आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश नरवडे ते सदाशिव अमरापूरकर...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगरमध्ये १९५० मध्ये जन्माला आलेला गणेशकुमार नरवडे हा मुलगा मोठा होत गेला तशी त्याला गाण्याची आवड लागली. तो गायक होणार असे सगळ्यांना वाटले, पण त्याचा अनुनासिक आवाज त्याला गायकीत जम बसवू देईना. मग तो अभिनयाकडे वळला. पाहता पाहता नाटकात विनोदी भूमिका करत करत हाच मुलगा खलनायक म्हणून चित्रपटाच्या पडद्यावर आला आणि खलनायकाची ८०-९० च्या दशकातील तद्दन फिल्मी प्रतिमाच या मुलाने...तरुणाने बदलून टाकली.
हा गणेश नरवडे म्हणजेच सदाशिव अमरापूरकर. १९७४ दरम्यान रंगभूमीवर प्रवेश केल्यानंतर त्यांनी हे नाव धारण केले. ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या सदाशिवला घरी सगळे प्रेमाने तात्या म्हणत. नगरमधील नवीन मराठी शाळा, सोसायटी हायस्कूलमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, अहमदनगर महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेता घेताच तो अभिनयाचेही धडे गिरवत होता. वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच त्याने रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली होती. इतिहासात पुणे विद्यापीठामार्फत पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्याने रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली होती. याच दरम्यान सदाशिवचे सुनंदा करमरकर या कॉलेज मैत्रिणीशी लग्न झाले.

२२ जून १८९७
मराठी चित्रपटामध्ये त्यांना ‘२२ जून १८९७’ या चित्रपटाद्वारे मोठा ब्रेक मिळाला होता. त्यात त्यांनी बाळ गंगाधर टिळकांची भूमिका निभावली होती. पुढे ‘हँड्स अप’ या नाटकात काम करत असताना प्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी त्यांचे काम बघितले आणि त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील खलनायकाच्या प्रतिमेला नवा आयाम देणारा खलनायक सापडला. या नाटकात त्यांनी भक्ती बर्वे यांच्याबराेबर काम केले होते. ‘अर्धसत्य’ या चित्रपटातून निहलानी यांनी रामा शेट्टीच्या रूपात सदाशिव यांना पडद्यावर आणले आणि तेथून त्यांनी मग मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर त्यांनी आजतागायत ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. मराठी, हिंदीबरोबर बंगाली, उडिया, हरयानवी भाषिक चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या. १९९३ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायक म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ‘इश्क’ मध्ये त्यांची अजय देवगणच्या पित्याची भूमिकाही विशेष गाजली. २००० पासून मात्र अमरापूरकर निवडक चित्रपटांत दिसायला लागले.

प्रत्यक्ष जीवनात ते अत्यंत सहृदय आणि सामाजिक भान असलेले व्यक्ती होते. नर्मदा बचाव आंदोलन असो वा मुंबईतील गरीब वस्त्यांचा प्रश्न असो, त्यांनी नेहमीच अशा कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामांमध्येही ते नरेंद्र दाभोलकरांसह अनेकदा सहभागी झाले होते.

नगरचा असल्याची लाज वाटते...
अहमदनगर जिल्ह्यामध्ये दलितांवर होणा-या अत्याचारांमुळे सदाशिव अमरापूरकर कमालीचे हळवे झाले होते. सोनई हत्याकांड आणि त्यानंतरच्या खर्डा येथील नितीन आगेच्या हत्येनंतर ‘आता मला मी अहमदनगरचा हे सांगण्याचीदेखील लाज वाटत आहे’ अशी जळजळीत प्रतिक्रिया दिली.

धर्मेंद्रचे लकी मॅस्कॉट
१९८७ मध्ये हुकुमत या चित्रपटात अमरापूरकर यांनी धर्मेंद्र यांच्याबरोबर खलनायकाची भूमिका केली. हा चित्रपट मि. इंडियापेक्षाही अधिक चालला व सुपरडुपर हिट ठरला. त्यानंतर अमरापूरकर धर्मेंद्रचे लकी मॅस्कॉट बनले. त्यामुळे अमरापूरकर यांनी धर्मेंद्रबरोबर त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

नटसम्राट’ने दिली हुलकावणी
‘नटसम्राट’चा ‘कुणी घर देता का घर’ म्हणणारा अप्पा बेलवलकर साकारण्याची तीव्र इच्छा होती. तशी संधीही आली होती. मात्र, नाट्यसृष्टीतील राजकारणामुळे त्यांच्याऐवजी इतर कुणाला तरी संधी देण्यात आली आणि एक नवा ‘नटसम्राट’ घडवण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले.

अमरापूरकरांना धक्काबुक्की
गेल्या वर्षी होळीत दुष्काळजन्य स्थिती असताना पाण्याचा अपव्यय या संवेदनशील अभिनेत्याला सहन झाला नाही आणि त्यांनी स्थानिक इलेक्ट्रॉनिक माध्यमांना याची कल्पना दिली. माध्यमाचे वार्ताहर या प्रकाराचे चित्रण करतांना तेथील तरुणांनी अमरापूरकर व वार्ताहरांना शिवीगाळ व धक्काबुक्कीही केली.