आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँकेवरून राजघराण्यांचे प्रतिष्ठेचे युद्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकरविरुद्ध सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांचे घमासान सुरू आहे. राष्टवादीचे असून कधीच राष्टवादीचे नसलेले उदयनराजे आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असलेले रामराजे या दोघा राजघराण्याशी संबंधित असलेल्या नेत्यांमधला हा संघर्ष आता अधिक धारदार आणि टोकदार होत चालला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर हा संघर्ष काहीसा सुस्तावेल आणि परत निवडणुकीच्या काळात तो उसळी घेईल. सध्या मात्र रोज एका राज रहस्यांचा उजाळा सार्वजनिकरीत्या होत राहणार यात शंका नाही.

रामराजे आणि उदयनराजे यांच्या संघर्षाची पार्श्वभूमी समजावून घेण्याअगोदर या दोघांची राजकीय पार्श्वभूमी समजावून घेणे आवश्यक आहे. या दोघांमधे काही समान दुवे आहेत. स्वभावात पराकोटीची भिन्नता आहे आणि हे स्वभाव त्यांचे शक्तिस्थान आहे. हे दोघे ही संस्थान किंवा राजघराण्याशी निगडित आहेत. उदयनराजे तर छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज. नाईक निंबाळकर घराणेही या राजघराण्याशी निगडित. उदयनराजेंचे वडील छत्रपती प्रतापसिंह महाराज हे नगरपालिकेच्या राजकारणात तसेच सातार्‍याच्या समाजकारणात सक्रिय. तर रामराजेंचे वडील शिवाजीराजे हेही राजकारण, सहकार या क्षेत्राशी निगडित. दोघांनाही वडिलांच्या पश्चात राजकारणात स्थान निर्माण करण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागले. उदयनराजेंना स्वत:चे काका कै.आ.अभयसिंहराजे भोसले तर रामराजेंना तत्कालीन कृष्णचंद्र भोईटे, चिमणराव कदम, हिंदुराव नाईक निंबाळकर या लोकप्रतिनिधी, तत्कालीन नेत्यांशी झुंजावे लागले.

या मंडळींना त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मदत केली होती. रामराजेंच्या वडिलांना श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेतून आणि नंतर सामाजिक -राजकीय जीवनातून परास्त करण्यास शरद पवारांनी मदत केली होती. रामराजे आणि उदयनराजे दोघांनी आपली कारकीर्द नगरपालिकेच्या राजकारणापासून सुरू केली. रामराजे नगराध्यक्ष झाले नंतर आमदार, कृष्णा खोर्‍याचे उपाध्यक्ष, मंत्री आणि आता विधान परिषदेचे सभापती झाले. उदयनराजेंची कारकीर्द ही नगरसेवकापासून सुरू झाली आणि कालांतराने आमदार, कृष्णाखोरेचे उपाध्यक्ष, नंतर महसूल राज्यमंत्री आणि दोन वेळेस खासदार अशी सुरू आहे. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा विरोधी पक्षात असल्याने शरद पवारांविरोधात सुरू झालेली दोघांची कारकीर्द आज शरद पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या एका छत्राखाली आणि राज्याच्या जाणत्या राजाच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. सत्तेत येण्यासाठी संघर्ष, सत्तेत स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष तर आता ते टिकवण्यासाठी तसेच जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व टिकवण्यासाठी या दोघांचा संघर्ष सुरू आहे. या दोघांतील हे समान दुवे पाहताना त्यांच्यातील असमान परिस्थितीचे अवलोकनही आपण केले पाहिजे.

या सगळ्या प्रकरणाला रामराजे विधान परिषदेचे सभापती होणार या घटनेच्या चाहुलीपासून प्रारंभ झाला. खासदारकीला २००९ पासून होणारा विरोध तसेच राष्ट्रवादीच्या जिल्ह्याच्या राजकारणातून डावलले जाण्याची भावना यातून उदयनराजेंनी रामराजेंवर सभापती होण्याच्या कालखंडात कृष्णाखोरेच्या भ्रष्टाचाराच्या फैरी झाडल्या.सुक्या बरोबर ओले जळते या न्यायाने त्या वेळी अजित पवारांवरही उदयनराजेंनी टीका केली. त्या पूर्वी नव्या सरकारच्या पहिल्या नियोजन समितीच्या बैठकीत रामराजेविरुद्ध उदयनराजे हा सामना बैठकीत रंगला होताच. मात्र, त्यानंतर उदयनराजेंच्या पत्रकबाजीला वेग आला. रामराजेंनी आपल्या खासदारकीच्या उमेदवारीला विरोध केला म्हणून त्यांच्या सभापतिपदाच्या शर्यतीत त्यांनी अडथळे निर्माण केले. या काळात रामराजे काहीच बोलले नाहीत. मात्र सभापती झाल्यावर त्यांनी श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या प्रचारसभेत उदयनराजेंवर टीकास्त्र सोडले. त्यांचा आणि पाण्याचा संबंध दारूपुरता, मी त्यांना उजव्या पायाने मुजरा करेन किंवा त्यांनी छत्रपतींसारखे वागावे यासारखी शेलकी विशेषणे वापरली. याचा राग येऊन उदयनराजे समर्थकांनी रामराजेंचा पुतळा जाळला. त्याच्या दुसर्‍या दिवशी फलटण बंद झाले, तर उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेत रामराजेंवर थेट आरोप करत त्यांना सभापतिपदावरून काढून टाकण्याची मागणी केली. नाईक निंबाळकरांच्या पूर्वजांच्या धर्मांतराबाबत तसेच रामराजेंच्या चुलत बंधूंचे परमिटरूम-बिअरबारचे परवाने, श्रीराम सहकारी कारखान्याच्या जमिनी विकण्यात रामराजेंचा हात आहे या आरोपांची जंत्री उदयनराजेंनी वाचली.

