आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहेब, औंदा तुमीच आमाला माफी द्या !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री. शरद पवार साहेब
अध्यक्ष, राष्‍ट्रवादी कॉँग्रेस
स.न.
यास्नी रामराम, दंडवत

साहेब, राज्यात सध्या दुस्काळी परिस्थिती असल्याचे आपण जाणताच. प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही, धरणमाय व्याकूळ झालीय... पिकांनी माना टाकल्यात. पोरीबाळींचे हात कसे पिवळे करावे, हा प्रश्न मनाला डंख मारतोय. गावात अमोस्या- पुनवेला एखाद- दुसरं टॅँकर येतंय, तिथंही हंडाभर पाण्यासाठी झुंबड उडते, हाणामार्‍याबी व्हतायत. हा तरास सहन होत नसल्यानं काही बाप्यांनी तर गळफास लावून घेतला. त्यांची चिल्लीपिल्ली उघड्यावर पडलीत. अशी एक ना अनेक दु:खं आहेत. पण नियतीपुढं कुणाचं चाललंय, आसं म्हणून आम्ही आजवर समदं दु:ख गिळत आलोय. कधी कोणाकडे याचना केली नाही की सरकारनं काहीच दिलं नाही, असं रडगाणंही गायलं नाही. तुमी ‘जाणते राजे’... गाव-वाड्यांवर फिरलेले. शेतकर्‍याचं दु:ख काय असतं, हे तुम्ही जाणता. तरीही आजवर तुमाला काही काही मागितलं नाही. पण आज मात्र न राहून पत्र ल्हेतोय...

साहेब, तुमी म्हाराष्‍ट्रात व्हता तवर आमाला उद्याची काहीतरी आस व्हती. तुमी दिल्लीस्नी गेलात तवा तुमच्याच भरवशावर तुमच्या ‘वारसदारां’नाही आमी सत्ता दिली, पर त्यांनी राज्याचं पार वाटोळं केलंय. बळीराजाचं कल्याण करण्याच्या नावाखाली सिंचन बंधारे बांधण्याची यांनी नाटकं केली, त्यासाठी सरकारच्या (म्हणजेच आमच्याच की) तिजोरीची अक्षरश: लूट केली. बंधारे कागदावरच राहिले अन् धा-पाच पुढारी मात्र गब्बर झाले. त्यांच्याच पापांमुळं आज आमी दुस्काळाच्या नरकयातना भोगतुया... ! तरीबी आमी त्यांला माफ केलं.

साहेब, आमच्या आया-बहिणींच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहेत. गावातली चार-पाच टवाळखोर पोरं गळ्यात झेंडे टाकून मिरवतात. कुणी काही बोललं तर ‘टगेगिरी’ करत्यात. हातभट्टी, जुगार, मटका, पत्त्याचे अड्डे राजरोस चालत्यात. पोट्ट्यांच्या डोस्क्यात राजकारणाचं वारं घुसलंय. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी घरातून वायलं होऊन मह्या पोरानं त्याच्या वाट्याची दोन एक्कर फुकून टाकली आणि आता तुमचेच झेंडे घेऊन, देसाड मारून फिरतंय गावभर बोंबलंत...! तरणीताठी पिढी पार बरबाद झालीया... तरीबी आमी तुमाला माफ केलं.

साहेब, शाळांची अवस्थाबी लई वंगाळ. दिवसा शाळा तर रात्री जुगारी, दारुड्यांचेच ‘वर्ग’ भरतात. पोरांसाठी आलेल्या खिचडीवर मास्तरच ताव मारतो. गावातला सरकारी दवाखाना बंदच आसतो. गावाला धड रस्ते नाहीत म्हणून यस्टीही येईना. पोटुशी बाई तालुक्याला नेता नेता रस्त्यातच मोकळी व्हतीया. कशीबशी एखादी लेक तालुक्याला पौचलीच तर सरकारी डाक्टर पैसे घेतल्याशिवाय हात लावत नाही. अशी सगळीकडूनच गोची झालीय... तरीबी आमी तुमच्या सरकारला माफ केलं...!

साहेब, आज मात्र तुमच्या पुतण्यानं पार आमच्या जखमेवरच मीठ चोळलंया. तहानल्या मान्सास्नी पाणी पाजून पुण्य पदरात पाडून घ्यायची आपली परंपरा, पण ते विसरून हे बेणं तहानलेल्यांची, वडिलधार्‍यांचीच खिल्ली उडवतंय... गावातील चारा छावण्यात जनावरं जगवण्याऐवजी यांचेच बगलबच्चे गब्बर झालेत. ज्यांनी आया- बहिणींची सुरक्षा करायची, तेच त्यांच्या इभ्रतीवर हात टाकायलेत. आणि तरीही साहेब, तुम्ही म्हंता आमाला माफी द्या... माफी तरी किती येळा द्यायची साहेब? मागं याच पुतण्याच्या टगेगिरीमुळं तुमी माफी मागितली व्हती, तवाबी आमी मोठ्या मनानं तुमाला माफ केलं. पण साहेब, औंदा तुमीच आमाला माफी द्या, अशा सगळ्या घोर अपराधांना आता आमीच काय, पण देवबी माफ करणार नाही !!!

आपला नम्र
एक शेतकरी (मतदार)