आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसमजांची ‘मधु’र करमणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘ऑल द बेस्ट’ या नाटकाने काही वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर धुमाकूळ घातला होता. आजही या नाटकाला हाऊसफुल्लचे बोर्ड झळकतात. या नाटकाचे लेखक -दिग्दर्शक देवेंद्र पेम आता चित्रपट दिग्दर्शनाकडे वळले आहेत. ‘धामधूम’ हा त्यांच्या दिग्दर्शनातील पहिलाच चित्रपट. रंगभूमीची उत्तम जाण असणा-या या दिग्दर्शकाने आपल्या पहिल्याच प्रयत्नातून रुपेरी पडदा चांगलाच चमकवला आहे. मधूू या एकाच नावामुळे चार कुटुंबातील गैरसमजातून खुलणारे नाट्य असा हुकमी विषय असणा-या धामधूमला ‘देवेंद्र पेम’ टच लाभल्याने, पडद्यावर हे नाट्य रंगते.
कथा :
मधू (भरत जाधव) हा आईच्या धाकात वाढलेला एक वकील. त्याचे मधूवर (स्मिता शेवाळे) मनापासून प्रेम असते, ही मधूही त्याच्या प्रेमात असते. मधूचे वडील (विनय आपटे) यांचा गैरसमज होतो ते दुस-याच मधूला (मृण्मयी देशपांडे) आपल्या मधूची प्रेयसी समजतात. मग त्यातच दुस-या मधूची (सिद्धार्थ जाधव) एंट्री होते आणि गैरसमजाच्या खेळाला सुरुवात होते. त्यातच पुन्हा एक मधू अवतरते आणि गैरसमजांचा हा गुंता वाढतच जातो. तीन मुलींपैकी खरोखर प्रेम असणारी मधू नायकाला मिळते का? गैरसमजाच्या मालिकेचा गुंता सुटतो कसा? हे पडद्यावर पाहणे जास्त रंजक.
संवाद :
आतापर्यंत अशा कथानकाचे अनेक चित्रपट आले आहेत. मात्र, खुसखुशीत आणि चटकदार संवाद हे धामधूमचे वैशिष्ट्य मानावे लागेल. देवेंद्र पेम यांनीच पटकथा-संवाद लिहिलेले आहेत. त्यामुळे त्यातील एकसंघपणा आणि कोणत्या प्रसंगासाठी कोणता संवाद योग्य राहील हे गणित अगदी पक्के जमले आहे. नायकाच्या कविता व त्यातील शब्द दाद देण्याजोगे.
दिग्दर्शन :
लेखक स्वत: दिग्दर्शक असल्याचा एक वेगळा फायदा असतो. धामधूममध्ये हा फायदा दिसून येतो. पहिल्या फ्रेमपासून दिग्दर्शकाने चांगली पकड दाखवली आहे. उत्तम संकलन हेही धामधूमचे एक चांगले वैशिष्ट्य. नाट्य खुलवण्यासाठी संकलनाचा
योग्य वापर केला आहे.
गीत- संगीत :
गाणी फारशी नाहीत. ‘तू वळून पाहिले’ मात्र चांगले जमले आहे. त्याचे चित्रीकरणही उत्तम झाले आहे. ‘धामधूम’ हे थीम साँग ठीक असून प्रसंगानुरूप याचा केलेला वापर चांगला जमला आहे.
अभिनय :
भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, विनय आपटे, आनंद अभ्यंकर, आसावरी जोशी, स्मिता शेवाळे, मृण्मयी देशपांडे, केतकी दवे, अश्विनी आपटे, मुग्धा शहा आणि सयाजी शिंदे या नामांकित मंडळीने आपल्या अभिनयाने धामधूम चांगलीच खुलवली आहे. मृण्मयी देशपांडेने डॉनची मुलगी टेचात सादर केली आहे. तिची भाषा आणि पडद्यावरचा मोकळा वावर उत्तम. स्मिता शेवाळे दिसते छान आणि वावरतेही चांगली. भरत जाधवने नेहमीच्या टेचात मधू उभा केला आहे. टेन्शन आल्यानंतरचे ते पिचका आवाज काढणे आणि आत्मविश्वास गमावल्याचे व्यक्त करणारी त्याची देहबोली 100 टक्के गुण घेणारी आहे. त्याला दिलेली चष्म्याची फ्रेमही सूचक. खरी मजा आणतो तो सिद्धार्थ जाधव. रांगडा, गावाकडचा मधू त्याने चांगला रंगवला आहे. त्याची भाषा हसे वसूल करते. स्वर्गीय आनंद अभ्यंकरांचा फ्रेश करणारा अभिनय चटका लावतो. विनय आपटे, सयाजी शिंदे , आसावरी जोशी नेहमीप्रमाणे उत्तम.
सार :
ऑल द बेस्ट प्रमाणेच देवेंद्र पेम यांचा धामधूम निराश करत नाही. वीक-एंडची सुटी वाया घालवण्यापेक्षा धामधूम पाहणे केव्हाही चांगले. खळखळून हसवणारी ही दोन घटकांची करमणूक ‘मधू’र आहे बाकी तुम्ही ठरवा...
दर्जा : ««
* बॅनर : इच्छापूर्ती प्रॉडक्शन
* निर्माता : रवींद्र वायकळ
* दिग्दर्शक : देवेंद्र पेम
* संगीत : अवधूत गुप्ते
* गीत : गुरू ठाकूर
स्टारकास्ट
भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, स्मिता शेवाळे, मृण्मयी देशपांडे, विनय आपटे, सयाजी शिंदे, आसावरी जोशी, आनंद अभ्यंकर आदी...
आवर्जून पाहा ****
पाहा***
टाइमपास**
रटाळ *