आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एेका काेवळ्या वयाचा हुंकार...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किशोरावस्था हा माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. या वयात व्यक्तीला योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्याचा त्याच्या आयुष्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होतो. म्हणूनच मागील चार वर्षांपासून ‘सुकन्या’ हा किशोरवयीन मुलींसाठी प्रशिक्षण कार्यक्रम व त्याला जोडणारे इतर उपक्रमही अाम्ही राबवताे.

वयात येताना मुलांमध्ये अनेक शारीरिक व मानसिक बदल होतात. या बदलांमुळे त्यांच्या मनावर व विचारांवर परिणाम होतो. साधारणतः १३ ते १८ वयापर्यंतचा काळ पौगंडावस्थेचा व स्थित्यंतराचा समजला जातो. रजोप्राप्ती हा निसर्गनियम आहे. या निसर्गक्रमात शरीरात व मनात अनेक प्रलय येतात. मुली लहानही नाही अन‌् मोठ्याही नसतात. त्यांच्या जीवनातील घडामोडी, वाढीचा टप्पा व सामाजिक, आर्थिक स्थितीप्रमाणे त्यांच्या गरजा बदलतात.
भारतात किशोरी मुलींच्या गरजा अाणि समस्यांकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. कारण या वयातील मुली सर्वसाधारणपणे असुरक्षित वातावरणातच वावरतात. वैद्यकीय सोयी आणि शिक्षणापासून वंचित राहतात. त्यांना त्यांच्या लैंगिक आणि प्रजननविषयक आरोग्याच्या गरजांबद्दल, त्यांच्या हक्कांबद्दल जाणीव नसते आणि पूर्वीपासून चालत असलेल्या जुनाट परंपरा आणि चुकीच्या समजुतींमुळे किशोरवयीन मुलींचे प्रश्न तीव्र बनत जातात.

शैक्षणिक उदासीनता
भारतातील शाळा विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देण्याबाबत अनिश्चित भूमिकेत आहेत. ज्या शाळांच्या अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षण आणि प्रजनन शिक्षण हा अभ्यासक्रमाचा भाग आहे, तो शिकविण्यास बहुतेकवेळा शिक्षक राजी नसतात किंवा त्यांना ते शिकवणं कठीण जातं. त्यामुळे शाळेत हे विषय परिणामकारकरित्या किशोरींपर्यंत पोहोचतच नाही. अाम्ही मागील वर्षात शाळांमध्ये किशोरी प्रशिक्षणाचा एकदिवसीय कार्यक्रम घेतला. त्यातून एक गोष्ट निश्चित आहे की, या गटासोबत काम करणे गरजेचे आहे. सरकारी योजना ज्या किशोरी गटासाठी आहेत, त्या परिपूर्ण नाहीत. त्यात मुलींचा व बायकांचा पुन:उत्पादक म्हणूनच विचार केलेला दिसतो. पण त्यांच्या शारीरिक व मानसिक प्रश्नांचा कुठेही विचार केला जात नाही.
असे अाहे वास्तव
पौगंडावस्थेत मुली भांबावून जातात. आपल्याला शरीराची योग्य माहिती, होणारे बदल समजावून सांगणारे, प्रश्नांना वाचा फोडणारे कोणीच नसल्याने बऱ्याचदा चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जातो व त्या चुकीचे परिणाम त्यांना आयुष्यभर सोसावे लागतात. त्यामुळे सततची अपराधीपणाची भावना मनात निर्माण होते.

या वयातील बहुतेक मुली प्रेमात पडतात, पण त्या प्रेमाचा अर्थ शारीरिक संबंधांपुरताच सीमित असतो. यात सगळ्यात पहिले मुलींचे शिक्षण थांबवले जाते. मुलींना नंतर कळतं की, आपण जो मार्ग स्वीकारला आहे, ताे अॅडजेस्टमेंट आहे. नको असणारं लग्न, शिक्षण बंद, लग्नाच्या अगोदरचे गरोदरपण या चक्रात अडकायचे नसेल तर किशोरींना प्रशिक्षणातून काही गोष्टी निश्चितच त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. त्यांना त्यांच्या शरीराची अाेळख असणं गरजेचं आहे.
अापण हे करू शकताे
हे जग, आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. या जगात सगळंच वाईट नाही. त्यासाठी आपण आपल्या आयुष्याकडे व स्वत:कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे व मुलींना आपल्या घरातून, समाजातून आत्मविश्वास दिला पाहिजे. तसेच मुलींना पुढे येण्याची संधी दिली पाहिजे. आपल्या मुलींना आत्मसन्मान टिकवता येईल असा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या शारीरिक व भावनिक बदलांची कारणे समजून घेतली पाहिजे व त्यांना समजवली पाहिजे. आता मुलींची स्वप्नं, ध्येय, आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे.
अापलं कुठे चुकतं
- मी बाई अाहे ही संकल्पनाच मुलींना नवी वाटते. कारण घरापासून ते समाज, प्रसारमाध्यम, जाहिराती मनावर हेच बिंबवतात की, कोणाच्या तरी गरजा, भावना, इज्जत सांभाळण्यासाठी तुझा जन्म आहे.
- वयात आलेल्या मुलीला आई धाकात ठेवते, पण तिला समजावून सांगत नाही. मुलीची मैत्रीण होणं ही काळाची गरज आहे.
- स्त्री-पुरुष समानता समाजात आणणं, रुजवणं अतिशय गरजेचं आहे. कारण तसं झालं तर मुलींवरचे, महिलांवरचे अत्याचार कमी होतील.
- किशोरावस्थेचा संबंध धर्म, संस्कृती, समाज, शिल, परंपरा, चारित्र्य, अब्रू यांच्याशी जोडल्यामुळे या सगळ्याचा अतिशय दबाव असल्यामुळे त्यावर कोणी काही बोलत नाही.
वास्तव
- बहुसंख्य लोकांना आजही असे वाटते की, मासिक पाळीमुळे विटाळ होतो, शरीर अपवित्र वाटते. परिणामत: मुलींना कायमच स्वत:चे शरीर अपवित्र, अस्वच्छ वाटते.
- न्युट्रिशियन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या पाहणीनुसार पहिली मासिक पाळी येण्याचे वय १३-१४ हे असूनही १२ ते १५ वयोगटातील ५० टक्के मुलींना मासिक पाळीबद्दल माहिती नसते.
- मुलींचे आरोग्य, पोषण, शिक्षण याबाबतीतही होणारा दुजाभाव किशोरावस्थेत जास्तच
प्रकर्षाने जाणवतो.
- पौगंडावस्था सुरू होताच बोलणे, वागणे, चालणे, दिसणे, पेहराव आणि भिन्नलिंगी व्यक्तींबरोबरचे वर्तन या सर्वांवर मर्यादा येतात.
- आपल्या आईच्या सांगण्याप्रमाणे मुली घरकामात गुंततात आणि लिंगभावाच्या भूमिकेत अडकतात.
- स्वत:बद्दल कमीपणा वाटणे, स्वप्रतिमा दुय्यम स्तरावर असणे ही गोष्ट या मुलींमध्ये सार्वत्रिक आढळते.
बातम्या आणखी आहेत...