Home »Divya Marathi Special» Man Made Disaster On Earth

पृथ्वीवरील अस्मानी संकट!

दा.कृ.सोमण | Feb 23, 2013, 02:00 AM IST

  • पृथ्वीवरील अस्मानी संकट!


नुकत्याच घडलेल्या दोन खगोलीय घटनांमुळे पृथ्वीवरील शास्त्रज्ञांचे तसेच सर्वसामान्य लोकांचे लक्ष आकाशाकडे पुन्हा वेधले गेले. त्यातील एक घटना प्रत्यक्ष घडल्यानंतर सर्वांना समजली, तर दुसरी घटना घडण्याआधी सर्वांना समजली. रशियातील उरल पर्वत प्रदेशातील आकाशातून गेल्या शुक्रवारी प्रचंड अग्निवर्षाव करत अशनीवर्षाव झाला आणि त्यामुळे सुमारे एक हजार जण जखमी झाले. हजारो घरांच्या भिंतींना तडे गेले. अशनीवर्षावामुळे पृथ्वीवर अस्मानी संकट ओढवले होते. संपूर्ण जगाचे लक्ष या घटनेने वेधून घेतले, तर गेल्या शनिवारी ‘2012 डीए 14’ हा पन्नास मीटर व्यासाचा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून म्हणजे 34 हजार 500 किलोमीटर अंतरावरून गेला. आपला चंद्र पृथ्वीपासून सरासरी तीन लक्ष चौ-याऐंशी हजार किलोमीटर अंतरावर आहे. पृथ्वीवरून सोडण्यात येणारे भूस्थिर कृत्रिम उपग्रह 36 हजार किलोमीटर अंतरावर असतात. यावरून हा लघुग्रह किती जवळून गेला याची कल्पना सर्वांना आली असेल. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला असता तर? पृथ्वीवर केवढे अस्मानी संकट कोसळले असते?

उल्कावर्षाव
अनेक धूमकेतू सूर्याच्या भेटीला येत असतात. धूमकेतू जसजसे सूर्याजवळ येतात तसतसे सौरवातामुळे आणि सूर्याच्या उष्णतेमुळे त्यांच्यातील धूलिकण वेगळे होतात. कालांतराने जरी धूमकेतू सूर्यप्रदक्षिणा करून गेला तरी हे धूलिकण त्याच्या मार्गात तसेच राहतात. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असताना काही वेळा ती या धूमकेतूतून सोडलेल्या धूलिकणांतून जाते. त्या वेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे धूलिकण पृथ्वीकडे खेचले जातात. जेव्हा हे धूलिकण पृथ्वीसभोवतालच्या वातावरणात शिरतात त्या वेळी घर्षणामुळे जळून जातात. काळोख्या रात्री त्या वेळी आपणास आकाशात प्रकाशित रेषा दिसते. त्याला आपण तारा तुटला असे म्हणतो. परंतु तो तारा तुटत नसतो. ती उल्का असते.
असे कित्येक टन धूलिकण पृथ्वीच्या दिशेने येत असतात, परंतु ते वातावरणाशी होणा-या घर्षणामुळे जळून जातात. पृथ्वीवरील वातावरण हे पृथ्वीचे संरक्षणही करत असते. जर धूलिपाषाण आकाराने मोठा असेल तर तो घर्षणामुळे पूर्णपणे जळून जात नाही. तो पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत येऊन आदळतो. त्याला ‘अशनी’ असे म्हणतात. रशियातील घटनेमध्ये अशनीवर्षाव झाला होता. अशनी पाषाण तुटून त्याचे अनेक तुकडे झाले होते. ते त्या भागात आदळले होते.

लोणार अशनी विवर
सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी 60 मीटर लांबीचा 20 दशलक्ष टन वजनाचा एक अशनी पाषाण दर सेकंदास 18 किलोमीटर या वेगाने आकाशातून येऊन पृथ्वीवर महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार या ठिकाणी आदळला. त्या वेळी अतिप्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण झाली. त्या वेळी त्या ठिकाणी 1.83 किलोमीटर व्यासाचे दीडशे मीटर खोल असे विवर निर्माण झालेले आहे. तो अशनी पाषाण जमिनीत रुतलेला आहे. तुम्ही कधी लोणारला गेलात तर तेथील अशनी विवर अवश्य पाहा. 20 किमींपेक्षा मोठ्या आकाराची 44 अशनी विवरे पृथ्वीवर ज्ञात झालेली आहेत.

