आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरेकी पर्यटनामुळे ‘जय’चा बळी ( मिलिंद बेंडाळे)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अ लीकडील काळात काही वाघांमुळे काही व्याघ्र प्रकल्प चर्चेत राहत आहेत. मछलीमुळे रणथंबोर व्याघ्र प्रकल्प अनेक वर्षे चर्चेत राहिला. बांधवगड व्याघ्र प्रकल्पही सीता-चार्जर, बी-२ या वाघांमुळे चर्चेत राहिला. ताडोबा अभयारण्यही तेथील माया या वाघीणीमुळे चर्चेत आहे. जय वाघामुळेच नागपूरजवळचे उमरेड-करहांडला अभयारण्य प्रकाशझोतात आले. वास्तविक पाहता तेथे नैसर्गिक जंगल अतिशय कमी आहे. बरेचशी वृक्ष लागवड आहे. परिणामी तेथे तृणभक्षी प्राण्यांचे प्रमाणही खूपच कमी आहे. असे असतानाही ही जयमुळे हमखास वाघ दिसणारे अभयारण्य म्हणून त्याचा देशभर लौकिक पसरला. जय नागझिरा अभयारण्यातून उमरेडमध्ये आला होता. जयने पर्यटनाद्वारे सरकारला १४ कोटी रुपये मिळवून दिले. तो आकाराने अतिशय मोठा होता. आशियातील सर्वात मोठा वाघ, असा दावाही त्याच्याबाबत केला जात होता. सर्वसामान्य वाघिणींच्या वजनाच्या जवळजवळ दुप्पट वजनाचा व अतिशय रुबाबदार म्हणून तो प्रसिद्ध होता. त्यामुळे त्याने कमवून दिलेल्या १४ कोटींपेक्षा तो अधिक मौल्यवान होता. कारण अभयारण्यात गेल्या अडीच वर्षांत त्याच्यापासून चार वाघिणींना २० पिल्ले झाल्याची नोंद आहे. शिवाय प्रादेशिक वनक्षेत्रात आणखी तीन वाघिणींना त्याच्यापासून किती पिल्ले झाली, याची नोंद करणे अद्याप बाकी आहे. जय का खास होता, याचे हे प्रमुख कारण आहे. १८ एप्रिलपासून जय अचानक गायब झाला. त्याचा शोध मात्र जुलैमध्ये सुरू झाला. ज्या ‘उमरेड-करहांडला’चा तो अनभिषिक्त सम्राट होता, तेथे तृणभक्षी प्राण्यांची (हरणे व इतर शाकाहारी प्राणी) संख्या खूप कमी आहे. त्यामुळे जय प्रामुख्याने अभयारण्याला लागून असलेल्या भागातील पाळीव जनावरांच्या शिकारीवर जगत होता. अभयारण्य परिसरात पाळीव प्राणी मारला गेला, की ते काम जयचेच, इतकी त्याची ही सवय सर्वांच्या अंगवळणी पडली होती. त्यामुळे १८ एप्रिलपासून जय दिसेनासा झाल्यानंतर जवळजवळ अडीच महिने वन्यजीव विभागाची यंत्रणा का गप्प बसली, हा कळीचा मुद्दा आहे. या अभयारण्यात ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसवलेले आहेत. त्यामुळे कोठे तरी त्याची नोंद झाली असतीच. अनेकदा जय वाघ बाहेरून फिरून १५ दिवसांनी उमरेडमध्ये परतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तो न दिसण्याच्या किमान १५ दिवसांनंतर तरी त्याचा शोध सुरू होण्याची गरज होती, पण वन्यजीव विभागाची यंत्रणा गाफील राहिली.
नॅशनल टायगर कंझर्वेशन अॅथॉरिटीच्या (एनटीसीए) मार्गदर्शक तत्त्वांनुसार वाघांवर दररोज नजर असली पाहिजे. जय दिसत नाही म्हटल्यावर त्याचा लगेच शोध का सुरू झाला नाही, या प्रश्नाचे उत्तर वनविभागाला द्यावे लागणार आहे. पावसाळ्यामुळे तसे करण्यास उशीर झाल्याचे कारण वनविभागाचे अधिकारी देत आहेत. मात्र, ते फोल ठरणारे आहे. कारण एप्रिल, मे व जूनमध्ये उन्हाळ्यात त्याचा शोध घेणे शक्य होते. बोंबाबोंब झाल्यावर मग नागपूर, भंडारा व ब्रह्मपुरी या तीन वन्यजीव विभागांबरोबर दहा स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांनी जवळजवळ एक हजार चौरस किलोमीटर जंगलात जयचा शोध घेतला. एका वाघाचा इतका विस्तृत प्रमाणावर शोध घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यावेळी इतर ५० वाघांच्या अस्तित्वाच्या खुणा आढळल्याचे ‘जय’च्या शोधासाठी काम करणाऱ्या ‘सेव्ह इको सिस्टिम अँड टायगर’ या प्रमुख स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष शाहीद खान यांनी सांगितले.
