आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबुज : शोध उत्तराधिका-याचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंडे-गडकरी विसंवादाचे परिणाम सध्या नागपुरात बघायला मिळत आहेत. या दोन नेत्यांमधील वाद सध्या दृश्य स्वरूपात प्रकट होत नसला तरी भाजपमधील वातावरण आतून ब-यापैकी तापलेले आहे. त्याची धग कार्यकर्त्यांनाही जाणवते आहे. विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. नेमकी तीच या वादास कारणीभूत ठरते आहे. गडकरी यांनी विधान परिषदेचा हा गड आजवर सांभाळला. आता ते लोकसभा लढविणार आहेत. त्यांचा उत्तराधिकारी कोण, या प्रश्नाचे उत्तर भाजपच्या दृष्टीने अवघड होऊन बसले आहे. दोन्ही गट उमेदवारीवर दावा सांगण्यासाठी सरसावले आहेत. गडकरी गटाकडून विद्यमान महापौर अनिल सोले यांचे नाव आघाडीवर असताना फडणवीसांचे समर्थक संदीप जोशी शड्डू ठोकून उमेदवारीसाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे उमेदवारीबाबत भाजपला अद्याप निर्णय घेता आलेला नाही. त्यामुळे आता भाजपमध्ये लोकशाही प्रक्रिया राबवली जात आहे. पूर्व विदर्भातील भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख नेत्यांचे मत जाणून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी खास बैठक घेतली. नेत्यांनी दिलेल्या पसंतीचा अहवाल तयार होणार आहे. तो पक्षश्रेष्ठींना सादर होणार व दिल्लीतूनच उमेदवाराचे नाव जाहीर होणार, असे सांगितले जाते. नेत्यांची तयारी लक्षात घेता बाजी कोण मारणार, हे सध्यातरी सांगणे अवघड आहे. मात्र, येत्या काळात नागपुरातील गुलाबी थंडीतही भाजपमधील वातावरण ब-यापैकी तापलेलेच असेल, हे सांगायला कुण्या ज्योतिष्याची गरज नसावी.
दुतोंडी राज्यकर्ते :
एकीकडे शेतकरी संघटना मागत असलेला ऊसदर देणे परवडत नसल्याचे राज्यकर्ते सांगत आहेत, तर दुसरीकडे मोडीत निघालेले साखर कारखाने मिळवण्यासाठी त्यांच्यात चढाओढ सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव सहकारी साखर कारखान्यावर ताबा मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार संजय पाटील यांनी जंगजंग पछाडले, तर हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला घेण्यासाठी वनमंत्री पतंगराव कदम यांनी प्रयत्नांची शर्थ केली. शेवटी संजय पाटील यांनी लिलाव रद्द होताच कारखान्यातील यंत्रसामग्रीच रिकामी करून पतंगरावांच्या हाती सांगाडा ठेवला. सांगाडा घेऊन करायचे काय म्हणून पतंगरावांनीही कारखान्याचा नाद सोडल्यात जमा आहे. आता एकीकडे हेच पतंगराव कदम शेतकरी संघटनांनी मागितलेला ऊसदर देणे साखर कारखान्यांना परवडणार नाही. त्यासाठी सरकारने मदत करावी म्हणून सांगतात आणि दुसरीकडे स्वत:चा खासगी कारखाना सुरू करतात, बंद पडलेले कारखाने चालवायला घ्यायला जातात, हे कसे?
