आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Milind Bendale Artical On Lok Sabha Seats Of Nagar District

नगरमध्ये उमेदवारीचा घोळ कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या जिल्ह्यात नगर व शिर्डी अशा दोन्ही मतदारसंघांत युतीचे खासदार आहेत. निवडणूकपूर्व अंदाजांचे जे अहवाल बाहेर आले आहेत. त्यात दोन्ही कॉँग्रेसला राज्यात मोठा फटका बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही कॉँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जिल्ह्यात दोन्ही कॉँग्रेसचे मिळून 12 पैकी सात, तर युतीचे 5 आमदार (विधानसभा) आहेत. एवढा मोठा प्रभाव असतानाही दोन्ही खासदार मात्र युतीचे असल्याचे कॉँग्रेसच्या राज्य पातळीवर नेत्यांना सलत आहे. त्यामुळे दोन्ही कॉँग्रेसने लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. वास्तविक पाहता दोन्ही कॉँग्रेसकडे राज्य पातळीवर प्रभाव असणारे अनेक बडे नेते जिल्ह्यात आहेत. मात्र, त्यांचे एकमेकांचे पाय ओढण्याचे राजकारण युतीचा प्रभाव वाढण्यास कारणीभूत आहे.
या वेळच्या लोकसभेसाठी राष्ट्रवादीने नगरसाठी सुरुवातीस जोरदार तयारी केली होती. लोकसभेसाठी सध्या राष्ट्रवादीतून माजी मंत्री बबनराव पाचपुते, त्यांचे सुपुत्र विक्रमसिंह व राजीव राजळे यांची नावे चर्चेत होती. त्यापैकी विक्रमसिंह यांचे नाव निश्चित झाल्याचे त्यांचे समर्थक छातीठोकपणे सांगत होते. मात्र, 30 तारखेच्या मुंबईतील बैठकीनंतर राजळे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्या समर्थकांनी त्याच दिवशी सायंकाळी आपल्या नेत्याचे नाव निश्चित झाल्याचे समजून पाथर्डीत दीड तास जोरदार आतषबाजीही केली. तरीही पक्षाने त्यांचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही. याविषयी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांशी संपर्क साधला, तर काहींनी चक्क बबनराव पाचपुते यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, माजी मंत्री बबनराव पाचपुते लोकसभेत जाण्यासाठी अजिबात उत्सुक नाहीत. पक्षाच्या व्यासपीठावर त्यांनी याबाबत ठणकावूनही सांगितले आहे. तरीही त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. नेत्यांमध्येच अशी स्थिती, तर कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या गोंधळाबद्दल बोलायलाच नको.
राष्ट्रवादीत तरी निदान दोनच नावांबद्दल चर्चा आहे. भाजपमध्ये तर हा गोंधळ मोठा आहे. सध्या तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, आमदार राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले व शेवटी खासदार दिलीप गांधी यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी सर्वांत पुढे ढाकणे यांचे नाव आहे. तरी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला काम करण्यास सांगितल्याचे कर्डिले खासगीत सांगत आहे. त्यांचीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. कारण त्यांना नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा लाभ घेऊन केंद्रीय मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. शिवाय, या वेळी त्यांच्या विधानसभेच्या राहुरी मतदारसंघात जर उषा तनपुरे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली, तर त्यांना ती निवडणूक खूप अवघड होणार आहे. त्यामुळे त्यांचा लोकसभेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. गेल्यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीतही त्यांनी राष्ट्रवादीकडून आपले नशीब आजमावले होते. त्या वेळी गांधी यांनी त्यांचा पराभव केला होता. या वेळी त्यांना मोदी लाटेवर स्वार व्हायचे आहे. नगर तालुक्यात त्यांचे ब-यापैकी, तर शहरात त्यांचे व्याही जगताप व कोतकर यांचा प्रभाव आहे. शिवाय शहरात भाजपचा पारंपरिक मतदार आहेच. पण, जैन व मारवाडी समाजात त्यांच्याबद्दल प्रतिकुल भावना आहे. शिवाय आमदार अनिल राठोड यांच्याशी असलेले त्यांचे ‘सख्ख्य’ पाहता प्रभाव असणारी शिवसेना त्यांच्यासाठी काम करण्याची शक्यता नाही.त्यांच्या तुलनेत ढाकणे चांगले उमेदवार होऊ शकतात, असे पक्षातील नेत्यांचे मत आहे. तरुण व स्वच्छ प्रतिमा, उच्च शिक्षित, माजी मंत्री बबनराव ढाकणे यांची पार्श्वभूमी, पाथर्डी, जामखेड व शेवगाव तालुक्यातील जातीय समीकरणे त्यांच्या पथ्यावर पडणारी आहेत. खासदार दिलीप गांधी यांचे नाव सध्या मागे पडले असले, तरी ऐनवेळी अल्पसंख्याक समाजाचे म्हणून, तसेच त्यांचे दिल्लीतील वजन वापरून ते बाजी उलटवू शकतात, असे भाजपचे नेते खासगीत बोलतात. राजळे व गांधी यांची लढत झाली, तर ती उत्कंठावर्धक असेल.
शिर्डी मतदारसंघ कॉँग्रेसकडे आहे. युतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे असल्याने विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पर्याय नाही. परंतु या राखीव मतदारसंघात कॉँग्रेसकडून मात्र अद्याप कोणाच्याही नावाची चर्चा नाही. नाही म्हणायला प्रेमानंद रूपवते यांचे नाव पुढे केले जात आहे. त्यांना अधिकृतपणे कॉँग्रेसची उमेदवारी मिळाली, तर ते पक्षाच्या जिवावर चांगली लढत देऊ शकतात. कारण शिर्डी मतदारसंघात पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघांत दोन्ही काँग्रेसचे आमदार आहेत. जिल्ह्यात लोकसभेच्या उमेदवारीची अशी स्थिती आहे. उमेदवारीच निश्चित न झाल्याने गोंधळलेले नेते व सैरभैर कार्यकर्ते यामुळे प्रत्यक्ष मतदारसंघ बांधणीचे काम कसे करायचे, याचा संभ्रम सर्वांना आहे.