आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबुज: नर्मदावाली बाई आली निवडणुकीच्या अंगणी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी नाही नाही म्हणता अखेर निवडणुकीच्या रिंगणात उडी मारल्याने आम आदमी पार्टीचा जीव भांड्यात पडला... नर्मदावाली बार्इंसाठी आपवाल्यांनी कधीचे देव पाण्यात ठेवले होते. ईशान्य मुंबईतून त्या उभे राहणार असून या भागात मानखुर्द, गोवंडी, चेंबूर परिसरातील झोपडपट्टी मतदार मोठ्या संख्येने आहेत. याच मतदारांच्या जिवावर बाई निवडणुकीला उभ्या राहिला तयार झाल्या आहेत. खरेतर जनता दलाकडून गेली अनेक वर्षे मेधाला रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहण्याची गळ घातली जात होती. नाथ पै, मधू दंडवते यांना मानणारा समाजवादी विचासरणीचा वर्ग या मतदारसंघात आजही आहे.त्यामुळे मेधा निवडून येईल, अशी जनता दलाला कायम आशा असायची. कदाचित बार्इंना जिंकून येऊ की नाही, अशी शंका असावी, त्यामुळे त्यांनी जनता दलाला नेहमी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. खरेतर आपलाही बाई नाही नाही म्हणत होत्या... पण बार्इंचे मित्र व आपचे नेते योगेंद्र यादव मुंबईत आले आणि चक्रे फिरली, पण यामुळे जनता दलाची मंडळी दुखावली गेली आहेत. नरिमन पॉइंटचे कार्यालय बार्इंच्या आंदोलनाला, बैठकांना कायम खुले करून देणा-या जनता दलवाल्यांना आता बाई आपल्याशा वाटेना झाल्या आहेत. मेधा म्हटल्यावर पूर्वी उत्साहाने बोलणारी या कार्यालयातील मंडळी आता विषय टाळून तिस-या आघाडीच्या चर्चेकडे आपली गाडी वळवतात.


महायुतीलाच दिले आव्हान
म हायुतीमध्ये मनसेला सामील करून घेण्यास उद्धव ठाकरे इच्छुक नसले तरी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपने मात्र राज ठाकरेंना पुन्हा एकदा कुरवाळणे सुरू केले आहे. याचा प्रत्यंतर नुकतेच नाशिकमध्ये मनसेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेल्या भाजपचे माजी राष्‍ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी युतीच्या काळातील कामांना उजाळा देताना शिवसेनाप्रमुखांबरोबर केवळ अन् केवळ राज ठाकरे यांचेच नाव घेतले. यामुळे उद्धव ठाकरेंच्या नावाचा त्यांना विसर पडला की मुद्दामहून त्यांनी तसे केले माहीत नाही. आपल्याच पक्षातील नेते गोपीनाथ मुंडेंशी गडकरींचे फारसे चांगले सख्य नसल्याने राज यांच्याशी जवळीक साधत एकप्रकारे गडकरींनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न किमान निवडणुकीपूर्वी केलेला दिसतो. यामुळे महायुतीच्या नेत्यांमधील मतभेद यानिमित्ताने का होईना चव्हाट्यावर आले आहेत.


टोलपाठोपाठ बांधकाम खाते लक्ष्य
छ गन भुजबळ विरूद्द राज ठाकरे असा संघर्ष गेल्या काही महिन्यांपासूनच चांगलाच रंगला आहे. दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान भुजबळांमुळे नाशिकमधील गुन्हेगारी वाढल्याचा आरोप करीत राज यांनी हल्लाबोल केला होता. आता लोकसभेच्या तोंडावर राज यांनी टोलविरोधात आंदोलन घेऊन पुन्हा एकदा भुजबळ यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम खाते व पर्यायानेच त्यांच्याविरोधात मोहीम उघडली. त्यातून रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपानेही टोकाची भूमिका गाठली. टोलविरोधातील आंदोलन थंडावल्यानंतर राज हे शांत झाले असावे, असे मनसैनिकांना वाटले प्रत्यक्षात मात्र नाशिक दौ-यात राज यांनी नवीनच संकेत दिले. शासकीय विश्रामगृहावरील मुक्कामादरम्यान त्यांनी रात्री गोल्फ क्लब येथील जॉगिंग ट्रॅकवर फेरफटका मारला. परत येताना राज यांनी विश्रामगृहाचीच पाहणी सुरू केली. विश्रामकक्षातील महापुरुषांचे फोटो का झाकून ठेवले. अरे कळकट खुर्च्या तरी साफ करा, असे म्हणत त्यांनी जनरेटर कक्षावर जरा शोभिवंत वेली चढवा, असा सल्ला दिला. त्यानंतर सिंहगड या दुमजली इमारतीकडे बघताना त्यांनी अरे जरा चांगला रंग द्या, असे सांगितले. त्यावर अभियंत्याने साहेब इमारत पाडून नवीन बांधणार असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यावर राज यांनी अरे पाडता कशाला, हे उद्योग थांबवून जरा बाजूने खांब चढवून त्यावरच इमले रचा असे सुनावले. त्यानंतर राज यांनी सिंहगडामधील विशेष सूटची पाहणी करून रात्री काय उद्योग चालतात याची खबरबात घेण्याचा प्रयत्न केला. राज यांची झाडाझडती बघून आता पुढील लक्ष बांधकाम खात्याकडील विश्रामगृहे तर नाही ना, असा प्रश्न मनसैनिकांना पडला.


