आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलामांसाेबतचे अंतिम क्षण...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाठ तास उलटलेले अाहेत. (हे लिखाण करताना), जेव्हा अामचा शेवटचा संवाद झाला हाेता. झाेप येतच नाहीये अाणि अाठवणींचे उमाळे येत अाहेत. कधी अश्रूंच्या रूपातही. २७ जुलैला अामच्या दिवसाची सुरुवात दुपारी १२ वाजता झाली हाेती. तेव्हा अाम्ही गुवाहाटीला जाणा-या विमानात बसलाे हाेताे. त्यांनी त्यांच्यासाठी खास बनवून घेतलेला गडद रंगाचा ‘कलाम सूट’ परिधान केला हाेता. त्याची स्तुती करताना मी म्हणालाे, ‘रंग खूपच छान अाहे’. तेव्हा मला माहिती नव्हते, की त्यांना खुलून दिसणारा हा शेवटचा रंग मी पाहत अाहे.

पावसाळी वातावरणात २ तास ५० मिनिटांचा हवाई प्रवास. अशा प्रवासात विमान हेलकावे खात असेल, तर ते मला अावडत नाही. कलाम साहेबांना मात्र ते सवयीचे हाेते. हेलकावे खाणा-या विमानात ते जेव्हा मी भीतीने गारठल्याचे पाहत, तेव्हा खिडकीचा पडदा खाली करत व म्हणत, ‘अाता भीती तुम्हाला दिसणार नाही.’ विमान प्रवासानंतर तितकाच २ तास ५० मिनिटांचा प्रवास कारने करून शिलाँग येथील अायअायएममध्ये पाेहाेचलाे. सर्व प्रवासांप्रमाणेच हा प्रवासही विशेषच हाेता. त्यातील तीन घटना ‘अामच्या शेवटच्या प्रवासातील संस्मरणीय क्षणां’मध्ये काेरल्या गेलेल्या अाहेत.

पहिली, डाॅ. कलाम पंजाबमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे खूपच चिंताक्रांत हाेते. निर्दाेष नागरिकांना प्राण गमवावे लागल्याचे त्यांना अताेनात दु:ख झाले हाेते. शिलाँग अायअायएममध्ये व्याख्यानाचा विषय हाेता ‘क्रिएटिंग अ लिव्हेबल प्लॅनेट अाॅन अर्थ’ (पृथ्वीवर जीवनास याेग्य ग्रहाची निर्मिती करणे) त्यांनी या दहशतवादी हल्ल्याची घटना त्या विषयाला जाेडून म्हटले की, ‘असे वाटते की, पृथ्वी जीवनयाेग्य राहण्यासाठी प्रदूषणाबराेबरच मानवकृत शक्ती हा माेठा धाेका अाहे.’ अाम्ही चर्चेदरम्यान म्हणालाे की, प्रदूषण व विवेकहीन मानवी वर्तणूक अशीच कायम राहिली, तर अाम्हाला पृथ्वी साेडण्यावाचून दुसरा पर्याय राहणार नाही. ते म्हणाले, ‘याचा सध्याचा वेग पाहिला, तर ती वेळ येत्या ३० वर्षांतच येईल.’ ते तरुणांना म्हणाले, ‘तुम्हाला याबाबत काहीतरी करायला हवे...कारण हेच तर तुमच्या भविष्यातील जग अाहे.’

दुसरी, अामच्या या चर्चेत राष्ट्रीयत्वाचा विचारही हाेता. दाेन दिवसांपासून डाॅ. कलाम संसदेचे कामकाज वारंवार ठप्प हाेण्याबाबत चिंताक्रांत हाेते. ते म्हणत, ‘मी माझ्या कार्यकाळात दाेन वेगळी सरकारे पाहिली. त्यानंतर काही वेगळेच पाहावयास मिळाले. हा गाेंधळ वारंवार हाेताे. हे याेग्य नाही. मला असा मार्ग काढायला हवा, की त्यातून हे निश्चित हाेईल, की संसद विकासाच्या राजकारणाबाबत कार्य करेल.’ त्यानंतर त्यांनी मला अायअायएम शिलाँगमधील विद्यार्थ्यांना अचानक विचारावयाचे प्रश्न तयार करायला सांगितले. जे त्यांना व्याख्यानाच्या शेवटी विचारण्यात येणार हाेते. विद्यार्थ्यांनी तीन असे उपाय सांगावेत, ज्यामुळे संसदेचे कामकाज अधिक फलद्रूप व सहजपणे हाेेऊ शकेल. काही वेळाने ते म्हणाले की, ‘जर माझ्याकडेच काही उत्तर नसेल, तर मी सूचना करा, असे कसे सांगू शकेन.’ त्यानंतर एक तास अाम्ही विविध पर्यायांवर विचार केला. अाम्ही ही चर्चा अागामी ‘अॅडव्हांटेज इंडिया’ मध्ये मांडण्याच्या विचारात हाेताे.

