आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन होरपळून टाकणारे ‘ते’ 19 दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी, औरंगाबाद, बीड - नऊ मार्च 2014. वेळ सकाळी दहा वाजेची. पाथर्डी तालुक्यातील पिंपळगाव टप्पा गावात राहणारे कारभारी शिरसाट बसस्थानकावर पोहोचले. संगमनेरला हुतात्मा दिनानिमित्त त्यांचे व्याख्यान होते. त्यासाठी ते निघाले होते. बसमध्ये बसण्यापूर्वी त्यांना त्यांचा मुलगा सतीशचा फोन आला. ‘मामा. तुम्ही ताबडतोब घरी जा. मी पुण्याला निघालोय.’ काळजीच्या सुरात सतीश सांगत होते. ‘अरे पण झालंय तरी काय, मला काही कळेल का?’ कम्युनिस्ट चळवळीत रापलेल्या मामांनी थरथरत्या आवाजात विचारले. उत्तर आले. ‘मामा, भयंकर घटना घडली आहे. आपल्या क्रांती वहिनींना घेऊन जाणारं मलेशियाचं विमान बेपत्ता झालंय. टीव्हीवर न्यूज आहे. मी पुण्याला चाललोय आणखी माहिती घेण्यासाठी.’ ‘काय, असं कसं झालं? केव्हा झालं?’ असे प्रश्न विचारेपर्यंत त्यांच्या पायातील अवसान गळालं होतं. ते धावतच घरी पोहोचले. टीव्ही सुरू केला. ब्रेकिंग न्यूजवरील शब्द वाचता वाचता त्यांचे डोळे भरून आले. तेवढय़ात कारभारींच्या पत्नी लक्ष्मीबाईही आल्या. काही क्षणांत दोघांच्याही डोळ्यांतून अर्शूंच्या धारा वाहू लागल्या. मन होरपळून टाकणारी ती घटना होऊन आज 19 दिवस उलटले. अर्शू थांबले असले तरी विलाप, आक्रोश अजूनही कायम आहे.

हृदय पिळवटून टाकणारी ही कहाणी आहे मलेशियन विमान दुर्घटनेत प्राण गमावलेल्या क्रांती शिरसाटांच्या कुटुंबाची. त्यांच्या माहेरचे हंगे कुटुंबही असेच दु:खात बुडून गेले आहे. त्यांची ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींनी भेट घेतली, तेव्हा त्यांनी भावनांना वाट करून दिली. अर्शूंना काही काळ आवर घातला. आणि नऊ मार्चपूर्वीच्या सार्‍या घटना फ्लॅशबॅकसारख्या उलगडत गेल्या.

उच्चशिक्षित आणि निगर्वी : बीडच्या हंगे कुटुंबातील क्रांती 1996 मध्ये प्रल्हाद शिरसाट यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. तत्पूर्वी त्यांनी रसायनशास्त्रात एम.एस्सी. केले. विवाहानंतर पुण्यातील एकलव्य शिक्षण संस्थेच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात तीन वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. रशियन, कोरियन भाषाही त्यांना अवगत होत्या. उच्चशिक्षित असलेल्या क्रांती निगर्वी आणि अतिशय सालस गृहिणी म्हणून परिचित होत्या.

प्रल्हादांना धीर मुलांचा
निरोप समारंभासाठी येणार्‍या पत्नीच्या स्वागताची जय्यत तयारी प्रल्हाद यांनी केली होती. 31 मार्चनंतर पुण्यात पोहोचयाचे. मुलांना, आई-वडिलांना भेटण्याचे वेळापत्रकच त्यांनी तयार केले होते. ते कोलमडून पडले आणि प्रल्हादही. अचानक झालेल्या या आघाताने ते कमालीचे भावूक झाले आहेत. फारसे काही बोलण्याच्या मनस्थितीत ते नाहीत. टीव्हीवर मलेशिअन विमानाची बातमी पाहताना काहीक्षण त्यांचे डोळे चमकतात आणि प्रवासी बचावले नसल्याचे निवेदक सांगत असताना चमक विझत जाते. डोळ्याच्या कडा पाणावतात. मग हलक्या पावलाने जवळ येत राहूल, कबीर त्यांना धीर देतात.

दुखवटा पाळला नाही
क्रांती यांना पतीकडे घेऊन निघालेले विमान हिंदी महासागरात बुडाले. मलेशियन सरकारने तसे जाहीरही केले. मात्र, शिरसाट आणि क्रांतीच्या माहेरचे हंगे कुटुंब ते मानण्यास तयार नाही. बुद्धीवादी विचारसरणीवर ठाम विश्वास असलेल्या या कुटुंबांनी अद्याप तिच्या मृत्यूचा दुखवटाही पाळलेला नाही.

आपले सरकार वगळता सार्‍यांनी केले सांत्वन
शिरसाट, हंगे कुटुंबावर दु:खाची कुर्‍हाड कोसळली. आप्त स्वकीय, मलेशियाचे राजदूत, कन्सर्न संस्थेचे बडे अधिकारी, आंध्र प्रदेशचे पोलिस महासंचालक, पाथर्डीचे रहिवासी महेश भागवत अशा शेकडोंनी सांत्वन केले. अपवाद आपल्या केंद्र आणि राज्य सरकारचा. घटना घडून तीन आठवडे उलटून गेले तरी जिल्हाधिकारीही भेटण्यास आले नाही. राज्य सरकारने विचारणा केली नाही. केंद्र सरकारला क्रांतींच्या शोधासाठी पत्र पाठविले होते. त्याची पोचपावतीही मिळालेली नाही.

अन् अघटित घडले
मुलांना सनदी अधिकारी, शास्त्रज्ञ किंवा निष्णात डॉक्टर बनवायचे, असे स्वप्न उराशी बाळगून आपल्यावर संस्कार करणारी आपली आई आता कधीच परत येणार नाही. हे कबीर, राहूलला दुर्घटनेनंतर तीन दिवसांनी उमगले. या अघटित, अनाकलनीय घटनेने त्यांना सुन्न करून टाकले आहे. अशाही स्थितीत त्यांनी वार्षिक परीक्षा देत क्रांती यांनी केलेला अभ्यासाचा संस्कार किती खोलवर रुजला आहे, याचीही जाणिव नातेवाईकांना करून दिली आहे.