मराठा आरक्षणाचा भूलभुलय्या!
वि धिमंडळ अधिवेशन सुरू असताना शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढून पुन्हा एकदा आपले अस्तित्व दाखवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. केविलवाणा हा शब्द येथे वापरण्याचे कारण म्हणजे त्यांना सत्ताधा-यांनी हिंग लावूनही विचारले नाही. त्यामुळे मेटेंच्या तळपायाची आग शिगेला पोहोचली आणि त्यांनी प्रसार माध्यमांसमोर थयथयाट केला. सरकारने आरक्षण जाहीर करावे, अन्यथा राज्यातील मराठे सत्ताधा-यांविरोधात उभे राहतील, अशी पोकळ धमकीही दिली. हे सर्व होत असतानाच नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीने मराठ्यांना 20 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी या समितीच्या अहवालाचा आधार घेऊन पृथ्वीराज चव्हाण निव्वळ आश्वासन देऊन बोळवण करतील आणि शेवटी मराठ्यांच्या हाती शेवटी काहीच लागणार नाही... ही खरी ग्यानबाची मेख आहे. या सर्वांचा अंदाज घेऊन आता मेटेंनी नवीन टूम काढली असून आरक्षण लवकरात लवकर जाहीर करा अन्यथा आंदोलन करावे लागेल. खरेतर राष्‍ट्रवादी काँग्रेसने मेटेंना वा-यावर सोडल्यानंतर सैरभैर झालेल्या या नेत्याने मराठा आरक्षणाचे कार्ड हाती घेऊन आपले अस्तिव टिकवून ठेवण्याची धडपड सुरू ठेवली आहे. भविष्यात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना पंखाखाली घेतल्यास त्यांचे हे मराठा प्रेमही कमी होईल.


जाधव होणार जायबंदी
नि योजन आयोगाचे उपाध्यक्ष, माजी कुलगुरू, लेखक, अर्थतज्ज्ञ अशी बिरुदावली मिरवणारे डॉ. नरेंद्र जाधव सध्या राजकारणाच्या दिशेने आगेकूच करताहेत. अर्थतज्ज्ञ असलेले मनमोहनसिंग पंतप्रधान होऊ शकतात तर तुम्ही अर्थमंत्री तर नक्की व्हाल, असा सल्ला त्यांना काही मित्रांनी दिलाय. त्यामुळे ते राखीव असलेल्या लातूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवू इच्छित आहेत. त्यांनी जाहीरपणे हे सांगितलेय. मात्र पोटातले ओठात येऊ द्यायचे नाही, हा राजकारणाचा पहिला धडा डॉ. जाधव विसरले. आपले तिकीट दिल्लीतून फायनल झाले हे सांगत सुटलेल्या जाधवांची अगोदर विद्यमान खासदार जयवंत आवळेंनी गोची केली. स्थानिकांना संधी मिळावी यासाठी आपण माघार घेत असल्याचे त्यांनी ठोकून दिले. त्यामुळे जाधवांची गोची झाली. आता लातूरच्या उमेदवाराची निवड लोकशाही पद्धतीने करण्याचे फर्मान राहुल गांधींनी सोडले आहे. त्यामुळे लादलेला उमेदवार असलेल्या जाधवांवर जायबंदी होण्याची वेळ येऊ शकते.