केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची राज्यसभेवर निवड झाल्याने माढा लोकसभा मतदारसंघातील त्यांचा वारस ठरवण्यापासून ते जिल्ह्यातील प्रबळ मानल्या गेलेल्या मोहिते-पाटील कुटुंबातीलच प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी घेतलेल्या टोकाच्या विरोधी भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर, तर विरोधकांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना की राष्ट्रीय समाज पक्ष या वादामुळे महायुतीसमोर मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे.
मुळातच सोलापूर जिल्हा हा आजवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात एकहाती राहिला आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादीची ताकद कायम राहिली आहे. पण गेल्या साडेचार, पाच वर्षांत राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शरद पवार यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. त्यामुळे येणार्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस तेथे पवारांचा वारस म्हणून कोणाला पुढे करते यावर बरेच काही अवलंबून आहे.
सध्यातरी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. तसा राष्ट्रवादी काँग्रेसकडे तगडा उमेदवार सध्यातरी दिसत नाही. त्यामुळे मोहिते-पाटील हेच पर्याय ठरतील, असे सांगितले जात आहे, पण मोहिते-पाटील यांनीही उमेदवारी घ्यायची की नाही याबाबत खूपच सावधगिरी बाळगली आहे. मोठय़ा प्रमाणात चाचपणी केली जात आहे. मतदारसंघ धुंडाळला जात आहे, पण हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसलाही तेवढा सहजासहजी मिळणारा नाही, असे आताचे तरी चित्र आहे. मोहिते-पाटील यांचे धाकटे बंधू व माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनीही आपले राजकीय अस्त्र उगारायला सुरुवात केली आहे. शरद पवार यांच्यामुळेच जिल्ह्याचे वाटोळे झाले, असे आरोप ते आता करू लागले आहेत. मोहिते-पाटील घरातीलच या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर आता वेगळाच पेच उभा राहिला आहे. तो कसा सोडविला जातो यावरच उमेदवार कोण हेही ठरणार आहे.
विशेष म्हणजे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची माढा लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याने ते ही परिस्थिती कशी हाताळतात याकडे पक्षाचेही लक्ष लागून राहिले आहे. पक्षांतर्गत धुसफूस हा भागतर वेगळाच आहे. दोन दिवसांपूर्वीच पाटील येऊन गेले. त्यांनी मोहिते-पाटील यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. पण मोहिते-पाटील आणि आर. आर. पाटील यांच्यातील सख्यही सर्वांना ठाऊक आहेच. दुसरीकडे माढय़ातील प्रबळ मानला गेलेला दुसरा गट म्हणून आमदार बबनराव शिंदे, संजय शिंदे यांच्याकडे पाहिले जाते, त्यांची भूमिका माढा विधानसभा मतदारसंघ डोळयासमोर ठेवूनच राहणार आहे, यात वादच नाही. एक वेगळीच राजकीय तेढ सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेससमोर निर्माण झाली आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीतील धुसफूस व काँग्रेस आघाडी सरकारबद्दल असलेली ग्रामीण भागातील जनतेची नाराजी याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होणार यात वाद नाही, पण भाजप-सेना-रिपाइं महायुतीत खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही समावेश झाला आहे, त्यामुळे माढय़ातून या संघटनेचे सदाभाऊ खोत हे उमेदवार म्हणून उभे ठाकतील, असे जवळपास निश्चित झाले आहे, पण राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनीही या मतदारसंघात दावा केला आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या विरोधात लाखावर मते त्यांनी घेतली होती. यावेळी महायुतीने उमेदवारी दिली नाही तर आपण बाहेर पडू, असा इशारा दिला आहे, तर दुसरीकडे मोहिते-पाटील हे उमेदवार असतील तर त्यांचे राजकीय मित्र म्हणून ओळख असलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्याकडून माढा मतदारसंघात उमेदवार म्हणून कोणाची शिफारस होते यालाही विशेष महत्त्व दिले जात आहे. प्रतापसिंह मोहिते-पाटील, सातार्याचे उदयनराजे भोसले आदी मंडळी माढा मतदारसंघात वेगळी राजकीय समीकरणे निर्माण करण्यास आसुसलेली आहेत. त्यामुळे निवडणुकीअगोदरच उमेदवारीचे रणकंदन माजले आहे.