आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुद्धीकरणवादी राष्ट्रवाद की आंबेडकरी समतावाद?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या स्वातंत्र्याचा वापर करून एखाद्या व्यक्तीने केलेल्या कृतीने जर कोणी त्या व्यक्तीला अशुद्ध मानत असेल तर त्या व्यक्तीला आंबेडकरांचे नाव घेण्याचा तरी अधिकार आहे का ?
या प्रश्नाचा संदर्भ शेषराव मोरे यांनी "फाळणी आणि बाबासाहेब" या "दिव्य मराठी'मध्ये ( दि. १४ एप्रिल २०१६ रोजी) लिहिलेल्या लेखाशी आहे. कारण शेषराव मोरे हे धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला ‘अशुद्ध’ मानणाऱ्या हिंदुत्ववादी नेत्यांचे कट्टर समर्थक आहेत. पण त्यांच्या लेखात ते आपण आंबेडकरांचा आदर करतो असे दाखवून दलित तरुणांची दिशाभूल करत आहेत. या मुद्द्याकडे आपण नंतर येऊ. आधी शेषराव मोरे यांनी लिहिलेल्या लेखाचा त्यांनी सांगितलेला उद्देश लक्षात घेऊ.
त्यांच्या मते आंबेडकरांवर त्यांच्याच विचारसरणीच्या (हिंदुत्ववादी) दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या एका आरोपाचे खंडन करण्यासाठी त्यांनी हा लेख लिहिला आहे. ही व्यक्ती म्हणजे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात असलेले अरुण शौरी. त्यांनी २००५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘ वर्शिपिंग फॉल्स गॉड्स’अशा शीर्षकाखाली एक पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी असे मत मांडले आहे की आंबेडकरांनी भारताला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये अडथळे आणून स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधी वर्तन केले. पण शेषराव मोरे हा तपशील न देताच आपण आंबेडकरांवरील आरोपाला उत्तर देण्यासाठी हा लेख लिहिला आहे असे सांगतात. प्रश्न असा पडतो की अरुण शौरींनी हे पुस्तक लिहून तब्बल अकरा वर्षे झाली. मग ही अकरा वर्षे मोरे गप्प का राहिले ? आजच त्यांना हे उत्तर द्यावेसे का वाटले ? याचे कारण स्पष्ट आहे. अरुण शौरी आता भाजपमधून बाहेर पडले आहेत. त्यांनी नरेंद्र मोदींच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे आता हिंदुत्ववाद्यांना शौरींवर टीका करणे राजकीय कारणांसाठी आवश्यक वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल दाखवले गेलेले प्रेम हे केवळ दिखावा आहे. बरे फाळणीच्या वेळची आंबेडकरांची भूमिका आत्ता सांगून ते कसे प्रखर देशभक्त होते हे सांगणे अत्यंत अप्रस्तुत आहे. फाळणी ही अत्यंत गुंतागुंतीच्या राजकीय प्रक्रियेने घडलेली एक घटना होती आणि आंबेडकरांचा राष्ट्रवाद हा व्यक्ती कोणत्या जातीत जन्मलेली आहे, कोणत्या धर्माची सदस्य आहे याच्यावर अवलंबून नव्हता. त्यामुळेच त्यांच्या घटनेत व्यक्तिस्वातंत्र्याचे मूल्य केंद्रस्थानी आहे. डॉ.आंबेडकरांचा राष्ट्रवाद हा व्यक्तिस्वातंत्र्यवादी राष्ट्रवाद आहे. शेषराव मोरे मात्र त्याला ‘शुद्धीकरणवादी राष्ट्रवादाशी’ जोडत आहेत. येथे शेषराव मोरेंचा ‘शुद्धीकरणवादी राष्ट्रवाद’ काय आहे हे लक्षात घेऊया.
