आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबुज: मुसळ दिसत नाही?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘राजकारणाचा अड्डा झाल्याने राज्य सहकारी बँक आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासन नेमण्याची वेळ आली’ असे वक्तव्य वनमंत्री पतंगराव कदम यांनी नुकतेच सहकार मेळाव्यात केले. त्यांचा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसवर होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सहकारी संस्थांचा राजकारणासाठी वापर केला हे खरेच आहे; पण काँग्रेसच्या नेत्यांनी संस्था मोडीत काढल्याची अधिक उदाहरणे देता येतील. आता सांगली जिल्ह्याचाच विचार केला तर ज्या वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रात सहकाराची बीजे रोवली, त्यांच्या वारसांनी दादांनी उभा केलेल्या संस्थांचा नामोनिशानाच मिटवून टाकला. आता दुसºयाच्या डोळ्यातील कुसळ दाखवताना पतंगरावांना आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही का?


'क्रिकेट काकांचे'
राजकारणात निवृत्ती नसते म्हणतात आणि ते खरे आहे. मात्र उबग आला की, अर्धनिवृत्ती घेण्याचे संकेत बरेचदा मिळत असतात. सध्या महाराष्‍ट्राच्या राजकारणात पुतणे लोकांची घोड़दौड़ जोरात सुरू आहे. नामांकित 'पुतणे'लोक जमेल तेवढे धुराळा उडवत काका लोकांना जेरीस आणू पाहत आहेत. ज्युनियर पवार आस्ते आस्ते आपला जम महाराष्‍ट्राच्या राजकारणात बसवत आहेतच, त्यात ज्युनियर मुंडेंना जवळ करून आणखी एका काकास जेरीस आणण्यात यशस्वी ठरले आहेत. सीनियर मुंडेसुद्धा बराच काळापासून काठावर पोहण्यात धन्यता मानत आहेत. अशातच सीनियर पवार साहेबांनी 'एम सी ए' (मुंबई क्रिकेट असोसिएशन) निवडणुकासाठी अर्ज भरला आणि पाठोपाठ सीनियर मुंडेनीही त्यांचे अनुकरण केले. म्हणजेच पूर्ण निवृत्ती घेण्याऐवजी अर्धनिवृत्ती घ्यावी आणि खेळाचे मैदान बदलावे असा दूरचा विचार जेरीस आलेल्या काका मंडळींनी केलेला दिसतोय. कधी काळी काकानी बोट धरून 'पुतण्याना मैदानावर खेळायला नेले असेल, मात्र आता बोट धरायची वेळ काका लोकांवर आली असे दिसते. खरे खोटे 'बाप्पा' जाणे अशी चर्चा सुरू झाली आहे बर.


चव्हाणांच्या शुभेच्छा
शहरात काम करणाºया कोणत्याही राजकीय कार्यकर्त्याचे नगरसेवकांचे आमदार होण्याचे स्वप्न असते. ते पूर्ण झाले की त्याला वेध लागतात मंत्रिपदाचे. आणि त्याच्यापेक्षाही त्याच्या आजूबाजूचे कार्यकर्ते आणि नातेवाईक त्याला आमदार झालाच. आता मंत्री होऊन जा, असा आग्रह करू लागतात आणि तो स्पर्धेत उतरतो. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून आमदार झालेले सुभाष झांबड यांचेही तसेच होत आहे. मंगळवारी त्यांच्या घरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भोजनासाठी आले होते. तत्पूर्वी झांबडांचे नातेवाईक आता आमचे भाऊ मंत्री होणारच, अशी चर्चा करत होते. त्यातच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात झांबडांची राजकीय भरभराट होवो, असे शुभेच्छापर आशीर्वाद दिले. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्या चेहºयावरील हास्य मावळले, तर झांबड समर्थकांचे चेहरे फुलले होते. आता मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा प्रत्यक्षात कधी येतात, याकडे साºयांचे लक्ष लागले आहे.


‘आम्ही वेगळेच बरे’
ऐक्याचे वारे वाहत असले, तरी पक्ष बळकटीकरण किंवा दलितांचा विकास याऐवजी नेत्यांची स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपड असते. गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व दलित नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आय)चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला
होता. त्या वेळी भारिप-बमसंचे राष्‍ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबडेकर यांनी ‘एकला चलो रे’ चा नारा देत आठवलेंना हात दाखवला होता.


रामदास आठवले नुकतेच अकोला दौºयावर आले असताना पुन्हा पत्रकारांनी त्यांना ऐक्याचा प्रयत्न करणार का? या प्रश्नावर छेडले. हा प्रश्न ऐकताच रामदास आठवलेंच्या कपाळावर आठ्या आल्या. मिश्कीलपणे उत्तर देताना रामदास आठवलेंनी ऐक्याचा प्रयत्न सोडल्याचे स्पष्ट केले. ‘आम्ही लाख तयार असू हो, पण त्यांनी तर एकत्र यायला पाहिजे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर वरिष्ठ आहेत. आता त्यांनी पुढाकार घ्यावा, आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. दलित बांधवांचा आम्हाला सर्वाधिक पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांना आमची गरज आहे. तसेच उच्चवर्णीय जातीतील नेते तरी एकत्र राहतात का? मग आम्हालाच एकत्र येण्याचा आग्रह का? वेगळे राहूनच आम्ही सुखात आहोत, आम्हाला वेगळेच राहू द्या, असे रामदास आठवलेंनी सांगताच सभागृहात हशा पिकला.