला दिलासा मिळाला. पण जिल्हा परिषदेमार्फत चालवण्यात येणा-या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना विजेच्या थकबाकीमुळे बंद पडल्या अन् ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले. नगर लोकसभा मतदारसंघातील शेवगाव-पाथर्डी, मिरी-तिसगाव, बु-हाणनगर या मोठ्या पाणीपुरवठा योजना बंद होत्या. त्यामुळे जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, याची जाणीव उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बाधलेल्या नेत्यांना झाली. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या इच्छुकांनी जुजबी तजवीज करून योजना सुरू केल्या ख-या, मात्र उपाययोजना तात्पुरत्या स्वरूपाच्या असल्याने योजना महिनाभरात बंद पडण्याची चिन्हे आहेत. जास्तीत जास्त थकबाकी भरून योजना सुरू ठेवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची उलघाल सुरू आहे. तात्पुरती मलमपट्टी तरी तारुन नेईल, अशी अपेक्षा काहींना आहे.
पुरस्काराचा ‘बोजा’
सरकारी कार्यक्रम असला तर त्यात गोंधळ होणारच ही बाब ठरलेलीच. आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमातही हाच अनुभव आला. राज्यपालांच्या उपस्थित हा कार्यक्रम होणार असल्याने तो तितकाच नेटका होण्यासाठी संयोजकांचा कल होता. कार्यक्रमाला गर्दी होते की नाही या शंकेने संयोजकांनी सभागृह अर्ध्यातच पडद्याने बंदिस्थ केले होते. त्यामुळे हॉल जरी मोठा असला तरीही दीड-दोनशे लोकांमध्ये तो भरलेला दिसत होता. पुरस्कार वितरण तर भलतेच मनोरंजक झाले. स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र, शाल, श्रीफळ, फुलांचा मोठा गुच्छ, पैठणी आणि स्मरणिका इतका सारा पसारा उचलताना पुरस्कारार्थींना पुरती तारेवरची कसरत करावी लागत होती. या पसा-याच्या तुलनेने मानधन थोडके होते ही बाब अलहिदा. पुरस्कार स्वीकारताना दांपत्याने यावे अशी सूचना देण्यात आली होती खरी; परंतु हा दुसरा भिडू केवळ पुरस्काराचा ‘बोजा’ उचलण्यासाठी तर बोलविला नाही ना, अशीही शंका अनेकांच्या मनात तरळून गेली.