आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Marathi Easy,pure,free And Unlimited In Computer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संगणकात सोपी, शुद्ध, मोफत आणि मनसोक्त मराठी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आपण दरवर्षी 2७ फेब्रुवारीस मराठी दिन साजरा करतो, तसा तो यावर्षी ही साजरा करणार आहोत. या दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेच्या भवितव्याविषयी महाराष्ट्रात बरीच उलटसुलट चर्चा होते आणि त्यातून मराठी भाषेच्या विकासाला चालनाही मिळते. मात्र, मराठीच नव्हे तर जगातल्या कोणत्याही भाषेचा विकास ती भविष्यात संगणकात कशी वावरते किंवा वापरली जाते, त्यावर अवलंबून आहे, ही बाब मात्र दुर्लक्षित होते. ‘दिव्य मराठी’ ने मराठी भाषेचे अभ्यासक शुभानन गांगल यांना बरोबर घेऊन यावर्षी ‘संगणकात वापरा मनसोक्त मराठी’ ही मोहीम हाती घेतली आहे. कवी कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांची कमर्भूमी राहिलेल्या नाशिक येथून उद्यापासून (दि.1७) ही मोहीम सुरू होत आहे. पुढील आठवड्यात औरंगाबाद, जळगाव आणि पुढे सोलापूर, नगर येथेही ती घेतली जाणार आहे.

जगातल्या पंधराव्या क्रमांकाची मराठी भाषा आज मागे पडली आहे, कारण संगणक आणि मराठी असा विचार करता तिचा वावर सहजसोपा राहिला नाही. त्यामुळे भविष्यातील आव्हाने ती पेलू शकणार नाही, असे वातावरण तयार झाले. याचे कारण मराठी भाषेतील मान्यवर हा संबंधच मान्य करायला तयार नव्हते. आता मात्र संगणकाचे महत्त्व सर्वांनाच उमजले असून ‘मला संगणकात मराठी वापरायची आहे’, असे त्यातील शहाणे म्हणू लागले आहे. तरुण पिढीतील अनेकांनी हा बदल केव्हाच स्वीकारला असून ते संगणकावर भरभरून व्यक्त होत आहेत. असे असले तरी आजही अनेक जण असे आहेत की त्यांना संगणकात मराठी भाषा वापरता येते का, ती अवघड असेल का, त्यासाठी किंमत मोजावी लागेल का, त्यासाठी इंटरनेटची जोड लागते काय, असे प्रश्न मनात घेऊन किंवा आपल्याला इंग्रजी येत नाही म्हणून आपला आणि संगणकाचा संबंध नाही, असा समज करून या बदलापासून दूर पळत आहेत. अशा सर्वांना आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे ‘दिव्य मराठी’च्या या मोहिमेतून मिळणार आहेत.

संगणकात सर्वांना मनसोक्त मराठी वापरता आली पाहिजे, याचे चार प्राथमिक निकष आहेत. ती अतिशय सोप्या पद्धतीने वापरता आली पाहिजे, मराठीचे स्वत्व अबाधित ठेवून ती जगाशी जोडली गेली पाहिजे, संगणकात वापरताना ती कोठेही कमी पडता कामा नये आणि ती वापरताना मराठी माणसाला कोणताही आर्थिक भुर्दंड पडता कामा नये. हे निकष ही मोहीम पूर्ण करते. त्यामुळे संगणकात मराठीचा वापर करताना अडून राहिलेल्या प्रत्येक मराठी आणि गरजू अमराठी बांधवाने या मोहिमेत भाग घेतला पाहिजे.

मानवी जीवनात संगणकाच्या माध्यमातून संपर्कक्रांती झाली आहे. संपर्काचे माध्यम अर्थातच भाषा हेच असणार आहे. इंग्रजांनी संगणक तयार केल्यामुळे साहजिकच इंग्रजीचा वापर अपरिहार्य ठरला. मात्र, आता समृद्ध आणि सक्षम अशी मराठी भाषा संगणकात कोठेही कमी पडत नाही, हे सिद्ध झाले आहे. एवढेच नव्हे तर संगणकाला भविष्यात मोठी झेप घ्यायची असेल तर मराठी किंवा मराठीसारख्या समृद्ध भाषेची मदत घ्यावी लागणार आहे. (इंग्रजी ही आज जागतिक भाषा असली तरी भाषा म्हणून ती अतृप्त असल्याने तिचे बोट संगणकाला सोडावे लागेल, याविषयीचे संशोधन श्री. गांगल गेली काही वर्षे करत आहेत.) अर्थात त्यासाठी मराठी भाषेचा संगणकातील वापर वाढला पाहिजे आणि मराठीला मानाचे स्थान मिळाले पाहिजे. यातला पहिला टप्पा साध्य करण्यासाठी संगणकात सर्व मराठी बांधवांनी मनसोक्त मराठी वापरणे, ही काळाची गरज आहे. ती समोर ठेवूनच ‘दिव्य मराठी’ ने ही मोहीम आरंभिली आहे.

अशी आहे जलद सोपी मराठी मायक्रोसॉफ्टने संगणकात जो युनिकोड दिला आहे तोच जलद सोपी मराठीने टाइप होणार आहे. युनिकोडला आपल्या सरकारनेही स्वीकारले आहे.
मायक्रोसॉफ्टने जो की बोर्ड दिला आहे, तो मात्र हिंदीसह अनेक भाषांसाठी वापरण्याची जणू सक्ती केली आहे. मराठीसाठीही तोच की बोर्ड वापरावा लागतो. त्यामुळे अनेक शब्द मराठीत अशुद्ध स्वरूपात घुसखोरी करत आहेत. जलद सोपी मराठीने त्याला सोपा आणि शुद्ध पर्याय दिला आहे.जलद सोपी मराठी की बोर्डमुळे मराठी लेखन बाराखडी सूत्रातून शिकता येते. त्यामुळे लहान मुले आणि वयस्करांनाही ती लगेच शिकता येतो.

जलद सोपी मराठी की बोर्ड जगभर वापरल्या जाणा-या इंग्रजी की बोर्डाशी जोडला असून ९0 टक्के फोनेटिक पद्धतीने वापरता येतो. जलद सोपी मराठी की बोर्डमध्ये जोडाक्षरे खूपच सोप्या पद्धतीने टाइप करता येतात.
जलद सोपी मराठी की बोर्ड वापरण्यासाठी कोणताही आर्थिक भुर्दंड पडत नाही. तो सर्वांसाठी मोफत उपलब्ध करण्यात आला आहे.संगणकात तो सर्व अ‍ॅप्लिकेशनमध्ये इंग्रजीच्या बरोबरीने वापरता येतो. आपल्या संगणकात तो भरून घेण्यासाठी इंटरनेटची गरज नाही. मात्र, इंटरनेटची सोय असणा-यांना तो मोफत डाऊनलोड (www.gangals.com) करता येतो.

ymalkar@gmail.com