जय होताही तितका खासच. तो गायब झाल्यानंतर अनेक तर्क व्यक्त करण्यात आले. त्यापैकी एक म्हणजे, उमरेडमध्ये त्याच्या पिल्लांपैकी सात नर आहेत. त्यांच्याशी संघर्ष टाळण्यासाठी तो बाहेर गेला असावा, असे मतही व्यक्त करण्यात आले. मात्र, परिस्थिती त्यांच्या वक्तव्यापेक्षा वेगळी आहे. जय हा त्या भागातील सर्वात मोठा अडीचशे किलो वजनाचा व वर्चस्व असलेला नर होता. त्याच्यापेक्षा निम्म्या वजनाच्या पिल्लांना घाबरून तो तेथून निघून जाण्याची शक्यता नाही. शिवाय तो आपले क्षेत्र सोडून जाताना त्याची कोठेतरी दुसऱ्या नराबरोबर झुंजही झाली असती. तो अगदी प्रादेशिक वनक्षेत्रात गेला असता, तरी आता सर्वत्र लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये कोठेतरी नोंद झाली असती. याशिवाय त्याची सवय पाहता पाळीव प्राण्यांवरील हल्ल्याच्या घटनांमुळे त्याचे अस्तित्व इतका काळ लपू शकले नसते.
मग जयचे काय झाले? या प्रश्नाचे उत्तर आज कोणालाही न आवडणारे असेच असण्याची शक्यता आहे. १९ तारखेलाच विद्युततारांच्या साह्याने त्याची शिकार करून मृतदेह नष्ट केल्याची चर्चा वन अधिकाऱ्यांत दबक्या आवाजात सुरू आहे. जय प्रसिद्ध वाघ असल्याने हा सर्व प्रकार दडपण्याचा वरिष्ठ वन अधिकाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहेत, असा आरोपच खासदार नानासाहेब पटोले यांनी केला आहे. स्थानिक वन्यजीवप्रेमींचे मतही असेच आहे. उमरेडमध्ये सगळीकडे कॅमेरा ट्रॅप व नजर ठेवणारी यंत्रणा असताना एक मोठा वाघ असा अचानक कसा गायब होऊ शकतो, हा प्रश्न सर्वांनाच छळत आहे.
जयच्या निमित्ताने पुन्हा वन्यजीव पर्यटनाच्या अतिरेकाची चर्चा जोरात सुरू झाली आहे. कारण ताडोबा असो, की उमरेड-करहांडला अभयारण्य, येथील वन्यजीव व्यवस्थापन पर्यटन केंद्रित झाले आहे. उमरेड करहांडला अभयारण्यात अवघ्या १८० चौरस किलोमीटर क्षेत्रात एका सफारीत ६० ते ७० गाड्या फिरायच्या. ‘एनटीसीए’च्या निकषांपेक्षा ही संख्या खूप अधिक आहे. व्हीआयपींसाठी नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात होतेे. या बद्दलच्या घटनांचे किस्से परिसरात वन अधिकाऱ्यांत चवीने चर्चिले जात आहेत. त्यामुळेच एकूणच या प्रकरणात वनविभागाचे सचिव व वरिष्ठ वन अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात आहेत. अतिपर्यटनामुळे जयच्या सवयींत मोठा बदल झाल्याचे निरीक्षणही वन्यजीव अभ्यासकांनी नोंदवले आहे. आधी गाड्यांची संख्या कमी असताना तो गाड्यांच्या बरोबर किंवा पुढे बिनधास्तपणे चालायचा, बसायचा. काही मोजकेच वाघ असे करतात. त्याच्या या खास पर्यटकांना खूष करणाऱ्या गुणांमुळेच हा वाघ राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाला होता. नंतर मात्र जयच्या वागण्यात मोठे बदल झाले. कारण प्रसिद्धीमुळे या अभयारण्यात गाड्यांची संख्या बेसुमारपणे वाढल्यावर मात्र तो घाबरून पळायला लागला होता. पर्यटकांपासून तो दूर जाऊ लागला. त्याच्या गळ्यात अभ्यासकांनी रेडिओ कॉलरही लावली होती, पण त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी तिचाही उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला नजरेआड जाण्यास भाग पाडणाऱ्या अव्यवस्थेचा (अतिरेकी पर्यटन) एक परिणाम म्हणजे तो गायब झाल्याचे मानले जात आहे.
विदर्भात व्याघ्र प्रकल्पाबरोबरच प्रादेशिक वनक्षेत्रातही समृद्ध वन्यजीवन आहे. ते पूर्णपणे असुरक्षित आहे. तेथील वाघांच्या मृत्यूच्या अनेक घटना घडूनही संरक्षणाची सक्षम व्यवस्था होत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. आज जयच्या अस्तित्वाबाबत ‘हो’ किंवा ‘नाही’ यासाठी कोणताही पुरावा नाही. सन २०१२-१३ मध्ये वनविभागाने काही वाघांची शिकार करणारे पकडले. या कामगिरीवर सर्व यंत्रणा आतापर्यंत संतुष्ट राहिली. त्यामुळे नंतर परिणामकारक अशा शिकार प्रतिबंधक यंत्रणा उभारण्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले. अधूनमधून वाघांच्या मृत्यूच्या घटना उघडकीस येत होत्या, पण वन्यजीव विभाग त्या नैसर्गिक मानून स्वस्थ राहिला. ‘जय’चे गायब होणे, हे याच गाफिल राहण्याचा परिपाक मानला जात आहे.
बातम्या आणखी आहेत...