पृथ्वीजवळून गेलेला अशनी
पृथ्वीवर आदळलेल्या अशनींची झालेली नोंद आपण पाहिली. आता अगदी पृथ्वीजवळून गेलेल्या अशनींच्या घटनाही घडलेल्या आहेत. 10 ऑगस्ट 1972 रोजी दिवसा अमेरिकेतून पृथ्वीजवळून जाणारा अशनी हजारो लोकांनी पाहिला होता. दिवस असूनही तो चमकणारा गोळा दिसत होता. 23 मार्च 1989 रोजी 300 मीटर व्यासाचा ‘अपोलो 4581’ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून 7 लक्ष किलोमीटर अंतरावरून गेला होता. 18 मार्च 2004 रोजी 30 मीटर व्यासाचा लघुग्रह 42 हजार 600 किमी अंतरावरून गेला होता. 31 मार्च 2004 रोजी ‘एफयू 162’ हा लघुग्रह फक्त 6 हजार 500 किमी अंतरावरून गेला होता. त्याचा व्यास 6 मीटर आकाराचा होता. 2 मार्च 2005 रोजी ‘डीडी 45’ हा लघुग्रह 72 हजार किमी अंतरावरून गेला होता. तो 35 मीटर व्यासाचा होता. 13 जानेवारी 2010 रोजी ‘एएल 30’ हा लघुग्रह पृथ्वीच्या 1 लाख 22 हजार किमी अंतरावरून गेला होता. 28 जून 2011 रोजी ‘एमडी’ हा 5 ते 22 मीटर आकाराचा लघुग्रह फक्त 20 हजार किमी अंतरावरून गेला होता. त्या वेळी तो अटलांटिक महासागरावरून गेला होता. 8 नोव्हेंबर 2011 रोजी ‘वाययू 55’ हा 400 मीटर व्यासाचा लघुग्रह पृथ्वीपासून 3 लक्ष 24 हजार किमी अंतरावरून गेला होता. तसेच 27 जानेवारी 2012 रोजी 10 मीटर व्यासाचा ‘बीएक्स 34’ हा लघुग्रह पृथ्वीपासून 60 हजार किमी अंतरावरून गेला होता. त्यानंतर 16 फेब्रुवारी 2013 रोजी पृथ्वीजवळून गेलेल्या ‘डीए 14’ या लघुग्रहाची नोंद झाली आहे.

अशनींची धडक
साडेसहा कोटी वर्षांपूर्वी मेक्सिको देशातील युकातान प्रदेशात असाच एक अशनी पृथ्वीवर आदळली होता. त्या वेळी डायनासोर नष्ट झाले होते.30 जून 1908 रोजी रशियातील सैबेरिया प्रदेशात तुंगस्का येथे साठ मीटर व्यासाच्या अशनीने किंवा धूमकेतूने पृथ्वीला धडक दिली होती. त्या वेळी दोन हजार चौरस किलोमीटर प्रदेशातील जंगल उद्ध्वस्त झाले होते. हिरोशिमा क्षमतेचे एक हजार अणुबॉम्ब फुटावेत एवढा तो जबरदस्त आघात होता. त्या वेळी हा स्फोट जमिनीपासून साडेआठ किलोमीटर उंचीवर झाला होता.
22 सप्टेंबर 1979 रोजी दक्षिण अटलांटिक महासागर आणि हिंदी महासागर येथेही स्फोट झाला होता, परंतु तो नैसर्गिक अशनींमुळे होता की आण्विक परीक्षणामुळे झाला होता हे मात्र अजूनही कळलेले नाही.
6 जून 2002 रोजी ग्रीस आणि लिबिया यांच्यामधील मेडिटेरिनीन समुद्रात दहा मीटर व्यासाचा अशनी आदळला होता.
6 ऑक्टोबर 2008 रोजी शास्त्रज्ञांनी एक अशनी पृथ्वीवर आदळण्याची शक्यता जाहीर केली होती. त्याप्रमाणे 7 ऑक्टोबर 2008 रोजी सुदानमध्ये अशनी आदळला होता. शास्त्रज्ञांनी प्रथमच असे भाकीत केले होते आणि ते खरेही झाले होते.
8 ऑक्टोबर 2009 रोजी बोन-इंडोनेशियामधून दहा मीटरचा अशनी अवकाशात जळताना दिसला होता. मात्र, त्यामध्ये कोणतीही व्यक्ती जखमी झाल्याची नोंद नाही.
त्यानंतर 15 फेब्रुवारी 2013 रोजी रशियात अशनी तुकड्यांचा
वर्षाव होऊन हजारपेक्षा जास्त व्यक्ती जखमी झाल्याची नोंद झाली आहे.
संभाव्य टकरी
यानंतर 1 फेब्रुवारी 2019 रोजी एक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. 16 मार्च 2880 रोजीदेखील एक लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार आहे. 15 जुलै ते 22 जुलै 1994 या कालावधीमध्ये शूमेकर लेव्ही -9 या धूमकेतूच्या 21 तुकड्यांनी गुरू ग्रहाला टक्कर दिली होती. तसेच एखादा लघुग्रह - धूमकेतू पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशा घटना क्वचितच घडत असतात. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.

dakrusoman@gmail.com

Next Article

Recommended