आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबुज : रामाच्या राज्यात हे कसं घडलं?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकेकाळी मुलुखमैदान तोफ म्हणून गाजलेले चिमणराव कदम यांच्या गाडीची चोरी झाली. गाडी चक्क त्यांच्या फलटण येथील राहत्या बंगल्यातून चोरीला गेली. चिमणरावांनी याबाबत पोलिसात तक्रार नोंदवली. पण अख्खी गाडी गायब होऊन आठवडा झाला तरी त्याचा काही सुगावा लागला नाही याचं सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे. डुप्लिकेट किल्लीने चिमणरावांची गाडी पळवणा-या चोरांचे कौतुक करायचे, पोलिसांना दोष द्यायचा हे न कळलेल्या त्यांच्या कार्यकर्त्याने अत्यंत चपखल प्रतिक्रिया नोंदवली. तो म्हणाला, रामाच्या राज्यात हे कसं घडलं कळत नाही ? रामराजे नाईक निंबाळकर माजी पालकमंत्री, रघुनाथराजे नाईक निंबाळकर नगरपालिकेचे सर्वेसर्वा, संजीवराजे नाईक निंबाळकर जिल्हा परिषद उपाध्यक्ष. असे असताना फलटणात स्कॉर्पिओ चोरी झाली कशी, असा प्रश्न त्या बिचा-या कार्यकर्त्याला पडला आहे. आता याचं उत्तर कोण देणार याचा शोध सुरू आहे.


तुम्ही बाबागिरी करा, आम्ही दादागिरी करू
आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांचा विषय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत गंभीरपणे मनावर घेतला आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणा-या सातारा जिल्ह्यात आता केवळ औषधापुरता एक आमदार विलासराव पाटील -उंडाळकरांच्या रूपाने राहिला आहे. अपक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी काँग्रेसचे सहयोगित्व स्वीकारल्याने ही संख्या दोनवर गेली आहे. पण विलासराव पाटील -उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यातले विळ्या भोपळ्याचे सख्य जगजाहीर असल्याने राज्याचे सोडा, घरात तरी काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस आणण्याचे चव्हाण यांनी ठरवले आहे. पूर्वी सातारा येथे कधीतरी येणारे चव्हाण आता गावोगावी फिरत आहेत. कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत. पण शांत, सौम्य, सभ्य अशी प्रतिमा असणारे मुख्यमंत्री टाळ्या, शिट्या वसूल भाषणे करू शकत नाहीत. आकडेवारी आणि प्रबोधन यामध्ये कार्यकर्त्यांना रस नाही यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी टाळ्या- शिट्यांची जबाबदारी स्वत:वर उचलली आहे. त्यांनी पालकमंत्री शशिकांत शिंदे आणि माजी पालकमंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे. एका कार्यक्रमात अखेरीस मुख्यमंत्र्यांना जयकुमार गोरे यांना आवरावे लागले. आघाडी धर्म पाळूया, चांगल्या कामाकरिता तोंड उघडूया, असे जाहीरपणे शिंदे-गोरे यांना त्यांनी सांगितले. यावर गोरे यांनी हळूच तुम्ही बाबागिरी (मुख्यमंत्र्यांना कार्यकर्ते बाबा म्हणतात) करा, आम्ही दादागिरीला उत्तर देतो, असे सांगून आपले इरादे पक्के आहेत असे स्पष्ट केले. पण हे सगळं सांभाळून करा, असा सल्ला अखेरीस पृथ्वीराज चव्हाणांनी दिला.


‘दैव-दुर्विलास’
जेवढ्या समस्या, तेवढे उपाय असतात. काही गोष्टी सामान्य माणसाच्याच नाही तर शासनाच्यासुद्धा नियंत्रणाबाहेर असतात. जसे अवर्षण, अतिवृष्टी, दुष्काळ वगैरे वगैरे. अशा समस्या आल्यास विठ्ठलाला साकडे घालणे, नवस बोलणे, होमहवन करणे वगैरे उपाय करण्यास शासनकर्तेही मागे राहत नाहीत. मात्र, सध्या एक समस्या अशी आहे की ज्यात मानवी प्रयत्नही कामी येत नाहीत आणि ईश्वरालाही आवाहन करण्याची गोची झाली आहे. आयुष्यभर अंधश्रद्धेविरुद्ध झगडणा-या डॉक्टर दाभोलकर यांच्या मारेक-यांचा तपास करण्यात अद्यापही अयशस्वी ठरलेल्या यंत्रणेला व पर्यायाने शासनाला खरे तर शेवटचा उपाय म्हणून वरील सर्व उपाय करता आले असते. मात्र ते बरे दिसणार नाहीत व डॉक्टरांना काय वाटेल (?) अशा संभ्रमात शासनकर्ते असावेत. अन्यथा आता तर खरे सणावाराचे दिवस आणि निरनिराळ्या देवी-देवतांना आवाहन करण्याचा काळ, ज्याची सुरुवात गणेश उत्सवापासूनच करता आली असती. पण हाय रे दैवा (डॉक्टरांनी माफ करावे) असे म्हणायची वेळ शासन व प्रशासन यांवर येऊन ठेपली असे म्हणावे लागेल.


पदग्रहण मेळावा की...
महिलांचे मेळावे - मग ते राजकीय असो नाही तर सामाजिक उपक्रमांचे - त्यात सुख-दु:ख सांगणे, ऐकणे होणारच. औरंगाबाद जिल्हा काँग्रेस महिला आघाडीचा गुरुवारी झालेला कार्यक्रमही त्याला अपवाद ठरला नाही. नूतन अध्यक्ष डॉ. विमल मापारी या उच्चशिक्षित असल्याने त्यांनी लायन्स, रोटरी क्लबच्या धर्तीवर नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा आयोजित केला होता. त्यात त्यांना स्वत:लाच दु:ख व्यक्त करण्यापासून रोखता आले नाही. पतिराजांच्या विरोधामुळे चार वर्षे राजकारणात सक्रिय होण्यापासून दूर राहावे लागले, असे त्यांनी सांगितले. नगरसेविका रेखा जैस्वाल यांनी तर 18 वर्षांची कहाणी सांगितली. ते ऐकून एक पुरुष पदाधिकारी म्हणाला, बरे झाले. सगळ्या महिलांना बोलण्याची संधी मिळाली नाही. नाहीतर हा पदग्रहण नव्हे, नवरोबांची गा-हाणी करण्याचा मेळावा झाला असता.