आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबुज: वाघावर स्वारी सोपी, पण...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुराणात नारदमुनींचा जसा पूर्ण ब्रह्मांडात बे-रोकटोक संचार असायचा, तसा बे-रोकटोक संचार आरपीआयचे रामदास आठवले यांचा राजकीय ब्रह्मांडात असतो. ते कुठल्याही पक्षासोबत असले तरी त्यांची ऊठबस, चर्चा, भेटीगाठी सर्वच पक्षांत निर्धोकपणे सुरू असतात आणि त्याचा राजकीय अर्थदेखील काढायचा नसतो. असे हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व. मोठ्या साहेबांचा सहवास फार काळ लाभल्याने विश्वासार्हता ही थोडी डामाडोलच असते. एका कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड (प्रदेशाध्यक्ष झाल्यावर) त्यांना कडकडून भेटले, तेही सर्वांसमोर. त्याचे फुटेजही दिवसभर वाहिन्यांवर दाखवण्यात येईल याची खबरदारी घेतली असावी. सध्या ते महायुतीत आहेत (मनाने की शरीराने ते त्यांचे त्यांनाच ठाऊक) मात्र जागावाटपाची चर्चा होईपर्यंत आपले काही खरे नाही हे रामदासजी जाणतात. त्यामुळेच त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू असते. मात्र, यंदा वाघाची सवारी आहे व वाघाची सवारी काय असते हे चांगदेव महाराज यांच्यानंतर भुजबळ व राणे यांना चांगलेच ठाऊक आहे. वाघावर स्वार होणे सोपे, पण उतरायची कला ठाऊक असायला हवी. असो. आता ही वाघावरची रपेट कुठपर्यंत यशस्वी होते हे बघणेही रंजक असेल.

अखेर खुर्ची बळकावलीच!
खुर्चीसाठी कोण काय करेल याचा नेम नाही. राजकारणात खुर्चीला किती महत्त्व आहे याचा अंदाज गेल्या शनिवारी तुळजापूरमध्ये पार पडलेल्या बसस्थानकाच्या उद्घाटन कार्यक्रमात आला. खुर्चीशिवाय कुणाची नाराजी नको म्हणून एसटी विभागाने मंचावर सुमारे 60 खुर्च्यांची सोय केली होती. 20 खुर्च्यांच्या 3 रांगा लावण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाला शरद पवार, मुख्यमंत्र्यांसह राज्यातले अन्य 4 मंत्री, 2 खासदार, 6 आमदार उपस्थित होते. परंतु पहिल्या रांगेतल्या खुर्चीवर तुळजापूरच्या एका माजी आमदाराचे नाव नव्हते. त्यांनी मान्यवर येण्यापूर्वीच मंचावर फिरून याबाबतची खात्री केली होती. मान्यवर आल्यानंतर त्यांनी पहिल्या रांगेतली खुर्ची बळकावली. त्यामुळे प्रोटोकॉलप्रमाणे नाव असलेल्या एका विद्यमान आमदाराची मात्र गोची झाली. त्यांनी एका कर्मचा-यामार्फत अन्य खुर्ची मागवून घेतली. माजी आमदार महोदयांच्या खुर्चीच्या हव्यासाबद्दल उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली.