आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबुज : हे काय टक्कर देणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरे सर्वेसर्वा असलेल्या मनसेला अद्यापपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात जम बसवता आलेला नाही. शिवसेनेला टक्कर देणे शक्य झाले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या राज यांनी पदाधिका-यांच्या हलवाहलवीसाठी आमदार बाळा नांदगावकर यांना पाठवले. त्यांनी एका मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांना बोलावून घेतले. त्यांची मते जाणून घेण्यासाठी प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली. मनोगत जाणून घेणे, हा त्यामागील प्रमुख उद्देश होता, पण काही बड्या पदाधिका-यांनी पेरलेल्या छोट्या पदाधिका-यांनी त्यांचा उद्देश उधळून लावला. त्यांनी काहीजणांना टार्गेट करत उखाळ्या-पाखाळ्यांना सुरुवात केली. त्यामुळे बैठक कार्यकारिणी बदलाऐवजी तक्रारींचीच झाली. नांदगावकरांनाही तेच अपेक्षित असावे. म्हणून त्यांनी त्याची दखल घेत अनेक पदाधिका-यांची पदावनती करून टाकली. आता हे पदावनत नव्या पदाधिका-यांच्या विरोधात युद्ध पुकारण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी तसा बिगुलही वाजवला. ते पाहून शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणाला, पहा, आमच्याशी लढण्याआधीच त्यांच्यात लढाई सुरू झाली आहे. हे काय आता आम्हाला टक्कर देणार.


आधी स्पर्धेचा आनंद घ्या
औरंगाबाद जालना विधान परिषदेच्या निवडणुकीला अद्याप तीन महिने बाकी असले तरी त्याची जोरदार तयारी काँग्रेसच्या गोटात सुरू झाली आहे. दोन्ही जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समर्थकांचे संख्याबळ लक्षात घेता काँग्रेसमधील इच्छुकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. शहराध्यक्ष अ‍ॅड. सय्यद अक्रम, प्रदेश
सरचिटणीस अरुण मुगदिया, जिल्हा परिषद अध्यक्ष नाहिदाबानो यांचे पती फेरोज पटेल आघाडीवर आहेत. एकीकडे काँग्रेसच्या इच्छुकांच्या उमेदवारीसाठी मुंबई, दिल्लीला फे-या वाढल्या असताना शिवसेना-भाजपच्या गोटात सामसूम आहे. या मतदारसंघातून गेल्यावेळी निवडून आलेले शिवसेनेचे किशनचंद तनवाणी यांनाही कार्यकर्त्यांनी विचारणा केली तेव्हा ते म्हणाले की, सध्या काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेचा आनंद घ्या नंतर आपल्याकडे वळा.


स्वस्त भाज्या की चारा ?
निवडणुका जवळ येत आहेत ,तसे नेत्यांचे बाहू सर्वसामान्यांसाठी काय करू आणि काय नको असे फुरफुरू लागले आहेत. त्याची झलक दुष्काळी भागात बघायला मिळाली. जो तो ऊठसूट जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करीत होते. मोठा नेता आला की गुरांना त्याच्या हाताने चारा खाऊ घालायचा आणि फोटो काढायचा. अलीकडे भाज्या छे भाव गगनाला भिडले आहेत , टमाटे - ८0 रुपये किलो, अद्रक -200/ रुपये किलो वगैरे वगैरे. ताबडतोब कृषमंत्री विखे पाटील यानी स्वस्त भाजीपाला केंद्र मुंबईत सुरू करण्याची घोषणा केली, तेही तब्बल 100 केंद्रे. उद्देश हा की दलालाला टाळून सर्वसामान्यांना भाजीपाला कमी दरात मिळावा. मात्र, नवा उपक्रम म्हटले की उद्घाटन आलेच, उद्घाटन म्हटले की नेता आला. तेव्हा आता या केंद्रांवर उद्घाटनसमयी नेता आपल्या हाताने सामान्य माणसाला टमाट़ा खाऊ घालताना किंवा अर्ध कप चहा अद्रक घालून सामान्य माणसाला पाजताना पाहायला मिळतो की काय अशी चर्चा केंद्र सुरू होण्याअगोदरच सुरू झाली आहे. मात्र, तसे झालेच तर यालाही सर्वसामान्यांचा चारा छावण्या का म्हणू नये, अशी चर्चा ही रंगात आली आहे.