आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबुज : यांना जाब कोण विचारणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी आहे. दोन्ही बाजूंचे नगरसेवक कोणत्या ना कोणत्या मुद्द्यांवरून एकमेकांवर तुटून पडत असतात. मात्र, सभागृहाच्या
बाहेर पडले आणि सर्व ‘अर्था’ने लाभाचा मुद्दा असेल तर एकत्रही येतात. नगरसेवकांचे सोडा, नेत्यांचेही असेच होत आहे. विरोधी आघाडीच्या गटनेते नियुक्तीवरून हा अनुभव आला. काँग्रेसच्या मीर हिदायत अली यांना गटनेतेपदी नियुक्तीचे पत्र देऊ नये, असे आमदार प्रदीप जैस्वाल यांचे म्हणणे होते. मग अली यांनी थेट पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधला. थोरातांनी खासदार चंद्रकांत खैरेंशी कानमंत्रणा केली आणि तातडीने अलींना पत्र मिळाले. ते पाहून शिवसेनेचा एक नगरसेवक म्हणाला, आम्ही अर्थपूर्ण
वाटाघाटी केल्या की साहेब आमची कानउघाडणी करतात. यात आता त्यांना जाब कोण विचारणार?


मुंडेंविरोधात भिडू कोण ?
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास सुरुवात होण्यापूर्वीच बीड जिल्ह्यातील राजकारणातील उलथापालथींची चर्चा खमंगपणेच
नव्हे तर गंभीरपणेही सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, अजित पवार यांचे बीड जिल्ह्यावर विशेष लक्ष आणि बीड जिल्ह्याचे खासदार गोपीनाथ मुंडे भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व असल्याने येथे खरा सामना रंगणार आहे. त्यामुळे जून महिन्यात आष्टीचे
आमदार सुरेश धस यांना राज्यमंत्रिपद दिल्यापासूनच खासदार मुंडेंच्या विरोधात धस मैदानात उतरवण्यात येतील, अशी चर्चा सुरू झाली. यासोबतच गेवराईचे विधान परिषद सदस्य अमरसिंह पंडित यांचेही नाव चर्चेत आले. दोन्हीही नेते खासदार मुंडेंच्या विरोधात दंड थोपटून मैदानात उतरण्यास उत्सुक असले तरी माझा भिडू कोण हे मीच ठरवणार! असे सूचक विधान दस्तुरखुद्द खासदार गोपीनाथ मुंडे यांनीच पत्रकारांशी बोलताना केल्याने नेमकं कोण मॅनेज होणार, अशीही चर्चा सुरू झाली आहे.


विधानसभेचे वेध
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची चाहूल लागली आहे. या निवडणुकीत आपलीच वर्णी लागणार, असा आत्मविश्वास अहमदनगर जिल्हा परिषदेतल्या काही सभापतींना व सदस्यांना आहे. प्रसंगी बंडखोरी करून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार या पुढा-यांनी केल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे. जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. या सभागृहातून अनेक जण विधानसभेत पोहोचले. अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा जोरदार सुरू आहे. त्यामुळे मतदारसंघात फेरबदल होऊ शकतो. पण विभाजन होईल तेव्हा होईल, पण विधानसभेची उमेदवारी मिळवायची, असा चंग सभापती व सदस्यांनी बांधला आहे. जिल्हा परिषदेत पारनेर येथील शिवसेनेचे बाबासाहेब तांबे यांना कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतिपद मिळाले. या पदाच्या माध्यमातून त्यांनी पारनेर तालुक्यात विकासकामांचा धडाकाही सुरू केला. जनसंपर्क वाढवण्यासाठी ते विविध धार्मिक कार्यक्रमातही सक्रिय सहभाग घेताना दिसत आहेत. परंतु पारनेर तालुक्यात शिवसेनेचे विजय औटी आमदार आहेत, असे असतानाही तांबे यांची तयारी विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असल्याची चर्चा पारनेर मतदारसंघाच्या वर्तुळात सुरू आहे. परंतु शिवसेनेकडून तांबे यांना तिकीट मिळाले नाही, तर ते इतर पक्षाचा पर्याय निवडू शकतात. पण स्वत: तांबे याबाबत काहीही बोलायला तयार नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे सदस्य तथा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी राष्ट्रवादीला घरचा आहेर करून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या कारभारावर टीका केली. याप्रकरणी पक्षाने त्यांना नोटिसाही काढल्या. तसेच शनिशिंगणापूर देवस्थानच्या कारभारावरही सडेतोड टीका केल्याने त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी दहातोंडे यांच्याकडूनही फील्डिंग लावण्यात येत आहे.


