आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखासाठी स्वत:वर, इतरांवर आणि देवावर प्रेम करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्य तीन नात्यांमुळे टिकून आहे. पहिले स्वत:शी, दुसरे इतरांशी आणि तिसरे देवाशी असलेल्या नात्यामुळे.
स्वत:ला जसे पाहाल तेच दुस-यात दिसेल: तुम्ही तेच देऊ शकता जे तुमच्याजवळ आहे. अज्ञान, बुद्धिमत्ता, समृद्धी किंवा गरिबी. तुम्ही तेच वाटू शकता जे तुमच्याजवळ आहे. ‘मी जसा आहे’ हे स्वीकार करू शकले नाहीत, तर ‘तुम्ही जसे आहात’ हेही स्वीकारले जाणार नाही. तुम्ही स्वत:लाच माफ केले नाही, तर दुस-यालाही करू शकणार नाही. हे जग तसेच दिसते जसे तुम्ही स्वत: आहात. जर तुम्ही स्वत:वर प्रेम करत असाल, तर जगावरही प्रेम करू शकाल. स्वत:ला ज्या दृष्टिकोनातून पाहाल त्याच दृष्टीने जग दिसेल. भगवान महावीरांनी म्हटले आहे, जगा आणि जगू द्या. त्यांनी सर्वप्रथम ‘जगा’ असे का म्हटले? याचे कारण असे की जोपर्यंत स्वत: कसे जगायचे माहीत नसेल, तर दुस-यांना काय जगवणार? त्यामुळे आधी स्वत:शी नाते बनवा.
बिनशर्त प्रेमानेच सुख मिळते : तुम्ही काय करता आणि काय नाही या गोष्टींवर प्रेमाची व्याख्या ठरत असेल, तर अशा प्रेमात कटुता येते. जिथे अटी यशस्वी होतात तिथे प्रेम नसतेच. जिथे प्रेम यशस्वी होते तिथे अटी नसतातच. प्रेम तेव्हाच प्रेम म्हणून राहील जेव्हा त्याला अटींचे बंधन नसेल. मग आपल्या आयुष्यात अशी प्रेम करणारी एक जरी व्यक्ती असली तरी तुम्हाला असुरक्षित वाटणार नाही. अशा एकाच नात्याच्या शक्तीनिशी तुम्ही जीवनात कोणत्याही संकटाचा धीराने सामना करू शकाल. काही जबाबदा-या असतात ज्या प्रत्येक नात्यात पूर्ण कराव्या लागतात. मात्र, यात प्रेमाला जखडून ठेवू नका. बिनशर्त प्रेम करा. त्याला सुरक्षेचे साधन बनवा. बिनशर्त प्रेम द्या. मात्र, आसक्ती ठेवू नका. अशा आसक्तीमुळे तुम्ही अवलंबून राहाल. तुम्ही हे नेहमी म्हणू शकता, ‘मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. नेहमीच करत राहीन.’ जर तुमचे प्रेम नात्यांवर अवलंबून असेल, तर तुम्ही असे म्हणू शकणार नाही. मात्र, तुमचे प्रेम फक्त तुमच्यावरच अवलंबून असेल आणि नात्यांचे काय होईल असा विचार जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही हे नेहमीच म्हणू शकाल. ‘मी तुझ्यावर प्रेम करतो आणि नेहमीच करत राहीन.’
देवाचे सदैव स्मरण करा : ज्वालामुखीतून बाहेर पडताच लाव्हा किती काळ गरम राहतो? सूर्याशिवाय जीवन किती दिवस जिवंत राहू शकेल? किरणे सूर्यापासून वेगळी केली तर अस्तित्वात राहतील? अशाच पद्धतीने स्वत:ला, दुस-याला, नात्याला जीवनाच्या स्रोतांपासून दूर न्याल तर काहीच वाचणार नाही. त्याची उपस्थिती तुम्ही प्रत्येक क्षण अनुभवता. प्रार्थना, ध्यान, जीवन जगायच्या पद्धती, विचार आणि भावना, स्वच्छ चारित्र्य, भक्ती, समर्पण, विश्वास सगळ्यात याची उपस्थिती आहे. जर देवाशी खरेखुरे नाते असेल, तर जीवन स्वत:ची देखभाल स्वत: करेल. मग पहिल्यांदाच तुम्हाला हे समजेल की, ‘जीवन अव्याहतपणे सुरू आहे.’