आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१४० वर्षांपूर्वी पहिल्या ब्ल्यू जीन्सची निर्मिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्मनीतील बेव्हेरिया येथे जन्मलेले लेव्हाय स्ट्रॉस हे १८ व्या वर्षीच आपल्या कुटुंबासह १८४७ रोजी अमेरिकेत स्थायिक झाले. स्ट्रॉस बंधूंचा न्यूयॉर्कमध्ये कपड्यांचा व्यवसाय होता. वर्षभर त्यांच्याकडून शिक्षण घेतले. नंतर केंटुकी येथे नातेवाइकांकडे राहू लागले. तेथे त्यांनी तीन वर्षे शहरात फिरून कपडे विकले. तेव्हा आपलेही दुकान असावे, असे त्यांना वाटले. सॅन फ्रान्सिस्को येथे मेहुणे डेव्हिड स्टर्न यांच्यासोबत दुकान सुरू केले. त्याला लेव्ही स्ट्रॉस अँड कंपनी असे नाव दिले.

सुरुवातीला लेव्हाय जर्मनीहून आणलेले जाड कापड खाण मजूरांना विकू लागले. रफ अँड टफ असल्यामुळे मजूर त्यापासून पँट शिवत होते. मागणी वाढल्यामुळे फ्रान्समधील नाइम्समधून मोठे डेनिम फॅब्रिक मागवून, त्याला निळा रंग देऊन विकू लागले. मजुरांनी तेसुद्धा उचलून धरले. पुढील १३ वर्षांत लेव्हाय यांचा व्यवसाय तिपटीने वाढला. १८७२ मध्ये लिव्हाय यांना नेवादा येथील जेकब डेव्हिस या टेलरचे पत्र आले. नव्या पद्धतीच्या पँटचे पेटंटचे शुल्क भरल्यास त्यापासून मिळालेल्या उत्पन्नाचा अर्धा वाटा देण्याचा प्रस्ताव त्याने लेव्हाय यांच्यासमोर ठेवला. लेव्हाय यांच्या दुकानातून कपडे खरेदी करणार्‍या जॅकब यांनी पँटमध्ये धातूचे हूक (रिबिट) लावण्याची पद्धत राबवली. लेव्हाय आणि त्यांच्या मेहुण्याला हा प्रस्ताव आवडला. त्यांनी या पद्धतीचे पेटंट करून २० मे १८७३ रोजी घरातच कारखाना सुरू केला आणि पहिली ब्ल्यू जीन्स येथेच तयार झाली. तोपर्यंत मजूर या पँटला ओव्हरॉल म्हणत असत.

आर्थिक मंदीतही व्यवसायावर परिणाम झाला नाही. नंतर फॅक्ट्री टाकली. यादरम्यान जानेवारी १८७४ मध्ये स्टर्न यांचा मृत्यू झाला. १८८६ मध्ये लेव्हाय यांनी प्रथम जीन्सच्या वेस्टवर लेदर टॅग लावला. त्यावर जिन्सला विरुद्ध दिशेने ओढणार्‍या दोन घोड्यांच्या फोटोसह ५०१ नंबर असे प्रिंट होते. वृद्धापकाळामुळे लेव्हाय यांनी आपला व्यवसाय पुतण्या जेकब आणि लुइस स्टर्नकडे सोपवला आणि सामाजिक कार्याला सुरुवात केली.

१९०२ मध्ये लेव्हाय यांच्या निधनानंतर भूकंप आणि आगीमुळे बॅट्री स्ट्रीटवरील कंपनीचे मुख्यालय आणि फॅक्ट्री पूर्णपणे जळून खाक झाली. कंपनी पुन्हा उभी राहिली. त्यानंतर आर्थिक मंदीचाही फटका बसला. त्यातून पुन्हा उभारी घेण्यासाठी १९१२ मध्ये कंपनीने पहिल्या मुलांच्या प्लेसूटचा नवा आविष्कार बाजारात उतरवला. त्याच्या विक्रीतून कंपनी थोडी-फार उभी राहिली.

१९५० च्या दशकात हिप्पीज आणि तरुणांनीही जिन्स वापरायला सुरुवात केली. रिंकल फ्री आणि फिक्स साइज तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय ठरली. १९६० मध्ये तिला ‘जीन्स’ असे नाव मिळाले. ८० च्या दशकात ५० प्रकल्प उभे राहिले. ३५ पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यालये थाटण्यात आली. जॉर्ज पी सिंपकिन्स यांच्या नेतृत्वात कंपनीने अमेरिकेबाहेर २३ ठिकाणी प्लांट उघडले. तसेच डॉकर्स, डेनिजिन, सिग्नेचर आणि लेव्हाइससारखे अनेक ब्रँड बाजारात आले. जीन्स मार्केटमध्ये लेव्हाइस हा जगात प्रथम क्रमांकाचा ब्रँड आहे. ११० देशांमध्ये याचे स्टोअर्स आहेत. लेव्हाइसने नुकतेच खादी ब्रँड सादर केले. लेव्हाय स्ट्रॉस यांनी स्वत: कधीही जिन्स परिधान केली नाही.