शेषराव मोरे हे अशा हिंदुत्ववादी नेत्यांचे कट्टर समर्थक आहेत, ज्यांनी डॉ.आंबेडकरांच्या क्रांतिकारी धर्मांतरावर सडकून टीका केली. आंबेडकरांना ‘बाटगे ‘ म्हणून हिणवले. या हिंदुत्ववाद्यांची शेषराव मोरेंना मान्य असलेली भूमिका अशी की एखाद्या व्यक्तीने हिंदू धर्मातून धर्मांतर केले तर ती व्यक्ती ‘अशुद्ध’ होते आणि मग त्या व्यक्तीचे सर्व ब्राह्मणी कर्मकांडे करून ‘शुद्धीकरण’ करणे हे राष्ट्रीय कर्तव्य ठरते. ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचाही अवमान करणारी गोष्ट होती. डॉ. आंबेडकर हे या ‘शुद्धीकरणवादी राष्ट्रवादावर’ तुटून पडले. त्यांनी या कृतीवर प्रखर हल्ला चढवला. ते म्हणतात, "हिंदू समाजामधील कित्येक लोकांनी संघटन व शुद्धी या चळवळी सुरू केल्या असून या चळवळींमध्ये शिकलेल्या लोकांचाच भरणा आहे. बहुजन समाज या चळवळीपासून साधारणत: अलिप्त आहे. ढोंगीपणा व माथेफिरूपणा यांना ऊत येऊ लागला आहे. सध्या हिंदू-मुसलमानांमध्ये भयंकर तेढ उत्पन्न झाली आहे. तिचा फायदा काही लबाड लोक घेत आहेत. आधीच धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार. जेव्हा खऱ्या धर्माची पायमल्ली होते तेव्हाच धार्मिक कलह माजतात. जे हिंदू व जे मुसलमान सध्या धर्माच्या नावावर एकमेकांशी भांडत आहेत, त्यांच्यामध्ये खऱ्या धार्मिक वृत्तीची माणसे चार-दोन तरी सापडतील किंवा नाही, याची आम्हाला शंका आहे. धर्माला पदोपदी लाथाळणारे लोकच धर्माचा आवेश दाखवून दुसऱ्या धर्माच्या लोकांचे प्राण घेऊ पाहतात.' ते पुढे म्हणतात की, "धार्मिक कलहामुळे धर्माच्या योगाने माणसाचे माणूसपण जाऊन त्याला पशूपणा येत आहे. अशा स्थितीत अशिक्षित गुंड मारामाऱ्या करतात. एकमेकांची टाळकी सडकतात व खून करतात आणि सुशिक्षित गुंड अल्पायासाने आपापल्या समाजात लोकप्रिय होण्याची पर्वणी साधून घेतात. अशिक्षित गुंडाच्या दुष्ट कृत्यांची खरी जबाबदारी खरे म्हटले असता सुशिक्षित गुंडांवरच आहे. कारण त्यांच्या चिथावणीमुळेच अशिक्षित लोक अत्याचार करावयाला प्रवृत्त होतात. सुशिक्षित गुंड जसे हिंदूंत आहेत तसे मुसलमानांत आहेत. पंडितांत आहेत तसे मौलानांमध्ये आहेत.' आंबेडकरांची ही वाक्ये हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांतील जातीय लोकांवर कोरडे ओढणारी आहेत. शेषराव मोरे सोयीस्करपणे आंबेडकरांची ही वाक्ये सांगायचे टाळतात.
मुळात आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संकुचित राष्ट्रवादाच्या चौकटीत बसवणे हेच त्यांच्या विचारांशी प्रतारणा करण्यासारखे होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सबंध साहित्यात आढळणारे संदर्भ हे पाश्चिमात्य उदारमतवादी विचारवंतांचे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे युरोपातील प्रबोधनयुगाचेच एक अपत्य होते. प्रबोधनयुगाचे सर्वात मोलाचे मूल्य म्हणजे व्यक्तीची धर्म, जात, वंश आदी बेड्यांतून पूर्ण मुक्तता करणे. आणि म्हणूनच त्यांना बौद्ध धर्म मोलाचा वाटला. आपल्या ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या पुस्तकात ते म्हणतात, "विज्ञान मानणाऱ्या आधुनिक माणसाला जर कोणता धर्म आवश्यक वाटत असेल, तर तो फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे बौद्ध धर्म. मी गेली तीस वर्षे सर्व धर्मांचा अभ्यास करून या निष्कर्षाप्रत आलो आहे की बौद्ध धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे. "शुद्धीकरणवादी हिंदू राष्ट्रवाद्यांना आंबेडकरांचे हे विचार कसे पचतील? त्यामुळे त्यांनी डॉ. आंबेडकरांना त्यांच्या संकुचित राष्ट्रवादाच्या चौकटीत बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. बुद्धाला विष्णूचा अवतार ठरवून त्यांची क्रांतिकारकता संपवण्याचा प्रयत्न जसा केला गेला तसाच प्रयत्न आज डॉ. आंबेडकरांच्या बाबतीत होतो आहे