आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kujbuj: Politics In Sangali Municipal Corporation

कुजबूज: ‘वाटा’ घाटी आणि गोंधळाचे राजकारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत परवा विरोधी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी नियोजित गोंधळ घातला. अधिकारी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना दाद देत नाहीत, पार्टी मीटिंगला बोलावले तरी येत नाहीत, ही त्यांची तक्रार होती. त्यांची तक्रार रास्त होती. मात्र ती सर्वसाधारण सभेत मांडल्याने त्यांच्या तक्रारीवर समाधान निघाले तर नाहीच, पण सत्ताधार्‍यांनी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा न करता गर्दीत पाकीट मारले. सांगली शहराच्या ड्रेनेज योजनेचा नव्याने ठेका काढण्याचा विषय सभेपुढे होता. वास्तविक हा ठेका सध्याचे विरोधक आणि गेल्या वेळचे सत्ताधारी राष्ट्रवादी-भाजपच्या काळातच निश्चित झाला होता. त्या वेळी सत्ताधार्‍यांचा ‘योग्य वाटा’ देऊनच ठेका निश्चित झाला होता. त्याचे लाभार्थी सध्या काँग्रेसच्या सत्तेत सामील झालेले काही नगरसेवकही होते. आता काँग्रेसची सत्ता आल्यावर ठेक्याचा ‘वाटा’ आपल्यालाही मिळावा, ही लालसा काँग्रेसजनांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी फेरनिविदेचा विषय सभेपुढे आणला. मात्र सभेत चर्चा होण्यापुर्वीच ‘वाटा’ घाटी झाल्याने फेरनिविदेचा विषय बारगळला. सोलापूर महापालिकेने नाकारलेल्या ठेकेदाराला हा ठेका देण्यात आला आहे. वास्तविक अशा बदनाम ठेकेदाराला काम देण्याचा निर्णय विरोधक सभेत चर्चा करून हाणून पाडू शकत होते; मात्र त्यांनी गोंधळ घालून महत्त्वाच्या विषयावर चर्चाच घडवून आणली नाही.
आता फाटे फुटणार नाहीत तेवढं बघा
कोल्हापुरात रस्ते विकास प्रकल्प राबवून टोलविरोधी आंदोलनामुळे दोन्ही मंत्री तोंडावर आपटले आहेत. रस्ते झालेत, मात्र जनता टोल द्यायला तयार नाही. हे सगळं या मंत्र्यांनी घडवून आणलं आहे असं वातावरण निर्माण झालेलं असताना आता मंत्र्यांनी ताकही फुंकून प्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच आता साडेचारशे कोटी रुपयांची थेट जलवाहिनी योजना मंजूर झाल्यानंतर आता याला फार फाटे फुटणार नाहीत याची काळजी घेण्याचे आवाहन हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना केले आहे. बैठकीत तसा दमच या दोघांनी दिल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.
आमच्याकडेही जरा लक्ष द्या
नाशिकला केंद्रीय कृषिमंत्री शदर पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात उपस्थित बहुतांश सर्वच नेतेमंडळींनी एकमेकांना कोपरखळ्या लगावत स्वत:बरोबरच उपस्थित कार्यकर्त्यांचेही मनोरंजन केले. सध्या येवला, नांदगाव आणि नाशिकमध्ये खर्‍या अर्थाने पालकमंत्र्यांची असलेली चलती पाहता भुजबळांनी आता सिन्नरमध्येही लक्ष घालून विकास करावा, असे आवतनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिले. आव्हाडांनी दिलेले हे निमंत्रण ऐकताच पालकमंत्र्यांनी बसल्याजागीच आव्हाडांकडे पाहून हात जोडले. सिन्नर विधानसभा मतदारसंघात आव्हाड हे गेल्या निवडणुकीत इच्छुक होते. मात्र मेळ न जमल्याने नमते घेत वेट अँड वॉच असे धोरण अवलंबत आता आगामी निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. एक प्रकारे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीकडे लक्ष देऊन आम्हालाही मदत करा, असा संदेशही जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांना दिला असावा.
दिल्ली नव्हे, आता विकासाची वारी
मध्यंतरी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ हे आता विधानसभा नव्हे, तर लोकसभा निवडणूक लढवून दिल्लीवारी करणार असल्याच्या अनेक वावड्या उठल्या. अर्थात त्याला कारणेही तशीच होती. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील भुजबळांना तशा स्वरूपाचा इशारा केला होता. यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी मात्र नाशिकच्या मेळाव्यात ही बाब हेरून आपण दिल्लीवारीसाठी इच्छुक नसल्याचे दर्शवत आपला पुतण्या समीर भुजबळ यांनी नाशिकसाठी केलेल्या विकासवारीचेच दर्शन पवारांना घडविले. त्यांच्या या भूमिकेमुळे लोकसभेसाठी ते इच्छुक नसल्याचे समोर तर आलेच, शिवाय त्यांच्या येथून जाण्याची प्रतीक्षा करणार्‍ यांची तोंडेही त्यांनी बंद केली.