आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Loksabha Election: Ambedkari People]'s Alternative

लोकसभा निवडणुका : आंबेडकरी जनतेचे पर्याय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीची नऊ महिने आधीपासूनच धामधूम सुरू झाली आहे. निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सर्वच पक्षांकडून सभा, मेळावे यांना सुरुवात झाली आहे. रिपब्लिकन पक्ष व भारिपच्या नेत्यांनीही आपापली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वीसेक संघटनांची लोकशाही आघाडी बांधून मेळावे, मोर्चे यांचे आयोजन करण्यात येत असल्याचे घोषित केले आहे. रामदास आठवले यांनीही त्यांच्या स्टाइलने कार्यक्रम आखले आहेत. इंदू मिल प्रकरणामुळे प्रसिद्धीस आलेले आनंदराज यांची सेना आज तरी सामाजिक असली तरी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. ते आपल्या बंधूंना मदत करणार की स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार, हे लवकरच स्पष्ट होईल. रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांच्याच पक्षसंघटना या मासबेस असणा-या आहेत आणि त्यांच्यातून आज तरी विस्तव जात नसल्याने राजकीयदृष्ट्या आंबेडकरी जनतेची फरपट होत आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आणि खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडून हा पक्ष सक्षम असा पर्यायी विरोधी पक्ष निर्माण करण्याची योजना आखली होती. तत्कालीन अनेक मोठ्या नेत्यांच्या संपर्कात ते होते. बाबासाहेबांच्या अचानक निधनामुळे हा पक्ष त्यांच्या अनुयायांनी निर्माण केला खरा; पण त्यांच्या संकल्पनेतला तो पक्ष ठरू शकला नाही. तत्पूर्वी दादासाहेब गायकवाड यांनी संयुक्त महाराष्‍ट्र आंदोलनात उतरून समितीच्या सहकार्याने शेकाफेला नेत्रदीपक यश मिळवून दिले होते. 9 खासदार व 17 आमदार निवडून आणले होते. मतदारांनी टाकलेला विश्वास या नेत्यांना टिकवता आला नाही. या यशाने कार्यकर्ते आणि नेते यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्या. या महत्त्वाकांक्षेतून अनेकांनी काँग्रेस या जळत्या घरात प्रवेश करून खडकासारखी अभेद्य संघटना लुळीपांगळी केली. समाजहित, पक्षहितापेक्षा व्यक्तिहिताला प्राधान्य आले. याचाच फायदा काँग्रेसने घेतला. एखाद-दुसरी आमदारकी किंवा खासदारकीचा तुकडा फेकून नेतृत्व मिंधे केले असल्याचे चित्र आंबेडकरोत्तर काळात दिसते. बाबासाहेबांनी गावगाड्यातील बलुतेदारी बंद केली असली तरी त्यांच्या अनुयायी म्हणवणा-या नेत्यांनी राजकीय बलुतेदारीला जन्म दिला.


पक्षैक्य असेल तर समविचारी पक्षांच्या मदतीने राजकीय यश मिळते, हे यापूर्वी सिद्ध झाले आहे. व्यक्तिवाद व नेत्यांमधील टोकाच्या इगोमुळे सामूहिक नेतृत्वातही पक्ष उभा राहू शकला नाही. पक्षहितापेक्षा प्रत्येकाने आपापल्या दुकानदारीला महत्त्व दिले. पक्षाची पक्ष म्हणून बांधणी, समस्त भारतीयांवर प्रभाव टाकील असा कार्यक्रम, बौद्धेतरांना नेतृत्वाची संधी व सदस्य नोंदणीतून भरभक्कम आर्थिक निधी गोळा करून पक्ष उभारणी झाली असती तर यश दूर नव्हते.


ही जर-तरची भाषा यश देऊ शकत नाही. लोकांना यश हवे आहे. ते कसे मिळवायचे, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रकाश आंबेडकर व रामदास आठवले या दोन्ही नेत्यांनी समाजहितासाठी आपापले अहंकार बाजूला सारून आपापल्या संघटना जशा आहेत तशा ठेवून राजकीय आघाडी करता येईल. ही आघाडी झाली तरी कुणाबरोबर जायचे या गोष्टीवर वाद होणार! डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार इथे मार्गदर्शक ठरतात. बाबासाहेब म्हणत असत, ‘आपण अल्पसंख्याक आहोत. कोणा ना कोणा पक्षाशी सहकार्य केल्याशिवाय भागणार नाही. कोणाशी सहकार्य करायचे ते दरेक पक्षाचा कार्यक्रम पाहून ठरवावे लागेल.’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड 18, भाग 3, पृ. 134) बुद्धानुयायी असणा-या या दोन्ही नेत्यांनी मैत्री, प्रेम, करुणा भाव स्मरून एकत्र बसून खुल्या दिलाने चर्चा केली तर वाट सापडू शकते.


भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करून भारतीय जनतेला भविष्यातील संकेत दिले आहेत. अल्पसंख्याकांशी असलेला त्यांचा व्यवहार सर्वश्रुत आहे. गोध्रा कांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीत मुस्लिम बांधवांच्या झालेल्या हत्याकांडाची हिटलरशाहीतील निर्घृण प्रकारांबरोबरच तुलना करावी लागते, इतकी ती भयंकर आहेत. लोकशाही मान्य नसणा-या पक्षाचे मोदी हे कारभारात येण्यासाठी लोकशाहीचा आधार घेतात. लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाच्या पूर्ववर्ती शर्तीपैकी एक शर्त बाबासाहेबांनी अशी सांगितली आहे की,‘बहुमतवाल्यांनी अल्पमतवाल्यांवर जुलूम करता कामा नये. बहुमतवाले जरी सत्तेवर असले तरी अल्पमतवाल्यांना स्वत:बद्दल सुरक्षितता वाटली पाहिजे.’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड 18, भाग 3, पृ. 335) त्यामुळेच नितीशकुमारांनी आपली सत्ता पणाला लावून भाजपशी असलेले संबंध तोडले. रामदास आठवले आज शिवसेना-भाजप युतीसोबत आहेत. आठवलेंना या महायुतीकडून योग्य त्या सन्मानाची वागणूक मिळत नाही. महापालिका निवडणुकीत शिवसैनिकांनी दगलबाजी केली, हे निकालांच्या आधारे स्पष्ट दिसते. आरपीआयला मत देण्यापेक्षा त्यांनी मनसेला मत देणे पसंत केले. परिणामी आरपीआयला महायुतीचा फायदा झाला नाही. महायुतीतले सहभागी शिवसेना-भाजप हे पक्ष मैत्रीसाठी लायक नाहीत, हे कळून चुकले असतानाही रामदास आठवले यांनी अद्याप मोदींच्या संदर्भात भूमिका घेतलेली नाही. ती त्यांना तातडीने घ्यावी लागेल आणि मोदी नेतृत्व मान्य करणारांच्या युतीबरोबर असणार नाही, हे शिवसेनेला ठणकावून सांगावे लागेल.


आता उरला प्रश्न काँग्रेस आघाडीबरोबर जाण्याचा. भाजप व काँग्रेस या दोघांत आंबेडकरी जनता फारसा फरक करीत नाही. मात्र, काँग्रेस हा दगडापेक्षा वीट मऊ असलेला पक्ष आहे, इतकेच. इंग्रजांच्या भेदनीतीचाच वापर काँग्रेस पक्ष करीत असतो. ‘वापरा आणि फेका’ हे त्यांचे धोरण कायम राहिले आहे. काँग्रेसने आंबेडकरी जनतेच्या केलेल्या विश्वासघाताची मांडणी करायची तर त्यावर एक स्वतंत्र ग्रंथच निघेल. मुद्दा आहे तो युतीचा योग्य मोबदला मिळण्याचा. युतीचा योग्य मोबदला मिळणार असेल आणि दगाबाजी केली जाणार नाही या अटीवर काँग्रेससोबत जाता येणे शक्य आहे. तिस-या आघाडीचा पर्यायही आज उपलब्ध आहे. तिस-या आघाडीबरोबर जाण्याने राजकीय यश मिळण्याची शक्यता कमी आहे. अखेरचा पर्याय आरपीआय-भारिप आघाडीने स्वतंत्रपणे लढण्याचा. ही लढाई यश देणारी नाही, हे खरे असले तरी त्याचा फटका सत्ताधारी आघाडीला जसा बसू शकतो तसा सत्तेला हपापलेल्या युतीलाही बसू शकतो. राजकारणात तुमची बार्गेनिंग पॉवर किती आहे, यावर तुमचे महत्त्व ठरत असते. ते ठरवण्यासाठी या दोन नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. नसेल तर तुमचे काय करायचे याचा पर्याय जनतेच्या हातात आहे.