तिसरी, अाम्ही ६-७ कारच्या ताफ्यात हाेताे. डाॅ. कलाम अाणि मी वेगवेगळ्या कारमध्ये हाेताे. पुढे उघडी जिप्सी हाेती. त्यात तीन सैनिक हाेते. दाेघे दाेन बाजूला बसलेले हाेते. अाणि एक जवान बंदूक राेखून उभा हाेता. एक तासानंतर डाॅ. कलाम म्हणाले, ताे का उभा अाहे? ताे दमेल. ही तर जणू शिक्षाच अाहे. त्याला वाटेल तर ताे बसू शकताे, असा वायरलेस मेसेज देऊ शकताे का? मला त्यांना पटवून द्यावे लागले, की कडक सुरक्षेचा एक भाग म्हणून त्याला उभे राहण्यास सांगण्यात अालेले असेल. पण त्यांनी ते मान्य केले नाही. अाम्ही रेडिअाे संदेश देण्याचा प्रयत्न केला, पण ताे पाेहाेचला नाही. पुढील १ तास ५० मिनिटांच्या प्रवासात त्यांनी तीनदा त्याला हाताने इशारा करून बसण्यास सांगावे, याची अाठवण करून दिली. मग त्यांना जाणीव झाली, की अाता याबाबत काहीही करणे शक्य नाही. त्यानंतर ते मला म्हणाले, मला त्या जवानाला भेटून अाभार मानायचे अाहेत. अाम्ही अायअायएम शिलाॅंगला पाेहाेचलाे, तेव्हा मी त्या जवानाला त्यांच्या दालनात नेले. डाॅ. कलाम यांनी त्याच्याशी हस्तांदाेलन केले. म्हणाले, थँक्यू मित्रा, तुम्ही दमला अाहात का? काही खाणार का? माझ्यामुळे तुम्हाला इतका वेळ उभे राहावे लागले, याचा मला खेद वाटताे. डाॅ. कलाम यांनी विचारपूस केल्यामुळे काळा गणवेश परिधान केलेल्या त्या जवानाला धक्काच बसला. त्याला बाेलण्यासाठी शब्द सुचेनात. ताे शेवटी इतकेच म्हणाला, ‘सर, तुमच्यासाठी तर मी ६ तासही उभा राहीन.

अाम्ही सभागृहात पाेहाेचलाे. व्याख्यानासाठी उशीरा पाेहाेचणे त्यांना मान्य नव्हते. ते नेहमी म्हणत, विद्यार्थ्यांना कधीही वाट पाहावयास लावू नये. जेव्हा मी माईक तपासत हाेताे, तेव्हा ते हसले, म्हणाले, ‘फनी गाय ! तुझे सगळे व्यवस्थित चालले अाहे ना?’ ते जेव्हा ‘फनी गाय’ म्हणत, तेव्हा त्यांच्या बाेलण्यानुसार व अापल्या अाकलनशक्तीनुसार त्याचे अनेक अर्थ निघत. त्याचा अर्थ असे, अापण चांगले काम केले अाहे. अापण काही गडबड केलेली अाहे. अापल्याला काहीही समजत नाही. किंवा अापण हे केवळ गंमत म्हणून म्हणत अाहाेत. यावेळी त्यांनी हे गंमत म्हणूनच म्हटले हाेते.