आरोपप्रत्यारोपांचे हे प्रकार यापुढेही होतील मात्र हे का होतात याचा विचार केला तर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक हे आणि हेच एकमेव कारण सध्या दिसते. बँक निवडणुकीच्या निमित्ताने मागचे पुढचे हिशेब चुकते करण्याची संधी दोघे ही साधत आहेत. राजकीय हिशेब चुकते करण्याच्या नादात वैयक्तिक आणि वाडवडिलांची उणीदुणी काढत राजकारणात किमान सभ्यतेची पातळी दिवसेंदिवस कशी खालावते याचा वस्तूपाठ दिसत आहे. पंधरा वर्षे रखडलेल्या पाण्याच्या प्रकल्पांबद्दल कोणाला तशी काळजी नाही. आज रामराजेंचे आर्थिक भागल्याशिवाय कंत्राटदारांना वर्क आॅर्डर मिळत नव्हती हे उदयनराजे सांगत आहेत. उद्या रामराजे उदयनराजेंच्याबद्दल असे काही आरोप करतील, जिल्ह्यातले पाणी इतर जिल्ह्यात जाताना आणि आहे ते राखण्याचा विचार आणि कृती कोणीच करत नाही हेही प्रातिनिधिक उदाहरण म्हणून आपल्याला या भांडणातून दिसून येईल.

राष्ट्रवादीला राज्यात सगळ्यात झळझळीत यश मिळाले ते सातारा जिल्ह्यात. या जिल्ह्यास सभापतिपद मिळाले असताना ज्याप्रकारे भांडणे चव्हाट्यावर येतात त्याचा पक्षश्रेष्ठींनीही विचार केला पाहिजे. सभापतिपदाच्या मर्यादा सगळ्यांनी विषेशत: पक्षातील महत्त्वाच्या प्रतिनिधींनी सांभाळल्याच पाहिजेत. तसेच सभापतींनी हाताशी एवढी फौज असताना स्वत: वक्तव्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. या जिल्ह्याने प्रा.ना.स.फरांदे तसेच विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी शंकरराव जगतापांसारखी माणसे दिली. त्यांनी राजकारण केले मात्र, दर्जा आणि पदाचा आब ढळू दिला नव्हता याचेही भान ठेवायला पाहिजे. उदयनराजे यांनी यापूर्वी भाजप, काँग्रेस या पक्षात घरोबा केला होता. आता त्यांना भाजपमध्ये जायचे आहे, असे राष्ट्रवादीची मंडळी म्हणतात. तथ्य काही असो अजित पवारांशी टक्कर घेणारा आणि शरद पवारांना लोकसभा निवडणुकीच्या पराभवास कोण कारणीभूत आहे याची कारणमीमांसा सांगणारे उदयनराजे इतर पक्षाच्या नेत्यांना अधिक जवळचे वाटतात. शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे,भाजपचे गिरीष बापट किंवा काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी आणि पक्षाच्या नेत्यांशी त्यांची जवळीक रामराजेंसह इतरांच्याही मनात अस्वस्थता निर्माण करणारी आहे. अस्वस्थता दोन्ही बाजूंनी आहे. अस्वस्थता उदयनराजेंना जिल्हा मध्यवर्ती बँकेत न येऊ देण्यासाठी तर उदयनराजेंच्या दृष्टीने त्या सत्तास्थानात जाण्यासाठी या अस्वस्थतेला जपणे, त्याला योग्य तो परिणाम देणे दोघांना ही अनिवार्य आहे. एकदा उपद्रवमूल्य सिद्ध झाले की उदयनराजे पुन्हा या राजकारणाकडे ढुंकूनही पाहणार नाहीत ते पुढच्या निवडणुकीपर्यंत. तोपर्यंत रामराज्याचा उदय कधी होतो याची वाट राजे समर्थक पाहतील हे नक्की आहे.
मधुसूदन पतकी, सातारा.