आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kujbuj: Artical On Akola Zilha Parishad And Panchayat Committee

कुजबुज : ‘पैसे माये अन् मतं दुस-याले’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची धामधूम झाली. या निवडणुकीत असंख्य उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. एकाच मतदारसंघातून अनेक उमेदवार असल्याने कार्यकर्त्यांची चांगलीच चंगळ होती. कार्यकर्ते सर्वच उमेदवारांच्या पार्ट्यात सहभागी होत असल्याचे चित्र होते. एका उमेदवाराने आपल्या गाडीचा प्रचार रथ तयार करून आपल्या चालकाला मतदारसंघात प्रचार करण्यास सांगितले. चार दिवसांपासून आपल्या गाडीमधून कार्यकर्ते प्रचार कसे करीत आहेत, हे पाहण्यासाठी उमेदवार गेले असता, त्याला त्याच्या गाडीतून विरोधी उमेदवाराचा प्रचार करताना कार्यकर्ते आढळून आले. त्यामुळे ‘त्या’ उमेदवाराचा चांगलाच तिळपापड झाला. उमेदवाराने कार्यकर्त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. ‘गाडी-पैसे माये अन् मतं मागता दुस-यासाठी’? अशा शब्दात उमेदवाराने कार्यकर्त्यांना दम भरला. उमेदवाराचा संताप पाहून उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये मात्र चांगलाच हशा पिकला.
मौनं सर्वार्थ साधनम्
या वर्षी शेतकरी संघटनांनी ऊसदराचे आंदोलन सुरू केल्यापासून जयंत पाटील यांनी चकार शब्दही काढलेला नाही. कारखानदार बरोबर की शेतकरी संघटना, या वादात ते पडलेच नाहीत. गेल्या वर्षीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन शंभर टक्के जयंत पाटील यांच्याभोवतीच फिरत होते. राजू शेट्टी आणि जयंत पाटील यांच्यातील वाक्युद्धाने कार्यकर्त्यांना चेव चढायचा. या वर्षी मात्र जयंत पाटील यांनी ऊसदर आणि आंदोलन या दोन्ही विषयांवर मौन पाळले आहे. अर्थात राजू शेट्टी यांनीही आंदोलनाचा केंद्रबिंदू या वर्षी मुख्यमंत्र्यांकडे वळवल्याने जयंत पाटलांना विनाकारण गांजण्या उठवाव्याशा वाटल्या नाहीत. अर्थात कारखानदारांचे प्रतिनिधित्व करणा-या जयंत पाटील यांच्याच हितासाठी या वेळी शेतकरी संघटनांनी भांडायला सुरुवात केल्याने मौन बाळगण्यातच कारखानदारांचे हित असल्याचे ओळखून जयंतराव गप्प आहेत.
मुख्यमंत्र्यांचा गनिमी कावा
या वर्षीच्या ऊसदर आंदोलनाला मुळातच उशिराने सुरुवात झाली. लोकांनी सुखात दिवाळी खाल्ल्याने शेतकरी संघटनांशी ‘खेळायला’ सरकारला वेळ मिळाला. मग मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चेची गु-हाळे सुरू केली. थेट ऊसदरावर चर्चा न करता सहकारी साखर कारखानदारी वाचवण्यासाठी केंद्राकडून मदत मागण्यासाठी शेतकरी संघटनांनाही सोबत घेऊन वेळकाढूपणा केला. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीदिवशी होणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन थोपवून एरवी आक्रमक असलेल्या राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा रोष ओढवून घेतला; मात्र पुण्यतिथीचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात ते यशस्वी झाले. दिल्लीत गेल्यानंतरही अंतिम मार्ग काढण्यासाठी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे चेंडू ढकलून रिकामे झाले. स्वत:च्या सरकारला कोणतीही चाड लागू न देता त्यांनी गनिमी कावा केला खरा; मात्र त्यामुळे आंदोलन थांबण्याऐवजी चिघळतच चालले आहे.
दुष्काळाचे चटके
लग्नसराई असली म्हणजे दुष्काळाचा विषय बाजुला पडतो. या वर्षी मराठवाड्यात अभूतपूर्व दुष्काळ जाणवला. साहजिकच सर्वांचे लक्ष शासन, प्रशासन आणि नेतेमंडळींवर होते. पुढारी लग्नकार्यात किती खर्च करतात यावर सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया तीव्र येत होत्या. याची झळ औरंगाबादचे लाडके खासदार व राष्‍ट्रवादीचे भास्कर जाधव यांना बसली आहे. मात्र कालपरवाच एक आमदार कम बिल्डरच्या मुलाचेही लग्न अगदी शाही थाटात झाले, किंबहुना दुष्काळातील त्या दोन शाही लग्नांपेक्षा काकणभर सरसच झाले. मात्र नुकताच पावसाळा संपल्याने पाणीटंचाई, दुष्काळ या दृष्टिकोनातून या शाही लग्नाच्या खर्चावर फारशी टीका झाली नाही. अर्थातच या लग्नातही औरंगाबादचे लाडके खासदार होतेच. हा भेदभाव पाहून त्यांनी यापुढे उन्हाळ्यात कुठलाही लग्नसोहळा ठेवणार नाही अशी मनोमन खूणगाठ स्वागत समारंभाच्या स्टेजवर बांधली असेल, यात आम्हाला तरी शंका नाही.
दिल्लीसह गल्लीतही वैरच
राज्यात कॉँग्रेस, राष्‍ट्रवादी कॉँग्रेसची आघाडी असली तरी स्थानिक पातळीवर मात्र या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे वैर अनेक वेळा उघडे पडले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत असेच पाहावयास मिळते. मनसेची सत्ता असताना विरोधक म्हणून लढण्याऐवजी दोन्ही कॉँग्रेसचे नेते आपापसात लढून हसू करत असल्याचे चित्र नुकतेच कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाद्वारे दिसून आले. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून सध्या अशा कार्यक्रमांचा धडाका सुरू आहे. अपूर्ण कामांना पूर्ण स्वरूप देऊन बळजबरी घडवून आणलेल्या असल्या नाटकी सोहळ्यांना पक्षश्रेष्ठीदेखील हजेरी लावत असल्याने हा सर्व खटाटोप कशासाठी, हे काही लपून राहिलेले नाही.