‘फनी गाय ! यू अार डुइंग वेल?’ त्यांनी विचारले. मी हसून म्हणालाे, ‘हाे!’ मला उद्देशून त्यांनी उच्चारलेले ते शेवटचे शब्द हाेते. भाषण सुरू हाेऊन दाेन मिनिटे झाली. मी त्यांच्या मागेच बसलेलाे हाेताे. एक वाक्य पूर्ण झाल्यानंतर ते बराच वेळ काही बाेलले नाहीत. मी त्यांच्याकडे पाहातच हाेताे. तेव्हाच त्यांचा ताेल गेला. अाम्ही त्यांना सावरले. डाॅक्टर धावत अाले. अाम्ही जे शक्य हाेते ते सर्व काही केले. त्यांचे अर्धे उघडे असलेले डाेळे मी कधीही विसरू शकणार नाही. मी त्यांच्या डाेक्याला एका हाताने अाधार दिला हाेता. व त्यांना शुद्धीवर अाणण्यासाठी प्रयत्न करत हाेताे. त्यांनी हाताने माझी बाेटे पकडली. चेहरा शांत हाेता. त्यांच्या स्थिर नजरेतून जणू विद्वत्ता प्रकट हाेत हाेती. त्यानंतर पाचच मिनिटांत अाम्ही जवळच्या इिस्पतळात पाेहाेचलाे. काही मिनिटांतच त्यांनी संकेत दिले, की मिसाइल मॅनने उड्डाण केले अाहे, कायमचे. मी त्यांना चरणस्पर्श केला. शेवटचा. अलविदा मित्र! माझे महान संरक्षक! अाता अापले दर्शन हाेईल फक्त मनातच, अाणि भेट पुढील जन्मात. मागे वळलाे, तेव्हा विचारचक्र सुरू झाले हाेते.
ते नेहमी मला विचारत, ‘तुम्ही तरुण अाहात, तेव्हा हे अातापासूनच निश्चित करा, की अापल्याला कशासाठी अाेळखले जावे? मी त्यांना प्रभावित करता येईल, अशा अनेक उत्तरांवर विचार केला. शेवटी थकून त्यांनाच विचारले, ‘पहिले तुम्हीच सांगा, तुम्हाला कशासाठी अाेळखले जावे? राष्ट्रपती, वैज्ञानिक, लेखक, मिसाइल मॅन, इंडिया २०२०, टार्गेट थ्री बिलियन....काय? मला वाटले, मी पर्याय सांगून प्रश्न साेपा केलेला अाहे. पण त्यांनी मला धक्का देणारे उत्तर दिले. ‘शिक्षक’ हे त्यांचे उत्तर हाेते. अाज मी मागे वळून पाहताेय- त्यांनी त्यांचा शेवटचा प्रवासही शिक्षण देतच सुरू केला हाेता. अापल्याला शिक्षकाच्या रुपातच अाेळखले जावे, हीच त्यांची इच्छा हाेती. एका महान शिक्षकाच्या रुपातच त्यांनी अापला निराेप घेतला.

श्रद्धांजली - माजी रा‌ष्ट्रपतींचे व्यक्तिमत्त्व दर्शवणारे तीन प्रसंग
>डाॅ. कलाम म्हणाले, संसदेत वारंवार हाेणारा गाेंधळ हाेताे. हे ठीक नाही. मला खराेखरच असा मार्ग शाेधायला हवा, ज्यातून हे निश्चित केले जाईल, की संसदेत विकासात्मक राजकारणावर कामकाज हाेईल.
>ते म्हणत, ‘विद्यार्थ्यांना कधीही वाट पाहावयास लावू नये.’ जेव्हा मी माईक लावत हाेताे, तेव्हा ते हसून म्हणाले, फनी गाय! तुझे सगळे व्यवस्थित चालले अाहे का? ते जेव्हा ‘फनी गाय’ म्हणत तेव्हा त्यातून अनेक अर्थ निघत असत.
>ते म्हणत, ‘तुम्ही तरुण अाहात, अाताच विचार करा, तुमची अाठवण कशासाठी काढली जाईल?’ मी त्यांच्यावर छाप पाडता येईल, असे उत्तर शाेधत राहिलाे. शेवटी थकून त्यांनाच विचारले, ‘तुम्हीच पहिले सांगा, तुम्हाला कशासाठी अाेळखले जाणे अावडेल?’ त्यांनी धक्काच दिला. त्यांचे उत्तर हाेतेे, ‘शिक्षक’,

सृजन पाल सिंह हे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांचे लेखक, सस्टेनेबल डेव्हलपमेंट क्षेत्रातील विशेषज्ञ.
srijanpalsingh@gmail.com