आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मालगाड्या धावणार विनागार्ड, अत्याधुनिक अँड ऑफ ट्रेन टेलिमेट्री प्रणालीचा वापर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मालगाड्यांसाठी विशेषत्वाने बनवण्यात येणाऱ्या “डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’मध्ये गार्डविनाच मालगाड्या चालवण्यात येणार आहेत. गार्डऐवजी शेवटच्या वॅगन किंवा कोचमध्ये अँड ऑफ ट्रेन टेलिमेट्री (ईओटीटी) प्रणाली लावण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे रेल्वेगाडी सुरक्षित पद्धतीने चालत असल्याची माहिती ड्रायव्हरला मिळत राहील.   
 
या निर्णयामुळे मालगाडी चालवण्याचा खर्च तर कमी होणारच आहे, पण मालवाहतूक करण्यासाठी अतिरिक्त कोचही मिळणार आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशनचे (डीएफसीसी) व्यवस्थापकीय संचालक आदेश शर्मा म्हणाले की, कॉरिडॉरमध्ये चालणाऱ्या मालगाड्यांना गार्डची व्यवस्था नाही. 
 
त्याऐवजी मालगाडीच्या शेवटी अत्याधुनिक इलेक्ट्राॅनिक सेन्सर प्रणाली लावण्यात येईल. यासाठी पाच लाख रुपयांचा खर्च येईल. या निर्णयामुळे गार्डचे वेतन आणि भत्त्यावरील खर्च कमी होणार आहे. शिवाय मालगाडीत गार्डच्या कोचच्या जागी अतिरिक्त वॅगन लावता येईल. मालगाडीची माल वाहून नेण्याची क्षमताही यामुळे वाढणार आहे. डीएफसीसीच्या वतीने दोन्ही कॉरिडॉरमध्ये ट्रेन प्रोटेक्शन वर्किंग सिस्टिम लावण्याचे काम सुरू आहे. यामुळे रेल्वेगाडीला अपघात होण्याची शक्यता कमी होईल. या प्रणालीद्वारे सिग्नलच्या आधी ड्रायव्हरला सूचना मिळेल. ड्रायव्हरने तरीसुद्धा गाडी पळवली तर ती आपोआप थांबेल, असे शर्मा म्हणाले.
 
ईओटीटी तंत्रज्ञानाच्या आधारावर मालगाडीच्या सर्वात शेवटच्या डब्यावर चिप लावली जाईल. याच्या माध्यमातून शेवटच्या डब्यापर्यंत रेल्वेगाडी सुरक्षित असल्याची माहिती ड्रायव्हरला मिळत राहील. कमी खर्चात मोठी बचत करण्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची ठरणार आहे. 
 
सध्या गार्ड का? 
मालगाडी चालत असताना एखाद्या वॅगची कपलिंग निघाली तर ड्रायव्हरला सूचना मिळावी यासाठी शेवटच्या डब्यामध्ये गार्डची व्यवस्था करण्यात आलेली असते. परंतु नवीन प्रणालीत शेवटच्या डब्याला चीप लावली जाईल. हीच चीप रेल्वेगाडी सुरक्षित धावत असल्याची सूचना ड्रायव्हरला देत राहणार आहे.
 
कोट्यवधीची बचत
ही प्रणाली लागू केल्यास एक हजार गार्डची सेवा समाप्त होणार आहे. एका गार्डच्या वेतन-भत्त्यासाठी वर्षाला १२ लाख रुपयांचा खर्च होतो. ईओटीटी प्रणाली लागू करण्यासाठी केवळ पाच लाख खर्च येईल. प्रति मालगाडी ७ लाख रुपयांची बचत होईल. या निर्णयाचा अतिशय चांगला फायदा होणार आहे.
 
८१,४५९ कोटींचा खर्च
{ दोन्ही कॉरिडोर निर्मितीसाठी ८१,४५९ कोटी रुपयांचा खर्च येणार. दोन वर्षात कॉरिडोर तयार होणार
{ २४ तासांच्या आत पूर्ण होईल दिल्ली-हावडा प्रवास. सध्या रेल्वे मार्गाने किंवा रस्त्याने जाण्यासाठी ७२ तास लागतात.

दोन कॉरिडोर बनणार
{  १,५०४ किलोमीटर लांब आहे पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर. 
{ १,८४० किलोमीटर लांब आहे पूर्व डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर
{ ३,३४४ किलोमीटर लांब या दोन्ही कॉरिडोरसाठी डीएफसीसीला जवळपास ८,८०० कर्मचाऱ्यांची गरज असेल. 
  
बातम्या आणखी आहेत...