आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी मिळवा मन:शांती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेहमीच हा प्रश्न विचारला जातो की मन:शांतीसाठी संसार त्याग करावा लागेल का? गृहस्थाश्रमातून बाहेर पडणे, नोकरी-व्यवसाय सोडून देणे म्हणजे संसारत्याग असा लोकांचा समज आहे. मनातील वाढत्या अशांततेचे हेच प्रमुख कारण असल्याचे त्यांचे मत असते. परंतु मनात चाललेली धुसफूस हेच तुमच्या मानसिक अशांततेचे सर्वात मोठे कारण आहे. आपण जिथे जिथे जातो, तिथे आपले मन सोबत असतेच. आपण ज्याप्रमाणे कपडे बदलतो, त्याप्रमाणे मन बदलता आले असते तर किती छान झाले असते ना?
ओशोंना जेव्हा साधक अशा प्रकारचा प्रश्न करत, तेव्हा ते म्हणत, आधी मन:शांती प्राप्तीचा प्रयत्न थांबवा. मनातील अशांततेचा स्वीकार करा. आपोआप तुमचे मन शांत होईल आणि तुम्हाला जाणवेल की तुमच्या मनाला पुन्हा कोणीच अशांत करू शकणार नाही. ओशोंचा हा उपदेश काही जणांना खटकेलही. आपण मन:शांती शोधण्यासाठी त्यांना उपाय विचारला आणि ते अशांततेचा स्वीकार करण्यास सांगतात? परंतु आपल्या मनाचा वेध घेतला तर आपल्या लक्षात येईल की जीवनात बदल शक्य आहे. मान-अपमान, सुख-दु:ख, शांतता-अशांतता अशा प्रकारे आपले मन नेहमीच दोन भागांमध्ये विभागलेले असते. मग आपणच त्याची समजूत काढतो की यातील एक भाग पाहिजे आणि दुसरा नको. हा सारा आपल्या मनाचा खेळ आहे. कोणताही एक भाग आपल्याला मिळूच शकत नाही. ज्याप्रमाणे एखादे फूल हातात घेतल्यावर पाकळ्या नको, मला पाकळ्यांच्या आतील भाग हवा असे आपण म्हणू शकत नाही, त्याचप्रमाणे आपल्या मनाचे असते. जर मी अशांततेसाठी तयार असेन तर मला कोण अशांत करू शकेल? जर मी अपमानित होण्यासाठी तयार असेन तर मला कोण अपमानित करू शकेल? मला मान हवाय म्हणूनच कुणीही मला अपमानित करू शकतो. मनाच्या या खेळापासून वाचण्याचे दोन उपाय आहेत. एक तर दोघांनाही मान्य करा. यामुळे मन मरेल. नाही तर दोघांनाही अमान्य करा. असे केल्यावरही मन मरेल. जो उपाय आपल्याला योग्य वाटतो तसे करा, नाही तर तुमच्या मनाला शांत करणे कठीण आहे. जोपर्यंत तुम्ही मनाला शांत करण्याचा प्रयत्न कराल, तोपर्यंत तुम्ही अशांतच असाल.
जोपर्यंत तुम्ही सुखाच्या मागे लागाल, दु:ख तुमच्या नशिबी असेल. मन:शांतीचा कोणताही मंत्र नाही. यासाठी एक प्रयोग करून पाहा. आज सकाळी 6 वाजेपासून ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत जे काही घडेल, त्याचा स्वीकार करा. त्याला किंचितही विरोध करू नका आणि फरक पाहा. तुमच्या जीवनात नवचेतना जागी झाल्याचा अनुभव तुम्हाला मिळेल. याचा प्रत्यय आल्यास तुम्हालाही याची सवय जडेल. (अमृत साधना, ओशो टाइम्सच्या माजी संपादक, अनेक देशांमध्ये ध्यान शिबिरांचे संचालन, पुणे)