बारामतीत पुरंदरची तोफ :
गेल्या चार दशकापासून बारामतीच्या बालेकिल्ल्यात पवार घराण्याचा विजयाचा वारू रोखण्यात कोणी यशस्वी झाला नाही. आता बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी त्याच मतदार संघातील पुरंदरचे आमदार विजय शिवतारे वरचेवर डरकाळ्या फोडत आहेत. दोन महिन्यांत फेसबुकवर त्यांनी बराच धुराळा उडवला. मात्र बारामती लोकसभा मतदारसंघ भाजपकडे असल्याने मोठी अडचण आहे. पवारांशी दोन हात करायला भाजपने अनेकांना आजमावले. पण त्या सर्व नुरा (खोट्या) कुस्त्या होत्या. असे आमदार शिवतारे सांगताना भाजपला अप्रत्यक्ष दूषण देत आहेत. पण आता थेट राष्ट्रवादी बीडमध्ये भाजपला सळो की पळो करून सोडल्याने यंदा बारामतीत नुरा कुस्ती होणार नाही. सातारा व बारामती लोकसभा जागाबाबत फेरबदल करून बारामतीची जागा शिवसेनेला देण्याचा पर्याय आहे, तर बारामती वगळता इतर पाच विधानसभेच्या जागा इतर पक्षांकडे असल्याने शिवतारेंसाठी जमेची बाजू आहे. गेल्या निवडणुकीत शेजारच्या हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात बंडखोरांना पुढे करून चीत करण्याचा दादांचा डाव होता. त्यात पाटलांचा विजय झाला. परंतु पाटीलही दादांचा हा वचपा काढण्यासाठी संधी शोधत आहेत. त्याचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो. बारामती तालुका वगळता राष्ट्रवादीला चांगली हातघाईची लढाई करावी लागणार आहे. परिस्थिती ओळखून मोठे साहेबांचे बारामतीकडे विशेष लक्ष आहे. पुरंदर विधानसभा रणमैदान गाजवणारी शिवतारे त्यांची तोफ बारामतीत चालवून यशस्वी होण्यासाठी निवडणुकीत दारूगोळा खर्च करावा लागेल. मोठे साहेबच सावध झाल्याने विजयश्री सोपी नाही.
कृषिमंत्र्यांनी घेतली फिरकी:
देशाचे कृषिमंत्री शरद पवार शेलक्या प्रतिक्रिया देण्यासाठी किंवा शालजोडीतले मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते कधी कोणाची कशी फिरकी घेतील याचाही नेम नसतो. त्यामुळे नेतेमंडळीपासून ते पक्ष कार्यकर्तेही जरा सावध व चाचपूनच असतात. अर्थात पत्रकारही मात्र त्यामुळे बातम्या बनतात त्या पवार साहेबांच्या दुसरा त्यांच्याएवढा सीनियर नेता राजकारणात सक्रिय सध्या तरी नसल्याने पवार साहेबांच्या बातम्या या होतात त्यांच्या प्रत्येक वाक्य व शब्दाचे अर्थ काढले जातात, तरीही त्यांची बॉलिंग अजूनही त्यांच्या जवळच्यांनाही कळत नाही त्यामुळे पवारसाहेब कोणता प्रश्न कसा हाताळतील याची उत्सुकता सर्वांना असतेच. सध्या ऊसदराचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नेमक्या याच मुद्द्यावरून शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ पवारांना भेटण्यासाठी गेले होते. एरवी या संघटनेचे अगदी तालुकाध्यक्षसुद्धा पवारांवर सडकून टीका करत असतात. त्यांचे नेते शेट्टी, खोत यांच्याबद्दल तर बोलायलाच नको, तरीही पवारांनी या मंडळींना भेट दिली. त्यांचे निवेदन स्वीकारले. त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. एकूणच ऊस शेती आणि साखर कारखानदारीचे काहीच भले चालले नाही, असा सगळा नकारात्मक सूर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आळवला. ते ऐकून पवार हलकेच इतकेच म्हणाले, ‘‘बाबांनो खरंय तुमचं. एवढ्या अडचणीतली ऊसशेती तुम्ही करूच नका. पर्यायी पिके बघा.’’ पवारांच्या या फिरकीपुढे कार्यकर्त्यांची बोलतीच बंद झाली. सर्वांनी गपचूप काढता पाय घेतला.