आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबेळगाव सीमाभागातील नवनिर्वाचित दोन मराठी आमदारांनी नुकतीच कर्नाटक विधानसभेत मराठीमधून शपथ घेतली व मराठी अस्मितेचे दर्शन पुन्हा घडवून सार्यांचे लक्ष वेधले. महाराष्ट्रात मराठी संस्कृतीचा र्हास होत चालला आहे, असे म्हणताना बेळगाव शहर व परिसरात काय चालले आहे, हे अभ्यासणे गरजेचे आहे. वाचन संस्कृतीकडे पाहू गेल्यास बेळगावात सार्वजनिक वाचनालय, सरस्वती वाचनालय, वाङ्मय चर्चा मंडळ वाचनालय, छत्रपती शिवाजी वाचनालय ही खूप जुनी वाचनालये आहेत. महाराष्ट्रातील वाचनालयाप्रमाणेच इथल्या मराठी वाचकांची संख्या रोडावत गेली, तरीही अनेक विरोधांना तोंड देत सार्वजनिक वाचनालय, सरस्वती, वाङ्मय चर्चा मंडळ ही वाचनालये इथली मराठी संस्कृती जपत आहेत.
बेळगावातील सार्वजनिक वाचनालयाची बॅ. नाथ पै व्याख्यानमाला अजूनही थाटामाटात उभी आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय, विचारवंत, साहित्यिक, सामाजिक वक्त्यांनी इथे हजेरी लावली आहे. केवळ लोकप्रियच नव्हे, तर सर्वसमावेशक विचारांचे वक्ते इथे बोलावले जातात. पुरोगामी विचार मांडले जातात. इथे मात्र श्रोत्यांची वाण दिसते. गेली पन्नास वर्षे महिलांनी चालवलेली पाच दिवसांची वसंत व्याख्यानमाला दिमाखात उभी आहे. कॉलेजमधून पूर्वी नामवंतांची व्याख्याने होत. त्यांची संख्या घटली असली तरी ‘नॅक’ व ‘चर्चासत्रे’ यानिमित्ताने मराठी व्याख्यानांची संख्या अजून तग धरून आहे. कॉ. मेणसे पुरोगामी व्यासपीठ, व्याख्याने, ज्योती कॉलेज, राणी चन्नमा पदव्युत्तर विद्यापीठ, लोकनाट्य ग्रंथालय, मंथन, शब्दगंध वगैरे संस्थांच्या माध्यमातून अधूनमधून कमीअधिक श्रोत्यांसह व्याख्याने होतच असतात. वक्तृत्व स्पर्धांची अवस्था मात्र चिंता करण्याजोगी आहे. कधीकधी तीन बक्षिसांसाठी फक्त पाच-सहा विद्यार्थीच भाग घेतात. एकेकाळी खूप गाजलेल्या सार्वजनिक वाचनालय, वाङ्मय चर्चा मंडळ इ. संस्थांच्या वक्तृत्व स्पर्धा नामशेष होतील की काय, ही भीती आहे. काही बंद पडल्या आहेत. बेळगाव व सीमाभागातील बहुतांश कॉलेजांमध्येही याबाबत आशादायक वातावरण नाही.