आम्हीही कमी नाही!
गणेशोत्सवामध्ये शांतता राखा, असे सगळेच राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांना सांगत असतात. पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारीही हीच भूमिका पटवून देत शांतता प्रस्थापित करतात. मात्र, एखाद्या जबाबदार अधिकारीच भर कार्यक्रमात मद्यप्राशन करून वातावरण कलुषित करीत असेल तर त्याला कोण समजावणार? उस्मानाबादेत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या कार्यक्रमाचा थाट सुरू असताना पालिकेचे एक अधिकारी मिरवणूक मार्गावरील एका जाहीर कार्यक्रमाच्या मंचावर विराजमान झाले. त्यांनी भलतीच रिचवली होती. त्यामुळे तोंडावर रुमाल झाकूनही वास लपत नव्हता. मंचावर तासभर बसून राहिलेल्या या अधिका-याची ‘ही रीत बरी नाही’ अशी चर्चा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. पण तो भलताच फॉर्मात होता. त्याला दाखवून द्यायचे होते की, नेते व राजकीय कार्यकर्त्यांपेक्षा आम्ही काही कमी नाही, आपण कोणाला घाबरत नाही.


पितृपक्ष आणि राजकीय एन्काउंटर
गेला आठवडा थोडा वेगळाच होता. वेगळा म्हणजे योगायोगाचा. मनमोहनसिंग अमेरिकेत गेले अन् अमेरिकेत शटडाऊन झाले, इथे राज्यातही काहीसे असेच घडले. दादर मतदारसंघाचे आजन्म उमेदवार ‘जोशी’ सरांचे राजकीय एन्काउंटर झाले, दस्तुरखुद्द दादूंनी राहुल शेवाळे या तरुण शिवसैनिकास हाताशी घेऊन सरांचा गेम केला. इथपर्यंत सारे सुरळीत होते, पण दुस-याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की, ‘ज्येष्ठांना’ त्रास देणा-या व अपमानास्पद वागणूक देणा-या पाल्याचे नाव वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणार. दादूंच्या या निर्णयाचा सरांना त्रास झालाच असणार. आता दादूंचे नाव तर तसे दररोजच या ना त्या कारणाने येत असते. मग त्यात नवीन ते काय ? मात्र या नवीन धोरणामुळे ‘मातोश्री’चे वृद्धाश्रमात रूपांतर न होवो हीच अपेक्षा, अन्यथा ‘मोठ्या साहेबांना’ जे जमले नाही ते करून दाखवण्याचे श्रेय दादूंना मिळेल.


स्थानिक नेते होणार मालामाल
महापालिका निवडणूक असेल, तर राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांची मोठी चलती असते. अहमदनगर महापालिकेची निवडणूक अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी खर्चाची जुळवाजुळव सुरू केली आहे. काही पक्ष लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना निधी देतात. महापालिका निवडणुकीत मात्र कशी उलट परिस्थिती असते, याचे उदाहरण अहमदनगर महापालिका निवडणुकीत दिसून येत आहे. या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी हजारात नाही, तर लाखांमध्ये खर्च करण्याची तयारी ठेवली आहे. कारण फक्त उमेदवारीसाठीच अनेकांना 5 ते 10 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच हे भाव फुटले असल्याची शहरात चर्चा आहे. ही निवडणूक द्विसदस्यीय पद्धतीने होणार असल्याने 34 प्रभागांतून प्रत्येकी दोन उमेदवार असे एकाच पक्षाचे 68 उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय पक्ष व त्यांचे स्थानिक नेते चांगलेच मालामाल होणार असल्याची कुजबुजही सुरू आहे.