आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahatre Ra Article About Older Persons, Divya Marathi

वृद्धांना आनंदी आयुष्य जगण्यासाठी खास कॉलनी हवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्यांची काळजी घेणारे कुणीही नसते, त्यांची देखभाल करणे ही समाजाची जबाबदारी आहे. वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम ही एक सामाजिक जबाबदारी आहे. ज्या मुलांचे संगोपन करण्यासाठी आई-वडील नसतात आणि ज्या आई-वडिलांना सांभाळण्यासाठी त्यांची मुले नसतात, त्यांची देखभाल समाजाने करावी. त्यामुळे अशा प्रकारे परित्यक्त आई-वडील किंवा मुले नसू नयेत, अशी प्रार्थना मी करतो. मात्र, सत्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केल्याने त्याचे असत्यात रूपांतर करता येत नाही. मी प्रार्थना करतो की, प्रत्येक मुलगा किंवा मुलीने आपल्या आई-वडिलांची सेवा करावी, कारण ते माणसाच्या रूपातील देव आहेत; पण आई-वडिलांना वायावर सोडणे हे एक सत्य आहे आणि आपल्याला त्याचा सामना करावा लागेल.
आपल्या मुलाचे पालन-पोषण कसे करायचे किंवा त्याच्या विकासाला पूरक अशी वातावरणनिर्मिती घरात कशी करायची, हे माहीत नसेल, तर मुलांना निवासी शाळेत पाठवणेच योग्य आहे. आपल्याला योग्य संगोपन जमत नसेल, तर जो मुलाचे योग्य संगोपन करेल, त्याच्याकडे ठेवा. अशा परिस्थितीत मुलाला निवासी शाळेत ठेवणे यातच त्याचे भले आहे.याचप्रमाणे जी मुले किंवा मुली आपल्या आई-वडिलांची भावनिक पातळीवर देखभाल करत नाहीत, त्यांना आदर देत नाहीत, पर्वा करत नाहीत, त्यांना ओल्ड एज होम म्हणजेच वृद्धाश्रमात पाठवणे योग्य आहे. तेथे त्यांना प्रतिष्ठा, पारंपरिक सन्मान, भावनिक देखभाल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतर वृद्धमित्रांची साथ मिळेल. आपल्याच घरात नोकरासारखे राहण्यापेक्षा जिथे सेवा केली जाईल, अशा ठिकाणी राहा.
खरे तर आपण ‘ओल्ड एज रेसिडेन्सीज’ म्हणजेच वृद्धांची कॉलनी तयार केली पाहिजे. ही वसती फक्त वृद्धांसाठी अनुकूल असेल. हे वृद्धाश्रम नसून वृद्धांची कॉलनी असेल. वृद्धापकाळात राहण्याजोगी ही कॉलनी असेल. तेथे मनोरंजन, आध्यात्मिक प्रवचन, वाचन कक्ष, वैद्यकीय सुविधा, वृद्धांचे ज्ञान आणि कौशल्यानुरूप काम असेल. 60 वर्षांचे वृद्ध 65 वर्षांच्या वृद्धांची देखभाल करतील. ही मालिका अशीच पुढे सुरू राहील. वृद्धांना हव्या त्या सुविधा आणि अधिकार तेथे मिळतील. अशा कॉलनीत मुले-मुली जागा खरेदी करून आपल्या आई-वडिलांसाठी भेट म्हणूनही देऊ शकतील. तसेच आई-वडीलही त्यांच्या या स्वर्गासारख्या कॉलनीत मुलांना बोलावू शकतील. आई-वडील तसेच मुलांचा सामाजिक आणि व्यावसायिक उद्देश पूर्ण करण्यासाठी हा चांगला उपक्रम ठरू शकेल.