आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबुज: आबा-काकांच्या वादात कारखान्याची फोडणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गृहमंत्री आर.आर.(आबा) पाटील आणि आमदार संजय (काका) पाटील या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतील वाद संपल्याचा आभास गेली पाच वर्षे निर्माण झाला होता. याला कारण होते संजयकाकांचे राष्ट्रवादीत येणे. पण म्हणतात ना, ‘सुंभ जळाला तरी पीळ जात नाही’. त्याप्रमाणे या दोघांतील वाद गावोगावच्या गटातटाच्या रूपाने जिवंत होता. एकाच पक्षात आल्याने दोघांनी कधी त्याचे वारे स्वत:पर्यंत पोहोचू दिले नव्हते; मात्र तासगाव कारखाना स्वत:च्या कंपनीला फुकटात फुंकण्याचा काकांचा डाव मोडून पडला आणि काकांचे पित्त खवळले. एन.डी.पाटील सरांनी न्यायालयीन लढाई लढून तासगाव कारखाना काकांच्या गणपती संघाच्या घशात जाण्यापासून रोखला याला आबांची फोडणी असल्याचा काकांचा आरोप आहे. काकांनी आता गावोगावी जाऊन आबांचा पाणउतारा करायला सुरुवात केली आहे. याला आबांनी ‘लोकच मतपेटीतून उत्तर देतील,’ असे सांगून काकांचे आव्हान स्वीकारले.


अशीही युती
जायकवाडीच्या धरणात हक्काचे पाणी का मिळत नाही, याची अनेक कारणे समोर येत आहेत. मराठवाड्याचे, औरंगाबादचे नेते आणि मंत्री म्हणवून घेणारे पश्चिम महाराष्‍ट्राच्या नेत्यांसमोर कशा नांग्या टाकतात, हेही लक्षात येत आहे. त्यातील एक उदाहरण गेल्या शुक्रवारी पाहण्यास मिळाले. विभागीय आयुक्तालयातील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जायकवाडीच्या प्रश्नावरून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी चांगलेच घेरले. ते पाहून पालकमंत्री बाळासाहेब थोरात अस्वस्थ झाले. मात्र, त्यांची मात्रा काही चालेना. तेवढ्यात औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून निवडून गेलेले शालेय शिक्षणमंत्री त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी पुरे झाले पुरे झाले... असे म्हणत मुख्यमंत्र्यांची सुटका केली. त्यावर एका काँग्रेस पदाधिका-याने या मराठवाडाविरोधी युतीबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र, काहीही असो बाबूजींना नेहमी युती करायला आवडते - मग ती खैरेंसोबत असो नाहीतर थोरातांसोबत - असे मार्मिक निरीक्षणही नोंदवले.


साहेबांच्या बंधुप्रेमापोटी
सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी नेत्याच्या (जयंत पाटील) आदेशावरून नुकताच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. देशमुख यांच्या कार्यकाळाला वर्ष पूर्ण झाल्याचे सांगून त्यांच्याकडून राजीनामा घेतला आहे. पण यामागचे खरे कारण वेगळेच आहे. जयंत पाटील यांना त्यांचे चुलत बंधू देवराज पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालायची आहे, त्यासाठी हा आटापिटा सुरू असल्याची चर्चा आहे. जयंत पाटील यांनी गेल्या पाच-दहा वर्षांत जिल्ह्यातील नेत्यांची मोट बांधून जिल्ह्याचे नेतृत्व स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी ज्यांना-ज्यांना जवळ केले, त्यांच्यापासून आता जयंत पाटील साहेबांना धोका वाटू लागलाय. अर्थात तुम्ही जे पेरता, तेच उगवते. साहेबांनी आताची संधी परत मिळेल की नाही, माहीत नाही म्हणून बंधुराजांना अध्यक्ष करण्यासाठी ही खेळी केल्याची चर्चा आहे.


पोलिटिकल मेटिंग
सध्या मराठा आरक्षणावरून राष्‍ट्रवादीत आपसात जुंपली आहे. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरलेली आहे. राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी आपल्या गूढ स्वभावाला अनुसरून वेगळा सूर लावला आहे. त्यांच्या मते आरक्षण आर्थिक निकष लावून द्यायला हवे. पण मेटेंनी त्याविरुद्ध भूमिका घेतल्याने राष्‍ट्रवादीचे तेजतर्रार आणि आक्रमक होर्डिंग्जप्रेमी कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी मेटेंची उलटतपासणी घेतली. शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी घेतलेली भूमिका ही पक्षाची भूमिका असते, असे असताना विनायक मेटेंनी त्याविरु भूमिका घेतली. हा पक्षशिस्तीचा भंग आहे. आता पक्षाध्यक्ष पवारसाहेबच काय भूमिका घ्यायची हे ठरवतील, असे सांगून आव्हाडांनी मेटेंना इशारा दिला. जितेंद्र आव्हाडांच्या या पक्षशिस्तीच्या मुद्द्याने जिथे महाराष्‍ट्रीय जनतेचे मनोरंजन झाले तेथे मेटे मात्र चांगलेच संतापले. त्यांनी नागपूर येथे आयोजित मराठा आरक्षण परिषदेत आव्हाडांना आव्हान दिले. कोण हे आव्हाड, असा सवाल करतानाच कालपरवा पक्षात आलेल्या आव्हाडांनी आम्हाला शिकवू नये, असे ठणकावले. मी राष्‍ट्रवादीसाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत. आव्हाडांनी माझ्या आणि साहेबांच्या आड येऊ नये. उगाच लुडबुड कराल तर खबरदार...असा इशारा देऊन ते कार्यकर्त्यांनी आणलेला खस्ता खाण्यासाठी निघून गेले. आता आव्हाड यावर काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. निवडणुका दारावर आहेत. त्यामुळे असे पोलिटिकल मेटिंग होतच राहणार आहे. घड्याळाचे काटे कुणीकडे फिरतात यावर सारे अवलंबून आहे. शेवटी जे टिकल तेच पोलिटिकल असे कुजबुजत आव्हाड निघून गेले.


उत्साहाचीही उणीव
एखाद्या निवडणुकीतला विजय हा संबंधित उमेदवारासाठी अत्यानंद देणारा क्षण असतो. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहालाही पारावर उरत नाही. मात्र, उस्मानाबादेत पालिकेच्या पोटनिवडणुकीत वेगळाच अनुभव आला. सकाळीच मतमोजणी पूर्ण झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिका-यांनी उमेदवाराचे नाव जाहीर केले. मात्र, त्या वेळी पक्षाचे कार्यकर्ते किंवा स्वत: उमेदवारही हजर नव्हता. काही नातेवाईकांनी टाळ्या वाजवून समाधान मानले. ज्या पक्षाचा नगरसेवक निवडून आला, त्या पक्षाचे पालिकेत सर्वाधिक संख्याबळ आहे. त्यामुळे एक जागा वाढल्याने पक्षावर त्याचा विशेष फरक पडणार नव्हता. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाची उणीव दिसत होती.