तीस-चाळीस वर्षांपूर्वी बेळगाव व परिसरात मराठी नाटके जोरात चालायची. काही प्रसिद्ध नाटके पुन्हा पुन्हा यायची. येथील मराठी संस्कृतीचे खच्चीकरण करण्याच्या हेतूने नाटकासाठी येणार्या बस गाड्यांना कर्नाटक सरकारने जबरदस्त कर बसवला. येणार्या नाटकांची संख्या कमी झाली अथवा नाटके आलीच तर ती प्रेक्षकांना महागात पडू लागली. नाटक पाहण्यासाठी आसुसलेले लोक पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली भागात गेले की नाटक पाहून येऊ लागले. आता खूप वेळाने नाटके येतात. नाट्य संस्थांचे दौरेही हल्ली कमी झालेत. येथे वरेरकर नाट्यसंघ, वाङ्मय चर्चा मंडळ, नाट्यांकुर, अलीकडे स्थापन झालेली अ. भा. नाट्य परिषदेची शाखा इ. या संस्था थोड्या प्रमाणात का होईना नाट्यक्षेत्र सांभाळून आहेत. मुंबई, दिल्ली येथे जाऊन नाट्यस्पर्धांची बक्षिसे मिळवून आणतात. सुट्टीमध्ये काही संस्था नामवंत कलाकारांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यशिबिरे भरवतात. कॉलेजमधून पूर्वी तीनअंकी नाटके व्हायची, त्याची जागा मात्र आता ऑर्केस्ट्राने घेतली आहे. महाराष्ट्र व सीमाभागातील 30 पेक्षा अधिक संघ या स्पर्धांत भाग घेतात. पूर्वी वरेरकर नाट्यसंघाने 20 वर्षांपूर्वी अशा स्पर्धा सलग सात-आठ वर्षे भरवल्या होत्या.
बेळगाव परिसरात होणार्या एक दिवसाच्या मराठी साहित्य संमेलनाने या भागात संस्कृतीची घोडदौड चालवली आहे. कडोली, उचगाव, बेळगुंदी, येळ्ळूर, माचीगड, कारदगा, निपाणी इ. गावांत मराठी साहित्य संमेलने होतात. गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे बाल साहित्य संमेलन व मंथन संस्थेतर्फे महिला साहित्य संमेलनही बेळगाव शहरात भरतात. निलजी येथेही बाल साहित्य संमेलन सुरू झाले आहे. कडोली गावात 25 वर्षांहून अधिक काळ हे संमेलन सुरू आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व नामांकित साहित्यिक व वक्ते अध्यक्ष म्हणून अथवा परिसंवादासाठी येथे येऊन गेले आहेत. या सर्वच संमेलनांना प्रचंड गर्दी असते. दोन ते तीन हजार श्रोत्यांचा जमाव येथे व्याख्याने ऐकण्यासाठी जमतो. मराठी अभिमान, अस्मिता येथे प्रगट होते. अध्यक्षीय भाषण, परिसंवाद, कथाकथन, काव्यवाचन यानिमित्ताने येथे पाहुण्यांबरोबरच स्थानिकांनाही साहित्यगुण दाखवण्याची संधी मिळते. ‘हा परिसर महाराष्ट्राला जोडावा’ असा ठराव येथे दरवर्षी संमत होतो.
याशिवाय येथे मराठी सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर चालतात. महिलांनी चालवलेला शारदोत्सव हा कार्यक्रम 30 वर्षांहून अधिक काळ मोठ्या उत्साहात सुरू आहे. व्याख्याने, नाट्यदर्शन, प्रसंग दर्शन, अभिनय स्पर्धा, संपूर्ण नाटक असे या पाच दिवस चालणार्या उत्सवाचे स्वरूप असते. त्याला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळतो. ‘इंद्रधनुष्य’ या संस्थेतर्फे तसेच ‘लक्षवेधी’ या संस्थेतर्फे भावगीते, भक्तिगीते, स्फूर्तिगीते, लावण्या, लोकगीते, वाद्यवृंद स्पर्धा गेल्या अनेक वर्षांपासून आयोजिल्या जातात. त्याशिवाय फक्त कवितेला वाहिलेले शब्दगंध कविमंडळ अनेक वर्षे कार्यरत आहे. लोकमान्य सोसायटी व लोकमान्य ग्रंथालयातर्फे मुलाखती, पुस्तक परिचय वगैरे कार्यक्रम आयोजिले जातात.
महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणेच बेळगाव परिसरात मराठी वाचन संस्कृती, नाट्यसंस्कृती यांचा र्हास होत जाण्यास साधारणत: पुढील कारणे आढळतात. (1) नवी पिढी इंग्रजी माध्यमाकडे वळल्याने मराठी विद्यार्थ्यांमध्ये होणारी घट. इंग्रजी माध्यमात सहसा नाट्यसंस्कृती, लोककला यांची ओळख करून दिली जात नाही. (2) कॉलेज विद्यार्थी, इंजिनिअर, डॉक्टर हे व्यावसायिक शिक्षण घेत असल्याने तो सांस्कृतिक अंगापासून दुरावतो. (3) फक्त पगाराचे हिशेब करणारा शिक्षक वर्ग सांस्कृतिक, साहित्यिक बाबीत जास्त लक्ष घालत नाही. त्या अंगांनी विद्यार्थी घडवत नाही, तर प्राध्यापकांना प्रगतीच्या नावाखाली ‘नॅक’ने जखडून टाकले आहे. गॅदरिंगचे स्वरूप नाटकांचे, प्रबोधनाचे न राहता केवळ ऑर्केस्ट्रातील उडत्या गाण्यांवर स्थिर झाले. (4) कर्नाटक सरकारने इथे मराठी संस्कृतीचे जाणीवपूर्वक खच्चीकरण केले. मराठी नाटकांसाठी येणार्या बसवर जबरदस्त प्रवेश कर बसवला. गेल्या 53 वर्षांत मराठी संस्कृती जपण्यासाठी कर्नाटक सरकारने एकही पैसा खर्च केला नाही. मराठी शाळा, मराठी लोकसंख्या घटण्यासाठी सतत प्रयत्न केले. (5) कर्नाटक सरकारने सीमाभागातही मोठ्या प्रमाणावर अन्यायी पद्धतीने कानडीकरण केले. कन्नडिगांची लोकसंख्या व टक्केवारी वाढवण्याचा सतत प्रयत्न केला. शिक्षणात, चौकाचौकांत, कचेर्यांवर सर्वत्र फक्त कानडी फलक, कानडी कागदपत्रे यांची सक्ती केली. मराठी संस्थांचे मूलभूत हक्क डावलले. (6) महाराष्ट्र सरकारनेही ‘बेळगाव आमचेच’ म्हणत दुर्लक्षच केले. अलीकडच्या दोन वर्षांत काही मराठी संस्थांना मदत देणे सुरू केले आहे. त्यातही दिरंगाई आहेच. (7) जुन्या संस्थांमधील निष्ठावंत व जाणकारांच्या निधनानंतर व्यासंग हा भाग कमी झाला. कार्यात शिथिलता आली. झटून काम करण्यापेक्षा व्यासपीठावर मिरवण्यात धन्यता मानणार्या उथळ मंडळींचे युग आले. (8) संस्था चालवण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. हा वेळ तरुणांना मिळेनासा झाला. (9) देशभरात सर्वच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक इ. चळवळींना आलेली शिथिलता बेळगाव व सीमाभागातील अन्य ठिकाणीही जाणवणे साहजिक आहे.
पूर्वीप्रमाणे साहित्यिकांची परंपरा बेळगाव व परिसरात आजही आहे. साहित्य पुरस्कार मिळवणार्यांची संख्याही काही कमी नाही. अ. भा. मराठी साहित्य परिषदेची शाखाही इथे स्थापन झाली आहे. गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव इथे जोरात चालतात. बेळगाव परिसरातील या मराठी संस्थांना महाराष्ट्रातील सर्व संबंधित संस्थांची सक्रिय व आर्थिक साथ मिळणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारनेही अगदी काटेकोरपणे नियम दाखवत न बसता सीमावासीयांच्या या सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमांना खंबीरपणे पाठिंबा दिला पाहिजे, तरच इथे मराठीची भरभराट होत राहील. हा गेल्या पन्नास वर्षांतला आढावा सर्वसमावेशक असेलच असे नाही. विस्मरणाने किंवा न कळत काही उल्लेख राहून गेले असतील. वाचकांना तसे आढळल्यास वा त्यांनी सुचवल्यास त्यांचे स्वागतच आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.