आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तरी पीळ जात नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसारमाध्यमे कशी चुकीचे प्रदर्शन करतात, हे सांगताना थेट दंडुक्याच्या थर्ड डिग्रीची भाषा करणा-या दादांना व आपल्या पोलिस खात्याला समाजातील अपप्रवृत्तींना ठेचून काढण्यासाठी गृहमंत्र्यांना हातात नसलेल्या दंडुक्याला अद्याप फारसे यश नसल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे. सिंचन घोटाळ्यामुळे ‘राष्ट्राय इदम न मम ।’ म्हणणा-या साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस टीकेची धनी झाली. खर्ज स्वरातील दादांच्या तोंडाचा पट्टा अनेक वेळा मोठ्या साहेबांनीच पुढाकार घेत ढिला केला. त्याचे भयंकर प्रायश्चित्त त्यांनाच जास्त घ्यावे लागले. त्यामुळे अखेर त्यांनी भाकरी फिरवली. सिंचनाच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे सांगत राजीनामानाट्याचा प्रयोग करून राष्ट्रवादीने जनता व विरोधी पक्षातून होणा-या टीकेपासून पाठी सोडवली. मात्र, दादांनी येत्या निवडणुका समोर ठेवून पट्टा आवळल्याचे पुन्हा एकदा इंदापूर तालुक्यातच दिसले. आपल्या बेताल वक्तव्याने कार्यकर्त्यांना हसवता हसवता दादांनी धरणात पाणी नाही हे सांगण्यासाठी करंगळी वर करण्याची भाषा वापरली. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील प्रसारमाध्यमांनी दादांना झोडपून काढले. दादांना पुन्हा एकदा राजीनामा देण्याची वेळ येतेय की काय, असे चित्र असताना दादांनी मोठ्या साहेबांच्या गुरूंचे कराडात जाऊन पाय धरले. त्या वेळी राजीनामा दिला तर पुन्हा कोणत्या कारणाने मंत्रिमंडळात शिरकाव करायचा, हा यक्षप्रश्न असल्याने त्या ठिकाणी दादांची झटपट निर्णयक्षमता कामी आली नाही. शक्यतो दादा कोणाची माफी मागत नाहीत. पत्रकारांना दंडुके लावले पाहिजेत या त्यांच्या वक्तव्यानंतर हे दिसून आले. त्या वेळी चौफेर टीका झाली तरी दादा डगमगले नाहीत. मंत्रालयातील वार्तांकन बंद पडल्याने मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोचत नाहीत, याची तमा केली नाही. त्या वेळी मोठ्या साहेबांना माफी मागण्याची पाळी आली. वारंवार वरिष्ठांना माफी मागायला लावणे योग्य नसल्याने दादांनी दुष्काळग्रस्तांबाबत उपहास करणा-या वक्तव्याबाबत संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली हे केवढं मोठं आश्चर्य... माझ्या राजकीय कारकीर्दीत ही माझी सगळ्यात मोठी चूक होती हे दादांंनी कबूलही केलं. त्यामुळे पिछाडीवर गेलेल्या राष्ट्रवादीला सावरताना दादा आता आपल्यावरील टीकेला प्रसारमाध्यमांना जबाबदार धरत आहेत. प्रसारमाध्यमांकडे निर्देश करत किती लाखांना विकले गेले, असा प्रश्न इंदापूरच्या जनतेसमोर उपस्थित करत ‘मी गमतीने बोलायला गेल्यावर ध चा मा करून टाकतात’ असं जाहीर सभेत बोलून प्रसारमाध्यमांवरच संशय व्यक्त केला. वास्तविक राज्य सरकारमधील घोटाळे बाहेर पडत असताना प्रसारमाध्यमांतच भ्रष्टाचार असल्याचे सूचक वक्तव्य करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.
एप्रिल महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील पाणी मागणा-या आंदोलकांच्या डोळ्यात बेताल बोलण्याने दादांनी पाणी आणले. महाराष्ट्रासमोर हात जोडून माफीनामा लिहिणारे दादा पुन्हा एकदा तोंडाचा पट्टा चालवण्यात सक्रिय झाल्याचे यावरून पुन्हा एकदा इंदापूर तालुक्यातच दिसले. राज्य सरकारमध्ये आघाडी असणारे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कलगीतुरा सदैव रंगलेला असतो. मात्र आपल्याच वक्तव्यांबाबत प्रसारमाध्यमांना जबाबदार धरत जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणं कितपत योग्य आहे? याला म्हणतात, सुंभ जळाला तरी पीळ जात नाही.